बालपणीचे बाळकडू
आमच्या बालपणी प्रभातीला मोरपिसाची टोपी घातलेला,अंगात काळा कोट आणि हातातील चिमटा वाजवत येणारा वासुदेव देवादिकांची भक्ती गीते म्हणत यायचा तेव्हा डोळे चोळतच अंधारात आम्ही त्याचे दर्शन घ्यायला पळायचो. त्याला आईकडून सुप भरून दाणे मिळाले की तोंड भरून आशीर्वाद देऊन तो दुसर्या दारासमोर भक्तीगीते म्हणायचा. आम्ही त्याच्या पाठी चार पाच घरे घोळक्याने जात असू आणि त्याची गाणी ऐकत असू. ज्याकाळी दूरदर्शन, मोबाईल नसे त्यावेळी वासुदेवाची हीच गाणी मनावर गारुड करायची. कधी कधी पहाटेच्या अंधारातच कुडमुड्या जोशी पिढ्या न् पिढ्याचे भविष्य सांगत दारी यायचा. त्याला सन्मानाने घरात बसवून मागच्या सात पिढ्यांची नावे आणि घराण्याचा इतिहास विचारला जायचा. मनात प्रश्न पडायचा की त्याला आपल्या घराण्याची इतकी माहिती कशी असेल? गावोगाव फिरणारा हा कुडमुड्या जोशी ज्योतिष सांगण्यातही पटाईत होता. त्यालाही योग्य बिदागी देऊन खूश केले जायचे. सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान नंदीबैलाला घेऊन खांद्यावर गुलाबी उपरणे आणि कपाळाला गंधाचा टिळा लावलेले नंदीवाले येत. सर्वजण नंदीबैलाला ओवाळून दक्षिणा देत. घरातील धान्यही देत. त्यांची एक खासियत होती. दोन माणसांपैकी एक नंदीवाला बोटांच्या खाणाखुणा करून नाव ,गाव वगैरे सांगायचा आणि समोरचा त्याचा सहकारी लांबूनही त्याच्या हावभावावरून अचूक नाव ओळखायचा. आम्हाला मनोरंजनासोबत त्यांची कला ही खूप आवडायची.
काही वेळा खाकी कपडे घालून बहुरूपी दारात येई. त्याच्या मागे लहान मुलांचा ताफा असे. तो चला काकू चला, लग्नाला चला. लग्नाची हवा बँडबाजा लावा, कुत्री घ्या काखंला पोर बांधा खांबाला. एकीचा शेंबूड तिघीजणी पुसा अन् जेवायला बसा असे काहीतरी असंबद्ध आणि हास्यविनोद करीत बडबडायला लागला की ऐकणार्यांची हसून मुरकुंडी वळत असे. कधीतरी तो बाजीराव नाना हो बाजीराव नाना, तुमडी भरून द्या ना हो तुमडी भरून द्या ना अशी गाणीही म्हणायचा. असले निखळ विनोदी संभाषण निरनिराळ्या रंगात नि ढंगात प्रत्येक दारासमोर जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने सादर करत असे.
अंगात पोलिसांसारखा खाकी गणवेश घालून तो पोलिस,पोस्टमन,शिक्षक अशां व्यक्तिमत्वांविषयी बोलत रहायचा. आम्हाला त्याच्या बोलण्याचे खूप हसू यायचे. तो पोलीस, पोस्टमन, राजकारणी यांच्यावर व्यंगात्मक गाणी घ्यायचा. असे हे बहूरूपी पात्र शिवरायांच्या काळात फार प्रसिद्ध होते. गनिमाची इत्थंभूत माहिती काढण्यासाठी आपले चतुर हेर बहिर्जी नाईक बहूरुप्याची भूमिका घेऊन शत्रूच्या गोटात जाऊन सर्व बातम्या शिवरायांपर्यंत घेऊन येत असत. त्यामुळे शिवरायांना पुढच्या लढ्याची आखणी करता येत असे. आमच्या बालपणी हा रंगीढंगी बहुरूपी आला की आया-बायां ही हातातील कामे सोडून त्याचे विनोदी किस्से आणि बोलणे ऐकायला येत आणि तोंडावर पदर धरून खुदुखुदू हसत.
आमच्या बालपणी अशीच मनोरंजनाची आणि करमणुकीची साधने असायची. कधी कधी मला आपल्याकडील पत्र्याचे खोके घेऊन येणारा आणि त्याच्या चार बाजूंनी काचेला डोळा लावून आतील बंबई देखो असे म्हणत मुंबई दाखवणारा सर्वात लहान मुलांच्या आवडीचा असायचा. मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांची फिल्म सरकत जायची आणि दहा मिनिटात अख्खी मुंबई नजरेसमोरून तरळायची. त्या काळी त्याला थोडेसे पैसे किंवा गुंतवळीचे केसही दिले जात. लग्नात बँडबाजाच्या सोबतीने मोरणी नाचवले जायचे.त्यात पुरूषपात्रे सुंदर नृत्य सादर करायचे. त्याला मोरणी नाचवणे असे म्हणायचे. आमच्या बालपणी मोठे शॉपिंगमॉल्स किंवा शोरूम्स नव्हत्या. त्यामुळे वर्षातून दोनदा घेतले जाणारे कपडे गावात एकमेव असणार्या कपड्याच्या दुकानातून घेतली जात. वाढत्या अंगाच्या मापाने ती दोन वर्ष अंगावर बसतील एवढी ढगळ असायची.
रोजच्या व्यवहारात लागणार्या सुया, दोरे, बिब्बे, कंगवे, फण्या, चहाची गाळणी, चपातीला तेल लावायची पुसणी, दाभणी, बाळासाठी बाहुली आणि खेळणी, पावडर, तेल, लिपस्टिक, नेलपेंट, प्लास्टिकचा पोपट, कोंबडा, खुळखुळा, हळदीकुंकू,अबीर बुक्का, टिकल्या, बाळाला दृष्ट लागू नये म्हणून घालायचे काळे मणी, दाताचं दातवण, प्लास्टिकची फुले, गळ्यातल्या माळा, केसांत घालायची प्लास्टिकची फुले, शेंदूर, गळ्यातली काळी पोत, बाळाचा तांब्याचा वाळा, मंगळसूत्राचे काळे मणी, कमरेचा करदोरा असे काहीबाही नाना चटरफटर वस्तू घेऊन येणारी आणिघ्या सुया, बिब्बे करत येणारी बाई दारात आली की चारी बाजुंनी बायका आणि मुली तिच्याभोवती गराडा करून बसायच्या. तिच्या डोईवर या वस्तूंची भलीमोठी पोतडी असायची. तसेच काही वस्तू ती कोपराला अडकवून दारोदारी फिरवत विकायची. प्रत्येकाला तिच्याकडून काही ना काहीतरी हवेच असायचे. अशा सगळ्याजणी वस्तू घेत. तिला त्यातून भरपूर विक्री व्हायची. तिच्याकडे जीवनावश्यक सर्व वस्तू उपलब्ध असायच्या. ती आपल्या पोतडीतुन जादूगाराप्रमाणे एकेक वस्तू बाहेर काढत असे. त्यावेळी आम्हाला ती जादूगारच वाटायची. तिच्या सगळ्या वस्तू पाहायची खूप इच्छा असायची. ती एका ठिकाणी अर्धा- एक तास फतकल मारून बसायची तेव्हा आम्ही मुली तरी तिच्या बाजूने हलतच नसायचो. आईच्या मागे लागून तिच्याकडून हे घे ते घे असा मस्का लावला जायचा. सगळ्याजणी काही ना काहीतरी खरेदी करतच असत. त्यांची किंमतही नगण्य असायची. बर्याच वस्तू विकून झाल्या की ती एखाद्या बाईला म्हणायची, एक माय, सकाळपासून काही खाल्लं नाय एखादा भाकरतुकडा आणून दे गं मला मग कुणीतरी तिला भाकरी-ठेचा आणून देई. तिथेच बसून ती खायची आणि मडक्यातले तांब्याभर थंड पाणी पिऊन तिथेच एक डूलकी काढायची. ताजीतवानी होऊन पुढच्या मार्गाने चालू पडायची.कधी कधी तिच्या गळ्यातल्या झोळील तिचा तान्हूलाही असे. मग ती तानुल्यासाठी वाटीभर दूध मागत असे. पण त्याकाळी तिला नाही असे कोणी म्हणत नसे. कोणी ना कोणी तिच्या बाळाला दूध ,बिस्किट आणून देई.मग तोंडातच आशीर्वाद पुटपुटत ती दात्या बाईला तोंड भरून आशीर्वाद द्यायची.
कधी कधी यल्लामादेवीचे मोठे खोके डोईवर ठेवून जोगती म्हणजेच कडकलक्ष्मी डोकीवर सांभाळत तो आणि त्याची बायका पोरे गावातील मोठ्या चौकात येत. आपले देवी असलेले ते मोठे जड खोके खाली उतरून कडकलक्ष्मी जी घोळदार गुडघ्याच्या खाली पर्यंत येणारा नि रंगीत पट्ट्या पट्ट्याने बनवलेला झगा आणि वरचे शरीर उघडे असा तो हातातला मोठा आसूड फिरवत पाठीवर मारून घेई. त्याच्या दोन्ही दंडावर त्या आसुडाचे वळही दिसत. जोरजोरात ओरडत फटके मारून घेत असे. लोकांनाही तो दैवी अवतार वाटत असे. मग सार्या गृहिणी सूपभरून दाणे, कोणी पैसे घेऊन येत असत. कडकलक्ष्मीवाल्याची बायको खांद्याला अडकवलेल्या झोळीत ते दाणे जमा करून घेई. ती जोराजोरात ढोल बडवत असे. त्यामुळे जोगत्याला आसूड मारुन घ्यायला आणखी चेव येत असे. कधी तिच्या खांद्यावरील झोळीत तिचा पिटुकला आपल्या इवल्याशा मूठी चोखत मस्त पहुडलेला दिसे. कोणी त्या बाळाचे कौतुक करत, त्याला दुधाची वाटी देत असत. कोणी घरातली जुनीपानी साडी तसेच लहान मुलांचे कपडे तिला देत असत. गळ्यात अडकवलेला ढोल बडवत तोंडाने ओरडत ती कधी समोर एखादी व्यक्ती दिसली की द्या हो माय एक रुपया दोन रुपये द्यावा माय म्हणून पैसे मागत असे आणि पैसे दिले की कपाळाला लावून आशीर्वाद देई. तिच्या मागोमाग तीन चार वर्षाची एक दोन मुलेही फिरत असत. ते ही दीनवाणी होऊन भीक मागत असत. त्याच्या अंगावर फक्त चड्डी असे. जेमतेम कपडे घातलेला हा भटका समाज कधीच एका ठिकाणी रहात नाही. त्यांचे बिर्हाड नेहमी पाठीवर असते. पोटाची तुंबडी भरण्यासाठी गावोगावी हिंडून आपले खेळ करून दाखवत आणि यल्लमा आईचे दर्शन घडवत असत. कधी कधी त्या जोगतीनीच्या अंगात देवी येत असे. मग ती मान गरागरा फिरवत अंगविक्षेप करी.तिचे केसही गेलेले असत. कपाळावर असलेला मळवटही पसरलेला दिसे. पाच दहा मिनिटांनी ती थोडी शांत होई. मग आयाबाया येऊन तिला हळदीकुंकू लावत. तिच्या पाया पडून तिची खणा-नारळाने ओटी भरत.
आमच्या बालपणी नागपंचमी, नवरात्रीत विशेष रंगत असायची. पंचमीला सर्व सासुरवाशिणी माहेरवासासाठी आलेल्या असतात. त्या सगळ्या एकत्र जमून झिम्मा, फुगड्या घालत. घागर फुंकणे आणि पंचमीची गाणी म्हणत अंगणभर धमाल करत असत.नवनव्या साड्या नेसून सजून धजून विविध खेळ खेळत.वडाच्या फांद्यांना झोके बांधलेले असत. नागोबाला दूध पाजुन झाले कि झोके खेळत त्या पंचमीची गाणी म्हणत. नवरात्रीच्या वेळी मुली,बायका हादग्याची गाणी म्हणत.शाळकरी मुली शाळा सुटल्यानंतर हादग्याचे चित्र मधोमध ठेवून त्याच्या सभोवती रिंगण घालत गाणी म्हणत आणि फेर धरत असत. मुले मात्र खिरापतीच्या आशेने ते खेळ संपण्याची वाट पाहत बसत. खिरापत काय आहे हे ओळखण्याचीही मोठी मजा असायची. अशा या धम्माल असणार्या आमच्या बालपणी निखळ मनोरंजनाचे एकेक कार्यक्रम असायचे.
सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835