आता म्यूकरमायकोसिसच्या इंजेक्शनसाठी धावपळ सुरू
शब्दराज ऑनलाईन,दि 21 ः
कोरोना रुग्णांसाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नातेवाइकांची प्रचंड धावपळ आणि कोट्यवधींचा काळाबाजार झाल्यानंतर आता कोरोनानंतर उद्भवणाऱ्या म्यूकरमायकोसिसच्या उपचारासाठी लागणाऱ्या अॅम्फोटेरिसिन इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातलगांची पिळवणूक सुरू झाली आहे. एका रुग्णासाठी किमान १०० इंजेक्शन्स लागत असून राज्यात त्यांची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल आणि तिपटीने काळाबाजार सुरू झाला आहे.
कोरोनाच्या उपचारादरम्यान स्टेरॉइड्सचा अतिवापर झाल्याने उद्भवलेल्या म्यूकरमायकोसिसच्या आजारात रुग्णांच्या अवयवात घुसलेली बुरशी स्वच्छ करण्याच्या उपचारासाठी अॅम्फोटेरिसिनच्या इंजेक्शनची मागणी वाढते आहे. राज्यात रुग्णांची संख्या १ हजारांच्या घरात असून एका रुग्णाला किमान १०० इंजेक्शन्सची गरज भासते. रुग्णाच्या वजनावर ही संख्या ठरते. दिवसातून सात-आठ इंजेक्शन असा हा किमान दहा दिवसांचा उपचार आहे. या इंजेक्शनची किंमत ७,८६४ रुपये असली तरी तिच्या टंचाईमुळे तिपटीने तिचा काळाबाजार सुरू झाला आहे. एका रुग्णासाठी हा खर्च साडेतीन ते चार लाखांच्या घरात जात आहे. त्यात इंजेक्शन्सच्या टंचाईमुळे अनेक रुग्णांना उपचारही नाकारले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.
गाफीलपणातून अन्न व औषध प्रशासनाची दुसरी चूक
या उपचारांचा खर्च महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत करण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. मात्र, सध्या औषधेच नसल्याने लाभ कागदावरच राहिला आहे. मुळात गेले महिनाभर या आजाराची चर्चा सुरू असताना या इंजेक्शनच्या व्यवस्थापनाबाबतही अन्न व औषध प्रशासन गाफील राहिल्याचे दिसत आहे. ओरड सुरू झाल्यावर अन्न व औषध प्रशासनाने या इंजेक्शनच्या उत्पादकांचा व वितरकांचा शोध सुरू केला आहे.