परभणी जिल्ह्यात जिंतूर व सोनपेठ वगळता नागरी भागासह लगतच्या परिसरात संचारबंदीत वाढ
परभणी, प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन खबरदारी घेत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून दि. 05 जुलैच्या रात्री 12.00 पासून ते दि. 08 जुलै रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत जिंतूर व सोनपेठ नगर परिषद हद्द सोडता इतरत्र नागरी भागासह लगतच्या परिसरात संचारबंदी आदेश लागू केले आहेत.
बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. जिल्ह्यातील वाढती रूग्णांची संख्या लक्षात घेता खबरदारी घेणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी परभणी यांनी खबरदारीचा पूर्णा, पालम, गंगाखेड, पाथरी, मानवत व सेलू नगपालिका व नगर परिषदा हद्द व त्या लगतचा 3 किमी परिसरात संचारबंदी लागू केली आहे. तसेच परभणी शहर महानगरपालिका हद्द व लगतचा 5 किमी परिसरातही कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
यांना मिळणार सवलत
या संचारबंदीतून खालील व्यक्ती व समूहांना सूट राहणार आहे.
– सर्व शासकीय कार्यालये / त्यांचे कर्मचारी / त्यांचे वाहने / सर्व शासकीय वाहने
– सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने
– शासकीय निवारागृहे / कॅम्पमध्ये तसेच बेघर व गरजुंना अन्न वाटप करणारे सेवाभावी संस्था व त्यांची वाहने
– अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती
– वैद्यकीय आपात्काल व अत्यावश्यक सेवा
– प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक
– दुध विक्रेते (केवळ सकाळी 6 ते 9. एका ठिकाणी थांबून दूध विक्रीस बंदी)
– खत वाहतूक, त्यांची गोदामे / दुकाने, त्याच्यासाठी लागणारी वाहने व कामगार
– राष्ट्रीयीकृत बँका केवळ रास्तभाव दुकानदार यांच्याकडून चलनाव्दारे पैसे भरणा करून घेणे या बाबीकरिता.
याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती/वाहने रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल.
मेगा भरती : 17 हजार पदांसाठी 6 जुलैपासून ऑनलाइन रोजगार मेळावे
Breaking News – सेलूतील एसबीआय बँकेचा कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह
read more – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?