गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर,गणपतींच्या मूर्तीच्या उंचीवर बंधने

0 120

शब्दराज ऑनलाईन,दि 29ः
यंदा गणेशोत्सवासाठी गणपतींच्या मूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी विनंती गणेशोत्सव मंडळांनी केलेली असताना करोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने आज गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फुटांची ठेवण्यात आली असून घरगुती गणपतीची मूर्ती ही २ फुटांची असावी अशी मर्यादा राज्यसरकारने घालून दिली आहे
गणेश मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणपतींच्या मूर्तींवर उंचीची मर्यादा नको, आम्ही करोनाकाळातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करू, अशी भूमिका घेतली होती. याबरोबरच तातडीने गणेशोत्सवाबाबतचे सरकारचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली होती. गणेशोत्सवाला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. राज्य सरकारने कोणतेही धोरण जाहीर न केल्याने गणेशमूर्ती तयार करण्याचे कामही अद्याप सुरू करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मूर्तीकार आणि मंडळांनी सरकारला तातडीने धोरण जाहीर करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे.

गृहविभागाच्या गणेशोत्स साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना:
१) गणेशोत्सवासाठी महामंडळांनी महापालिका वा स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक असेल.
२) करोनामुळे महापालिका वा स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपातच मंडप उभारण्यात यावा. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणं अपेक्षित असल्यानं भपकेबाज सजावट करणं टाळावं.
३) सार्वजनिक गणेश मंडळातील मूर्तीची उंची ४ फूट आणि घरातील मूर्तीची उंची २ फुटांपेक्षा जास्त उंच नसावी.

४) शक्य असल्यास गणेशमूर्तीऐवजी धातूच्या वा संगमरवरी मूर्तीचं पूजन करावं. शक्यतोवर घरच्या घरी मूर्तीचं विसर्जन करावं. ते शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्ती विसर्जित करावी.

५) स्वच्छेने दिलेल्या देणग्याच स्विकाराव्यात. जाहिरातींमुळे गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती करण्याला प्राधान्यक्रम द्यावा.

६) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम वा शिबिरे घेण्याला प्राधान्य देण्यात यावं. स्वच्छतेबाबत जनजागृती करावी.

७) राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध गणेशोत्सवातही कायम असतील. शिथिल केले जाणार नाहीत.

८) आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्यात यावे.

९) नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्किंग, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.

१०) गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

११) आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नये. विसर्जन स्थळी करण्यात येणारी आरती घरीच करावी. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाणं टाळावं. चाळीतील आणि इमारतीतील गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नये.

१२) महापालिका, विविध मंडळं, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

१३) करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारसह, आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन यांनी ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करण्यात यावं.

error: Content is protected !!