संत एकनाथ महाराज षष्ठी

0 574

दार उघड बया आता दार उघड
अलक्ष पूर भवानी दार उघड
कोल्हापूर लक्ष्मी दार उघड
तेलंग लक्ष्मी दार उघड
तुळजापूर भवानी दार उघड”

हे माते, तुझ्या कृपेचे दार बंद झाल्यामुळे समाजजीवन विकार ग्रस्त झाले आहे. रामराज्य लयाला जाऊन राक्षसांचे राज्य उदयाला येत आहे. या विकारग्रस्त समाजावर दुबळा शत्रूसुद्धा खूप वर्षे राज्य करीत आहे. तेव्हा तुझ्या कृपेचे दार आता उघडलेच पाहिजे.

’बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.
फाल्गुन वद्य षष्ठी, शके 1521 (25 फेब्रुवारी इ.स. 1599) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.

श्री एकनाथष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्रीएकनाथमहाराज जलसमाधी दिन म्हणुन आज साजरा करण्यात येत आहे. विशेषत: पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक ह्या सोहळ्यास उपस्थित असतात. पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसर्‍या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध ठिकाणांहून आलेल्या 475 दिंडया, भानुदास-एकनाथ चा गजर हयामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो.

संत एकनाथ महाराजांच्या स्मृती निमित्त हा सोहळा साजरा केला जातो. हा सोहळा जवळपास पंधरा दिवस चालतो. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभीवर खबरदारी म्हणून हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन शासनाकडुन करण्यात येत आहे. सामाजिक वावराला बंधने आहेत म्हणून आज सर्वत्र हा सण साधेपणात व कौटुंबिक पद्धतीने साजरा होत आहे.
फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी (साधारणत: मार्च महिना) ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यन्त श्रीकेशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते. पंचमीच्या दिवशी मानकर्‍यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते.

षष्ठीच्या दिवशी पहाटे 2 वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो. नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्रीएकनाथमहाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. वारकरी व हरिदासी कीर्तनं, मग आरती, सप्तमीच्या दिवशी रात्री 12 वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक, पादुकांना गोदास्नान, भारुड, अष्टमीला काला दिंडी, पावल्या खेळणे, गुळ आणि लाह्या यांचे मोठेमोठे लाडू आकर्षकरित्या बांधणी, मग सूर्यास्तासमयी ’दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ’ च्या जयघोषात नाथवंशजांकडून काठीच्या सहाय्यानं ती हंडी फोडण्यात येते. प्रसाद वाटप करताना परंपरेचे अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो.

उत्सवाचा इतिहास –
फा.व.6 ह्या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्रीएकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येवू लागला.

पंचपर्व –
1) नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म
2) स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह
3) नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह
4) श्री जनार्दनस्वामी पुण्यतिथी
5) श्रीएकनाथमहाराज जलसमाधी
सद्यस्थितीत पैठण येथे सोहळ्यास येणार्‍या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश आदी ठिकाणांहून येणार्‍या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच कोकण, मुंबई, कर्नाटक आदी परिसरातून दिंडया घेवून येण्यासाठी भाविक उत्सुक असल्याने येथे वारकर्‍यांची नव्यानेच भर पडत आहे. नाथषष्ठी हा उत्सव विदेशी लोकांच्याही आकर्षणाचा विषय बनला असुन अनेक विदेशी पर्यटक सोहळा पाहण्यासाठी पैठणास येतात.

एकनाथांचे वाङ्मयीन, सांप्रदायिक व सांस्कृतिक कर्तृत्व त्यांच्या समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचेच निदर्शक आहे. प्रपंच व परमार्थ तसेच संतत्व आणि समाजोद्धार यांची यशस्वी सांगड आपल्या जीवनात त्यांनी घातली. जन्मजात स्वभावाबरोबरच तत्कालीन परिस्थितीनेही एकनाथांचे व्यक्तिमत्त्व घडविले.

संत एकनाथांचा जन्म एका खानदानी देशस्थ ब्राम्हणाच्या घरात इ.सन 1533 गोदावरी काठावरील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते तान्हे मूल असताना त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेले, तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होत. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. वयाचे सहाव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली. त्या पंडिताकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्‍वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्‍वरभक्तीचे वेड त्यांना उपजतच होते.

बालवयातच ते गुरूच्या शोधात निघाले आणि दौलताबादेच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरूसमोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठीचा.

जनार्दन स्वामींनी समोर पाहिले तर एक बारा वर्षाचा मुलगा हात जोडून उभा असलेला दिसला. तेव्हा ते म्हणाले, बाळा, तू पैठणहून माझ्याकडे आला आहेस. इतकंच नव्हे तर तुझी सर्व माहिती मला माझे गुरू श्री दत्तात्रेय यांच्या दष्टान्ताकरवी समजली आहे. तुला मी माझे शिष्यत्व बहाल करतो. आपल्या गुरूचे शब्द कताक्षणीच एकनाथांना मोठा आनंद झाला. त्यांनी जनार्दनस्वामींना लोटांगण घातले.

भारत भ्रमणानंतर जीवनभर नाथांनी लोकप्रबोधनाचे कार्य केले. भक्तीची वाट दाखवली. गुरूंच्या आदेशा नुसार काही वर्षांनी एकनाथ पैठण मुक्कामी येऊन आजोबा-आजीला भेटले. तेव्हा आजोबा-आजीला परम संतोष वाटून त्यांनी लवकरच एकनाथांचे लग्न विजापूरचे देशस्थ ब्राम्हण सावकाराचे मुलीशी म्हणजेच गिरिजाबाईंशी लावून दिले. गिरिजाबाईंचा स्वभावही एकनाथांसारखा शांत व परोपकारी वृत्तीचा होता.

सूर्योदयापूर्वी उठून परमेश्‍वराचे चिंतन करून मगच गोदावरी नदीत जाऊन स्नान करणे, स्नान केल्यानंतर घरी येऊन गीतेचे पारायण करणे, त्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर ज्ञानेश्‍वरीवर प्रवचन करणे आणि रात्री जनसमुदायासमोर देवळात कीर्तन करणे अशी होती त्यांची सर्वसाधारण दिनचर्या.

भगवतोत्तम, शांतीब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरतीमधून केले होते.

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा.
समाधि न ये ध्याना हरली भवचिंता॥
नाथ आपल्याला आवर्जून सांगत आहेत की,
ॠश्रीदत्तात्रेय हे त्रिगुणात्मक आहेत. उत्पत्ती-स्थिती-लय या तीनही तत्त्वांचे मीलन या दैवतात झालेले आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश या दैवताच्या ठिकाणी एकवटलेले आहेत.

दत्तात्रेयांचे वर्णन करणे चारही वेदांना शक्य झाले नाही. समाधी अवस्थेपर्यत पोहोचलेल्या योगी पुरुषांना, ऋषी-मुनींना, देवांनासुद्धा श्रीदत्तात्रेयांचे मूळ रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवता आले नाही. ध्यानावस्थेमध्येसुद्धा दत्तात्रेयांचे दर्शन घडत नाही की, त्यांचे रूप नजरेत साठवता येत नाही. तो तर त्रैलोक्याचा राणा आहे. शब्दातीत आहे.
ॠदत्त दत्त’ ऐसें लागलें ध्यान। हारपले मन झाले उन्मन।
ॠमी-तू’पणाची झाली बोळवण। एका जनार्दनीं श्रीदत्तध्यान॥
नाथांच्या मुखात ॠदत्त दत्त’ असे पवित्र नाम घुमत असे.
श्री एकनाथ महाराजांच्या घराण्याचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. संत एकनाथ महाराजांना नाथही संबोधतात. नाथांचे पणजोबा श्री संत भानुदास महाराजांनी कर्नाटकात श्रीकृष्णदेवरायाने नेलेली श्री विठुरायाची मूर्ती पंढरीत परत आणली, हा इतिहास आहे. पुढे त्यांनी पंढरपुरात सोळखांबी येथे समाधी घेतली. सोळखांबीतून पांडुरंगाच्या गाभार्‍यात जाताना उजव्या हाताची पहिली संत भानुदास महाराजांची समाधी आहे. ज्या ज्ञानेश्‍वरांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हटला जातो, त्या ज्ञानेश्‍वरांची समाधी 250 वर्षानंतर लोकांच्या विस्मरणात गेली. परंतु नाथांनी ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीचा शोध लावला. समाधीचा चौथरा आणि गाभारा नाथांनी बांधला. आळंदीची वारी पुन्हा सुरु केली.

संत एकनाथ महाराजांचे अनेक पैलू आहेत. समकालिनांना ते आदर्श आहेत, तसेच आधुनिकांनाही. एक प्रसंग असा घडला, रणरणत्या उन्हात एका हरिजन स्त्रीचे मूल उन्हाच्या चटक्यांनी पाय पोळ्ल्याने थयथय नाचत होते. नाथांनी क्षणाचाही विचार न करता त्याला कडेवर घेऊन शांत केले. त्यांच्या विचाराप्रमाणेच त्यांचा आचार होता.

अस्पृश्याच्या चुकलेल्या मुलास कडेवर घेऊन महारवाड्यात पोहोचवणे, श्राद्धाला ब्राह्मण येईनात तेव्हा शिजवलेले अन्न अस्पृश्यांना खाऊ घालणे व गाढवाला गंगोदक पाजणे यासारख्या एकनाथांच्या चरित्रातील आख्यायिकावरून अद्वैत वेदान्ताचा व्यापक अर्थ त्यांच्या अंगी प्रत्यक्ष बाणलेला होता हे दिसून येते. एकनाथ विठा रेणुकानंदन, जनी जनार्दन रामा जमार्दन आणि दासोपंत ह्या पाच समकालीन सत्पुरुषांना नाथपंचक म्हटले जाते.

संत एकनाथ महाराज युगप्रवर्तक होते, असे म्हटले जाते. त्यांनी भारुडे, अभंगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलन, जातीयतेच्या विरोधात कार्य केले. केवळ उपदेश केला नाही, तर आपल्या कृतीतून दाखवूनही दिले. डोळस आणि कृतीशील समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले.

’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण 1367 श्‍लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून 18,810 ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत 12 स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40 हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्‍वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

फाल्गून वद्य षष्ठी शके (इ.स. 1533 ते 1599) हा दिवस नाथांनी गोदावरी नदीत जलसमाधीसाठी निश्‍चित केला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत नाथांनी लक्ष्मीतीर्थावर शेवटचे कीर्तन केले. कृष्णकमलतीर्थामध्ये नाभिपर्यंत पाण्यात जावून आत्मा ब्रह्मांडात विलीन केला. त्यांच्या पार्थिव देहावर हरिपंडीतांच्या हस्ते अग्नी देण्यात आला. दुसर्‍या दिवशी त्याठिकाणी गरम राखेवर तुळशी आणि पिंपळाचे रोप उगवले. त्यावरच नाथपुत्र हरिपंडीतांनी चरण पादुकांची स्थापना केली.

संत एकनाथ यांनी अमृताहूनी गोड अशा मराठी भाषेला लोकभाषा बनविली. त्याचबरोबर हिंदी भाषेतही त्यांनी रचना केल्या. भागवत धर्मप्रसाराच्या हेतूने त्यांनी हिंदी भाषेचा कौशल्यपूर्णरित्या वापर करुन भारुडातून रुढी परंपरांवर प्रहार केले आहेत. दोनशेपेक्षा जास्त पदे त्यांनी हिंदीतून लिहिली आहेत.
नाथांचा शेवटचा उपदेश आहे :
एका जनार्दनी विनंती ।
येऊनी मनुष्य देह प्रती ॥
करोनिया भगवद्भक्ती ।
निजात्मप्राप्ती साधावी ॥
अशा सर्वात श्रीमंत संतास षष्ठी निमित्त नतमस्तक व अभीवादन. सर्व भक्तांना श्रीनाथ षष्ठीच्या भक्तीमय हार्दीक शुभेच्छा!!

ज्योती कुलकर्णी, मुंबई

error: Content is protected !!