मनाचे श्लोक – भाग ३

0 318

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥3॥

अर्थ: पहाट झाल्यावर श्रीरामाचे स्मरण करावे आणि नंतर श्रीरामाचे नाव उच्चारावे. सद्वर्तन थोर असते ते सोडू नये. कारण सदाचारी माणूसच सर्व जनांमध्ये धन्य होतो.

समर्थ हे प्रभु रामचंद्रांचे उपासक होते व नित्यनियमाने त्यांचा जप करत त्यांनी देशाटन केले व जगाचा सर्वांगाने अभ्यास केला.

आधी प्रपंच करावा नेटका।
मग घ्यावे परमार्थ विवेका ॥
समर्थांनी मानवी जीवनाचा आणि परमार्थाचा समन्वय साधला आणि प्रपंच परमार्थाच्या आड येत नाही असे ठामपणे सांगितले.
या मनाच्या श्लोकात समर्थ रामदास स्वामी आपल्याला समजावत आहेत की प्रभात प्रहरी प्रथमत: प्रभु रामचंद्रांना स्मरून मग त्यांचे नांव घेऊन सद्भावनेने दिवसाचा आरंभ करावा.

त्याचप्रमाणे ही वैखरी सुद्धा त्या ईश्‍वराची आपल्याला देणगी आहे, त्या वैखरीतून जर आपण वाईट, विचित्र वाणी किंवा शिव्या शाप दिला तर त्या ईश्‍वराला योग्य कसे वाटेल.
वैखरी म्हणजे…
जिच्यातुन शब्द बाहेर पडतात ती चतुर्विध वाणींपैकी चवथी; (परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी) स्वपरवेद्यवाचा.
’उच्चार होता अक्षराला । वैखरी बोलिजे ।’
वैखरी ही आपली वाग्देवता, वाचाशक्ती व जीभ आहे. ’घातल्या मुखामध्यें प्रेमानें वैखरा । वाटतो आतां तो हृद्यांतरीं खराखरा ।’ –
त्यामुळे आपण मुखातुन उच्चार करताना राम नाम आधी घेऊन कार्यारंभ करावा. ज्याच्याने प्रभुचे सानिध्य प्राप्त होते व मोक्ष मार्ग दिसतो.

त्या वैखरीचा सदुपयोग करून उत्तम वाणी जर ठेवली तर आपुलकीचा ओलावा आणि समाजामध्ये मानसन्मान लाभेल. म्हणून या वैखरीतून द्वेष, निंदा, मत्सर, राग, अभिमानाची वाणी न म्हणता, प्रभू चे नामस्मरण करावे.
मुखातुन येणारे उद्गार व भाषा ही त्या परमात्म्याची कृपा समजुन सदा सर्वदा त्याचे नांव घेऊन आचरण व व्यवहार व प्रपंच नीट नेटका करावा. कारण त्याचे आभार मानणे हे केवळ अशक्य आहे.

’तुझें उदारत्व श्रीहरी । वदूं न शके प्राकृत वैखरी ।’
विवेकाने वागणे याला सदाचार म्हणतात. विचार व आचार यांच्यात समन्वय असेल तर त्याला सदाचार असे बोलतात.
श्रीकृष्णांनी गीतेत दैवी संपत्तीची लक्षणे सांगितली. कारण ती ज्ञानास कारणीभूत आहेत. सद्गुणांवाचून म्हणजेच दैवी संपत्तीविना ईश्‍वरप्राप्ती नाही असे श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे.

दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ।16-5।गी।
सदाचारी मनुष्याला नेहमी सुखाची प्राप्ती होते. तो बुद्धिमान आणि दिर्घायुषी होतो. सदाचाराचे खूप सारे रुप आहे जसे आई-वडील आणि गुरु यांच्या आज्ञेचे पालन करणे, परोपकाराची भावना ठेवणे, दया करणे, यासाठी नियतीने सर्व आनंदाच्या सुखाचे सार सांगितले आहे. ज्याच्या आचरणाने समाजाचे सर्वाधिक कल्याण होते, ज्यामुळे लौकिक आणि आत्मिक सुख प्राप्त होते.
सदाचार आणि दुराचार यांच्यात भेद करण्याचे सामर्थ्य फक्त मनुष्यात आहे. पशु आणि किडे-मुंग्यांमध्ये ही क्षमता नसते. यासाठी शास्त्रात सदाचाराचे पालन करण्यावर भर दिलेला आहे.

प्रत्येक क्षण सार्थकी लावावा. ही आपल्यामधूनच नवीन माणूस घडवून साधक बनवण्याची प्रक्रिया आहे. आणि अवगुण टाकून उत्तमगुण घेणे म्हणजेच सदाचरणाने वागणे ही यातुन होणारी शिकवण मनुष्य जन्मास धन्यत्व बहाल करते.

हेच उत्तम आचरण आहे. जो हे आचरण उत्तम करतो तोच जगामध्ये, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवितो व जगणे सार्थक घडवतो.
॥जय जय रघुवीर समर्थ॥

ज्योती कुलकर्णी, मुंबई

error: Content is protected !!