लॉकडाऊन शिथिल करतांना विविध क्षेत्रांना गती
मुंबई – राज्यातील १०० टक्के नागरिकांना महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात आला आहे. निवारा केंद्रात असलेल्या साडेपाच ते सहा लाख परराज्यातील मजुरांना नाश्त्यासह दोनवेळेसच्या जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली गेली आहे.
हे सरकार अनेकप्रकारे राज्यातील जनतेला मदत करत आहे. रेशनकार्ड नसलेल्या लोकांना अन्नधान्य देण्याची राज्य शासनाची मागणी केंद्र शासनाने आता मान्य केली आहे त्याबद्दल आपण केंद्र शासनाला धन्यवाद देतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शिवभोजन योजनेअंतर्गत ५ रुपये थाळी याप्रमाणे रोज लाखो थाळ्याचे वितरण होत आहे. गोरगरिबांना जेवणाची सोय उपलब्ध होत आहे. उपचार, अन्नधान्याचे आणि जेवणाचे वितरण हाही मदतीचाच एक भाग आहे.
राज्य शासनाला या श्रमिकांचे ओझे नव्हतेच परंतू मजूर घरी जाऊ इच्छित होते त्यांना ट्रेनच्या माध्यमातून घरी जाण्याची मान्यता मिळवल्यानंतर सुमारे ७ लाख मजुर ४८१ ट्रेन्सच्या माध्यमातून त्यांच्या राज्यात गेले. यांच्या प्रवाशी भाड्याची ८५ टक्क्यांची रक्कम केंद्र सरकार राज्याला देईल तेंव्हा देईल परंतू त्या आधी राज्य शासनाने मजुरांच्या प्रवास शुल्कासाठी १०० टक्के खर्च करत आतापर्यंत ८५ कोटीहून अधिक रक्कम उपलब्ध करून दिली आहे. राज्याची रोज ८० ट्रेन सोडण्याची मागणी असतांना केवळ ३० ते ४० ट्रेन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मजुरांची व्यवस्थित नोंदणी करून त्यांना चांगल्या पद्धतीने पाठवले जात आहे त्यामुळेच जातांना परराज्यातील हे मजुर महाराष्ट्राचा जयजयकार करत परतत आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
रेल्वेप्रमाणेच राज्याच्या ३२ हजाराहून अधिक बसेसद्वारे ३ लाख ८० हजार मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. यावर राज्य शासनाने ७५ कोटी रुपये खर्च केले आहेत.
हवाईमार्गाने येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन केले जात असून योग्य तयारीसह आणि नियोजनासह ही सेवा सुरु करावयाची असल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
संकटात राजकारणापेक्षा जबाबदारी पार पाडणे महत्वाचे
संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे तो आपण पाळत असून त्यावर अधिक भाष्य न करता आपण आजघडीला जनतेच्या आरोग्यावर आलेले संकट दूर करण्यास प्राधान्य दिल्याचे तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहातांना जनहितासाठी कृषी, शिक्षण, उद्योग आणि अर्थ या क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी रमजान ईद निमित्ताने राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. सर्वधर्मियांनी आतापर्यंत घरातच सण, उत्सव आणि समारंभ साजरे केले असल्याचे सांगतांना त्यांना घरात राहूनच नमाज अदा करण्याचे व संपुर्ण जग कोरोनामुक्त होण्यासाठी अल्लाह कडे प्रार्थना करण्याचे आवाहन केले.
लॉकडाऊन एकदम लागू करणे जसे योग्य नव्हते तसेच लॉकडाऊन एकदम उठवणे ही योग्य नसल्याचे, हळुहळु आपली आयुष्याची गाडी पुर्वपदावर आणतांना जपून पावले टाकत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. टाळेबंदी उठवतांना काळजीपूर्वक सुरु केलेल्या गोष्टी गर्दी करून आणि बेशिस्तीने वागून पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शाळा आणि शेतीचा हंगाम
जूनमध्ये शाळा आणि शेतीचा हंगाम सुरु होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही, अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत ही लवकरात लवकर निर्णय होईल, पालकांनी काळजी करू नये.
राज्याची गाडी हळुहळु पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न
राज्यात ७० हजार उद्योगांना परवानगी दिली त्यात ५० हजार उद्योग सुरु झाले आहेत. सहा लाख लोक कामावर परतले आहेत अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रीन झोनमध्ये जिल्हांतर्गत एसटी बसेसची वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मालवाहतूक सुरुच आहे. राज्या-राज्यातून मोठ्याप्रमाणात स्थालांतर होतेय, देशातील सर्वात मोठे स्थलांतर म्हणून याकडे पाहिले जातेय अशा वेळी राज्याच्या जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांनी थोडा धीर धरावा, हे सांगण्याचा मला हक्क आहे कारण तुम्ही माझे आहात अशी भावनिक सादही मुख्यमंत्र्यांनी घातली.
रंगभूमी, चित्रपट आणि मालिका चित्रिकरणासाठी योग्य काळजीसह ग्रीन झोनमध्ये मान्यता देण्याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही-मुख्यमंत्र्यांची ग्वाही
खरीपाच्या हंगामाची पूर्ण तयारी करण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर बि-बियाणे आणि खतांची उपलब्धता करून देण्यात येत असल्याची व हा एक नवा प्रयोग असल्याची माहिती दिली. टाळेबंदीत शेती, शेतीविषयक कामे, कृषीमालाची वाहतूक, अवजारांची वाहतूक यावर कधीच बंदी नव्हती आणि राहणार नाही, शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
कापूस खरेदी व इतर धान्य खरेदी
आतापर्यंत ७५ ते ८० टक्के कापूस खरेदी झाली असून यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तरमहाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना दिलासा मिळाल्याचे ते म्हणाले.कापसाबरोबरच इतर धान्ये जसे मका, भरड, धानासह इतर धान्याचीही राज्य शासन खरेदी करत आहे.
तुमच्या शिस्तीमुळे हे घडले
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आतापर्यत राज्यातील जनतेने शासनाला खुप चांगले सहकार्य केले आहे कारण त्यांचा शासनावर विश्वास आहे परंतू काहीजणांना अजून याचे गांभीर्य नाही.त्यामुळेच राज्य शासनावर ते टीका करतांना दिसत आहेत. मे अखेरपर्यंत केंद्र शासनाने महाराष्ट्रात दीड लाख रुग्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. ही माहिती खबरदारी घेण्यासाठी कळविण्यात आली होती. परंतू आजघडीला राज्यात ४७ हजार १९० रुग्ण आहेत आणि १३ हजार ४०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. म्हणजे सध्या राज्यात कोरोनाचे ३३ हजाराच्या आसपास ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. हे सर्व तुमच्या प्रयत्नांचे आणि सहकार्याचे फलित आहे. तुम्ही शिस्त पाळली म्हणून हे घडले असल्याचेही ते म्हणाले.
आरोग्य सुविधांमध्ये वाढ
राज्यातील विविध आरोग्य सुविधांची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली ते म्हणाले की राज्यात ३ लाख ४८ हजाराहून अधिक कोरोना चाचण्या केल्या गेल्या त्यात २ लाख ९८ हजारांहून अधिक चाचण्या कोरोनासाठी निगेटिव्ह आल्या. दुर्देवाने राज्यात १५७७ मृत्यू झाले. यात हायरिस्क पेशंटसह ऐनवेळी रुग्णालयात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सर्दी ताप, पडसे,खोकला यासह आता थकवा येणे, तोंडाला चव नसणे, वास न येणे यासारख्या नवीन लक्षणांची त्यात भर पडली आहे. कोरोना विषाणुचे हे सर्व प्राथिमक लक्षणे ज्यांना जाणवत असतील त्यांनी अंगावर दुखणे न काढता तत्काळ रुग्णालयात येऊन तपासणी करावी उपचार करून घ्यावेत असे आवाहन ही त्यांनी केले. नवजात अर्भकापासून ९० वर्षांच्या आजीपर्यंतची माणसे कोरोना मुक्त होऊन घरी गेल्याचे उदाहरण ही त्यांनी दिले.
पुढची लढाई आणखी गंभीर असेल, रुग्णांची संख्या वाढेल, असे असले तरी घाबरून जाऊ नका राज्य शासनाने मोठ्याप्रमाणात आरोग्य सुविधा उभ्या केल्या आहेत हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी देशातील पहिले फिल्ड हॉस्पीटल वांद्रा कुर्ला संकुलात उभे केल्याचे सांगितले तसेच ऑक्सीजनसह आयसीयु बेडस असलेल्या रुग्णालयांची मुंबईसह महाराष्ट्रात उभारणी होत असून काही लाखात रुग्णशय्या निर्माण केल्या जात असल्याची माहिती दिली. मे अखेरीस एकट्या मुंबईत मे अखेरीस १४ हजार बेडस् ऑक्सीजन आणि आयसीयुच्या सुविधासह उपलब्ध होतील हे ही त्यांनी सांगितले.
रक्तदान करा-जीव वाचवा
राज्यातील रक्तसाठा कमी झाला असून कोविड-नॉनकोविड रुग्णांसाठी पुढे येऊन रक्तदात्यांनी रक्तदान करावे, राज्याला पुन्हा एकदा तुमच्या रक्ताची गरज असल्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
पावसाळ्यात साथीच्या आजारापासून दूर राहा
पावसाळ्यातील साथीच्या आजारांना नियंत्रित ठेवण्यासासाठी पाणी उकळून पिणे, पावसात न भिजणे अशा गोष्टी कराव्याच लागतील असे स्पष्ट करून कोरोनासह सर्व साथीच्या आजारांपासून दूर राहण्यातच सर्वांचे भले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कोविड योद्ध्यांचे आभार
मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक आणि कोविड संकटात समोर येऊन लढणाऱ्या सर्व कोविड योद्ध्यांना त्यांच्या समर्पित सेवेसाठी धन्यावाद दिले. शासन त्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली. महापालिका घरोघरी जाऊन तपासणी करत आहे, काही लाख लोकांच्या तपासण्या झाल्या आहेत. रुग्णांनी दवाखान्यात येण्याआधी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कौतूक
विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणास राज्याचे सर्व भाग जिद्दीने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उतरल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण भागातील जनतेने जिद्दीने कोरोनाला दूर ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागाचे कौतूक केले.
मराठवाड्यात विदर्भात, कोकणात सिंधुदर्गमध्ये कोराना चाचणी प्रयोगशाळा सुरु केल्या असून आरोग्य सुविधांमध्येही मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
खळबळजनक… बीडमध्ये तिहेरी हत्याकांड; महिलेसह दोन मुलांची हत्या
धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात आढळले नवे 14 कोरोनाबाधित रुग्ण; एकुण रुग्णसंख्या 36