अंबरनाथमध्ये वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा
अंबरनाथ,दि 15 (प्रतिनिधी)ः)अंबरनाथ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ह्यांच्याकडून चिखलोली धरणातुन होत असलेल्या अशुद्ध (दुषित) पाणी वितरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी युवा नेते प्रविण गोसावी ह्यांच्या नेतृत्वात अंबरनाथ शहराच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर दि.12 ऑक्टोबर 2020 रोजी धरणे आंदोलन करीत धडक मोर्चा काढण्यात आला.
यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या निदर्शनास आणुन देण्यात आले की, मागील 8 महिन्यापासुन आपल्या नियोजनानुसार शुद्ध पाण्याचे वितरण एम.आय.डी.सी. कडून अंबरनाथ शहरात होत होते. परंतु कोरोना संक्रमणाच्या आधी आणि सध्या आपण चिखलोली धरणातून पाणी वितरण केल्यापासून पुन्हा त्याच पाईप लाईनमधून अशुद्ध (दुषित) पाणी नळाला येत आहे. हि बाब लक्षात घेत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ह्यांना निवेदनाव्दारे सांगितले की, अंबरनाथ चिखलोली धरणातून जलशुद्धीकरण होत नसल्याने सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही बाब गंभीर असून आपणास हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून आपल्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लाऊ असे आश्वासन देण्यात आले आहे.
जर पिण्याचे शुद्ध पाणी वितरित न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यांस सर्वस्वी आपण जबाबदार असाल असा इशारा वंचित बहुजन आघाडी युवा नेते प्रविण गोसावी ह्यांनी दिलेल्या निवेदनात देण्यात आला.याप्रसंगी ठाणे जिल्हा कोषाध्यक्ष मधूकर साखरे, माजी शहर अध्यक्ष अविनाश गाडे, अशोक सुर्यवंशी, रोहित बनसोडे, संतोष तायडे, प्रभाकर डोंगरे, मनोहर पाटील, संतोष कुऱ्हाडे, दुर्गाताई गोसावी, सिंधुताई डोंगरे ह्यांच्यासह आदी पदाधिकारी, महिला आघाडी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.