स्मृतिभ्रंश / डिमेन्शिया (Dementia)

0 96

 

हा मानसिक आजार नसून मेंदूचा आजार आहे. मेंदुतील मज्जापेशींमध्ये होणार्‍या बिघाडमुळे हा आजार होतो. वाढत्या वयाबरोबर हा आजार होण्याची शक्यता वाढते म्हणून वृद्धांमध्ये विशेषतः अतिवृद्धांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

डिमेन्शिया म्हणजे मतिमंदत्व नव्हे. डिमेन्शिया या आजारास मराठीत स्मृतिभ्रंश असेही म्हणतात. यामध्ये हळूहळू स्मरण शक्ती कमी होते. तसेच इतरांनी बोललेले समजून घेण्याची क्षमता कमी होते. सारासार विचार करण्याची क्षमता कमी होते. अशा प्रकारे मानसिक क्षमतांमध्ये उत्तरोत्तर र्‍हास होत जातो. डिमेन्शियाचे प्रकार

 

1) अल्झायमर्स डिसिज
2) व्हॅस्कुलर डिमेन्शिया
3) लेवी बॉडी डिसिज
4) फ्रन्टो टेम्पोरल डिमेन्शिया (पिक्स डिसीज)
5) हटिगटन्स डिसीज
6) पारकिन्शन डिसीज
7) एच.आय.व्ही. रिलेटेट डिमेन्शिया
8) हेड ट्रामा रिलेटेड डिमेन्शिया

 

 

डिमेन्सियाची लक्षणे

खाली दिलेली सर्वच लक्षणे प्रत्येक रुग्णात असणे आवश्यक नाही. डिमेन्शिया कोणत्या स्टेज मध्ये आहे त्यानुसार लक्षणे कमी अधिक प्रमाणात दिसून येतात.
1) विस्मरण : तसे कधी एखाद्या गोष्टींबद्दल विस्मरण कुणाला ही होऊ शकते आणि जास्त वयात तर होतेच. वस्तू कुठे ठेवल्या आहेत किंवा काल कोण भेटून गेले किंवा थोड्यावेळापूर्वी झालेले संभाषण हे जर वारंवार विसरून जात असेल तर वृद्धांमध्ये हे एक डियेन्सियाचे महत्त्वाचे लक्षण आहे. हे हळू हळू सुरू होते.
2) जागेचे वेळेचे भान नसणे : घराच्या जवळच्या मंदिरातून येताना देखील रस्ता चुकणे; कधी दिवसाला रात्र तर रात्रीला दिवस समजणे. तारीख, वार सांगून देखील नेहमीच लक्षात न राहणे.
3) नेहमी वापरातील वस्तूचे नाव विसरणे. उदा. चश्मा दाखवल्यावर देखील सांगता न येणे. कधी कधी जेवण किंवा चहा पिला तर विसरतात आणि पुन्हा मागतात.
4) तसेच नेहमीची वस्तू वापरता न येणे. जसे ब्रश करता न येणे किंवा केस विंचरता न येणे.
5) एक गोष्ट पुन्हा पुन्हा विचारणे किंवा पुन्हा पुन्हा म्हणणे.
6) भाषेच्या अडचणी : जसे बोलताना अडखळतात योग्य शब्द सापडत नाही. तसेच लिहितांना नेहमीच्या हस्तअक्षरात बदल तसेच नीट लिहिता न येणे.
7) कधी कधी अचानक चिडतात किंवा मारतात.
8) कधी कधी खूप जरूरीपेक्षा जास्त शांत राहतात, उदास निराश राहतात.
9) काही जण संशय घेतात, तूम्ही माझ्या बद्दल बोलत आहात किंवा मला मारणार आहात.
10) काही जनांना कपड्यात लघवी किंवा संडास होते. 11) काही जणांना चक्कर येते किंवा पडतात.

 

 

डिमेन्सियाची कारणे

1) अल्झायमर डिसीज – यामध्ये मेंदूमधील सलकाय व गायराय यांचे आंकुचन होते आणि सेरिब्रल व्हेन्ट्रीकलचा आकार वाढतो. मेंदूमधील अ‍ॅसिटायईल कोलिन ह्या न्यूरोट्रान्समिटरचे प्रमाण कमी होते.

2) व्हॅस्कुलर डिमेन्सिया – या मध्ये मेंदूतील एक किंवा अनेक भागात छोट्या छोट्या रक्तवाहिण्यांमध्ये (केशवाहीण्या) रक्त गोठून स्ट्रोक होतात आणि मेंदुच्या त्या भागात रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे तो भाग व्यवस्थित काम करत नाही. ज्या रुग्णांना रक्तदाब असतो आणि नियमित उपचार घेत नाहीत. यांना हा आजार होऊ शकतो. व्हस्कुलर डिमेंन्सिया मध्ये लक्षणे अचानक उद्भवू शकतात. कधीकधी बराच काळ लक्षणांमध्ये वाढ होत नाही आणि मग अचानक एखादा नवीन स्ट्रोक होऊन लक्षणे वाढतात. या प्रकारामध्ये काही रुग्णांत पॅरालायसीसची काही लक्षणे असतात.

3) लेवी बॉडी डिमेन्सिया यामध्ये रुग्णाच्या सेटीब्रल कॉरटेक्समध्ये लेवी इंक्लूजन बॉडीज असतात. यामध्ये रुग्णास हातापायास कंपण येतात. हालचाल मंदावते. काही जनांना भास होतात. संशय येतात, काही जणांना डिप्रेशन येते. खूप रडू येते.

4) फ्रन्टोटेम्पोरल डिमेन्सिया (पिक्स डिसीज) यामध्ये जास्त प्रमाणात मेंदुच्या फन्टोटेम्पोरल भागात एट्रोपी दिसून येते. याभागात मेंदुच्या पेशी कमी झालेल्या असतात तसेच न्यूरोनल पिक्स बॉडीज पण आढळून येतात. यामध्ये काही रुग्णांत प्रथम स्मृतीभ्रंश होण्या ऐवजी भावनिक संतुलन बिघडलेले असते. यामध्ये अनुवंशीकतेचा भाग जास्त असतो.

हटींगटन्स डिसीज यामध्ये स्मरणशक्ती भाषा यावर फारसा फरक पडलेला नसतो; पण शरीराच्या हालचाली मंदावलेल्या असतात. यामध्ये मेंदुच्या सबकॉर्टीकल भागामध्ये आजार व्यापलेला असतो.

6) पारकिनसन्स डिसीज पारकिनसन्स हा मेंदुचा वेगळा आजार आहे. 20 ते 30 टक्के पारकिनसन्स असलेल्या व्यक्तींना डिमेन्सिया देखील असतो. अशा व्यक्तिीना उदासपणा, नैराश्य जाणवते.

7) एच.आय.व्ही. रिलेटेट डिमेन्सिया एच.आय.व्ही. इन्फेक्शन्स

झालेल्या व्यक्तीमध्ये साधारणतः 14 टक्के लोकांमध्ये डिमेन्शिया होतो.

8) हेड ट्रॉमा रिलेटेड डिमेन्सिया हा डिमेन्सिया बॉक्सर्स किंवा फुटबॉल

खेळणार्‍या लोकांमध्ये वारंवार होणार्‍या मेंदुच्या आघातामुळे काही वर्षानंतर दिसून येतो. या सर्व प्रकारांमध्ये अल्झायमर डिसीज हा जास्त प्रमाणात आढळून येतो. त्याच्या पाठोपाठ व्हस्कुलर डिमेन्शियाचे प्रमाण असते तर इतर डिमेन्सिया कमी प्रमाणात आढळून येतात.

 

उपचार व घ्यावयाची काळजी

उपचार : प्रथम नातेवाईकांनी रुग्णाच्या स्मरणशक्तीत; चालण्या, बोलण्यात तसेच इतर भावनिक बदल काय झाले आहेत हे समजावून घेतल्या जाते. त्याच वेळेस रुग्ण कशा पद्धतीने वागतो हे पण समजते. तसेच रुग्णाला काही स्मरणाबद्दल प्रश्‍न विचारल्यानंतर रुग्ण कसे उत्तर देतो यावरून देखील बर्‍याच गोष्टी लक्षात येतात. त्यानंतर रुग्णाची शारीरिक तपासणी करून वाढत्या वयाप्रमाणे आणखी काय शारीरिक बदल झाले आहेत का हे लक्षात येते. तसेच रुग्णाच्या रक्ताची तपासणी करून इतर काही शारीरिक बद्दलाचे ज्ञान होते. उदा. ब्लडशुगर, हिमोग्लोबीन, किडणीचे कार्य, यकृताचे कार्य; इत्यादी. तसेच मेंदुचा एम.आर.आय. करून देखील डिमेन्शियाची खात्री होते. औषधोपचार शारीरिक व रक्तांच्या तपासणीनुसार प्रथम रुग्णाचा औषधोपचार अवलंबून असतो. यामध्ये जर रुग्णाचे ब्लडप्रेशन कंट्रोल मध्ये नसेल तर प्रथम ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी औषधोपचार केल्या जातो. तसेच रुग्णांमध्ये व्हॅस्कुलर डिमेंशियाची सुरूवात असेल तर रक्त गोठून परत परत मेंदुमध्ये स्ट्रोक होऊ नयेत म्हणून औषधोपचार सुरू केल्या जातो.

 

 

तसेच ब्लडशुगरचे प्रमाण व इतर शारीरिक घटकांचा असमतोल असेल तर तो औषधोपचारांनी व्यवस्थित केल्या जातो. तसेच कोलीन इस्टईज इनहेबीटर्स औषधी अल्झायर्स डिसीजमध्ये वापरली जातात म्हणून आसिटाईल कोलीनचे प्रमाण वाढते.

 

तसेच जर रुग्णास भावनिक असमतोल होत असेल जसे चिडचिड करणे किंवा रडणे किंवा संशय घेणे; मारणे. तेव्हा मनोविकार तज्ञांच्या सल्ल्याने औषधी घ्यावीत. घ्यावयाची काळजी सर्वप्रथम जर लक्षणावरून हा आजार सुरूवातीच्या अवस्थेतच लक्षात आला तर रुग्णास समजावून मनोविकारतज्ञ किंवा न्यूरोलॉजीस्ट डॉक्टरांकडे दाखवून घ्यावे. रूग्णास स्मरणशक्ती कमी होत आहे याची जाणीव नसेल तर चांगल्या शब्दात जाणीव करून द्यावी. अशा स्टेजमध्ये एकटे बाहेर जाणे किंवा ड्रायव्हींग करणे तसेच महत्त्वाचे अकाऊंट पाहणे किंवा बॅन्केंचे कामकाज चांगल्या पद्धतीने समजावून सांगून करू देऊ नये. बर्‍याच रुग्णांमध्ये स्मरणशक्ती कमी होत आहे हे त्यांना समजत नाही. ते वेगळ्या पद्धतीने सांभाळून घेतात. जसे जर डॉक्टरांनी आज दुपारी काय जेवण केले ? असा प्रश्‍न विचारल्यावर ते तोच प्रश्‍न घरातील इतर व्यक्तींना विचारतात की मी दुपारी काय खाल्लं आहे. पण माझ्या लक्षात नाही हे सांगत नाहीत.

 

 

आजार जेव्हा थोडा जास्त प्रमाणात आहे तेव्हा रुग्णाच्या नेहमीच्या लागणार्‍या गोष्टी जसे चष्मा रुग्णाच्या जवळ ठेवावा. त्यांना जेवन, कपडे, स्नान हे वारंवार सांगून करून घ्यावे लागते. तसेच घरातील इलेक्ट्रीकची बटन्स तसेच स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस या गोष्टींपासून रुग्णास दूर ठेवावे.
बर्‍याचे वेळेस रूग्णास व्यक्ती कुणी अपरिचित आहे किंवा अपरिचित व्यक्ती परिचित आहे असे वाटते. तसेच आपणास एकटे सोडून निघून जातील असे वाटते.

 

अशा वेळेस त्यांची काळजी घेणारे घरातील जे कुणी एक दोन जण आहेत त्यांनीच नेहमी काळजी घेताना रूग्णास धीर द्यावा. रूग्णाचे बोलणे कधी कधी समजले नाही तरी सर्व समजत आहे अशा पध्दतीने आपल्या चेहर्‍यावरील हावभाव ठेवावेत.
आजार जसाजसा गंभीर होत जातो तशा प्रकारे रूग्णास सहकार्य करावे लागते. नंतरच्या स्टेजमध्ये रूग्णास टुथब्रश करता येत नाही. स्वतःचे कपडे स्वत घालता येत नाहीत. तेव्हा ही कामे आपण करून द्यावी लागतात.

 

रूग्ण दिवसा किंवा रात्री एकटा घराबाहेर जाऊ शकतो. तेव्हा रात्रीच्या वेळेला रूग्णाच्या खोलीत रूग्णाबरोबर आपण स्वतः झोपून आतून कुलून लावून घ्याचे जेणेकरून आपण झोपेत असताना रूग्ण एकटा घराबाहेर जावून हरवू नये किंवा कुठे पडू नये.
तसेच रूग्णाच्या खिशात एखादे कार्ड ज्यावर घराचा पत्ता तसेच घरातील व्यक्तीचे फोन नंबर ज्यामुळे रूग्ण हरवल्यास त्यांना घरी पोहोचवण्यासाठी इतरांना मदत होईल.
रूग्णास जरी बर्‍याच गोष्टींची समज नसते तरी रूग्णास सोबत घेवून चहा पाणी पिणे, गप्पा मारणे, गाणी ऐकणे, टी.व्ही. पहाणे, कॅरम खेळणे ह्या गोष्टी करू शकता.

 

शेवटच्या स्टेजमध्ये रूग्णास लघवी किंवा संडास झाल्याचे कळत नाही. तेव्हा डायपर लावून वेळोवेळी पाहावे लागते. रूग्णाचा जर भावनिक समतोल बिघडत असेल तर डॉक्टरांच्या सल्याने योग्य तो आषधोपचार घ्याा. नेहमीची औषधी देणे आवश्यक आहे. हे सर्व करताना नातेवाईकांच्या मानसिक अवस्थेवर परिणाम होतो. तेव्हा मनोविकारतज्ञाकडून समुपदेशन व गरज पडल्यास औषधी घ्यावी.
राम काकांना 75 वर्षे पूर्ण झाली होती. तरीपण शरीरप्रकृती चांगली होती. रोज सायंकाळी ते घराजवळील एका मंदिरात दर्शनासाठी जात असत. तसेच एकादिवशी ते साधारण सायंकाळी सहा वाजता मंदिराकडे गेले व देवदर्शन झाल्यानंतर घरी परतण्याच्या रस्त्यानेच येण्या ऐवजी दुसर्‍याच रस्त्याने जात राहिले व तसेच अर्धा तास चालत राहीले. नंतर एका मुलाने त्यांना पाहिले आणि इकडे कुठे जात आहेत असे विचारले तेव्हा रामू काका मी घरी जात आहे असे म्हणाले. तेव्हा त्या मुलाच्या लक्षात आले की हे घरचा रस्ता चुकलेले आहेत. मग तो मुलगा रामू काकांना घेऊन त्यांच्या घरी आणत होता. तोपर्यंत जवळपास 7.30 वाजले होते व घरातील लोक रामूकाकाची चौकशी मंदिराजवळ करून आले होते. ते येऊन गेले एवढेच समजले पण नंतर कुठे गेले कुणालाच माहीत नव्हते. ते घरातील लोक जवळपासच्या ओळखीच्या लोकांना, पाहूण्यांना फोन लावून विचारू लागले. तो मुलगा रामूकाकाला घेऊन घरी आला व सर्व हकिगत सांगितली. तेव्हापासून घरातील लोक रामू काकांना एकट्याला बाहेर जाऊ देत नसत. कुणीतरी त्यांच्या सोबत जात असे. यामुळे कधी कधी रामू काका चिडत असत. नंतर नंतर रामूकाकांना कुणी काही बोलले असेल ते थोड्या वेळानंतर विसरून जात असत. कुणी त्यांना भेटून गेलेले. नंतर ते सुद्धा विसरून जात असत. बोलत असताना अचानकच थांबत असत व पुढे काय बोलायचे हे विसरून जात असत. पूर्वी ते अभंग म्हणत असत. भजन करत असत. आता आवडही कमी झाली. त्यांचा चष्मा किंवा काठी कुठेतरी विसरायचे आणि मग जेव्हा पाहिजे तेव्हा घरातील लोकांना म्हणायचे तुम्ही माझा चष्मा व काठी कुठे ठेवली असे म्हणून चिडत असत. जाणारी नंतर काही महिन्यांनी तर चहा घेतलेला किंवा जेवण केलेले विसरून जात व पुन्हा मागत आणि दिल्यानंतर त्यांचे पोट बिघडत असे. आणि नाही दिले तर चिडत असत, घरी कुणी भेटण्यासाठी आल्यानंतर मला घरातील लोक चहा, जेवण देत नाहीत असे सांगत असत. स्नान करण्यासाठी; कपडे घालण्यासाठी वारंवार मागे लागावे लागत असे. ि कधी कधी रात्री 2-3 वाजताच घराबाहेर जाण्यासाठी धडपड करत आणि ते दिवस असल्यासारखेच समजत असत. नंतर नंतर एकच प्रश्‍न पुन्हा पुन्हा विचारत असत. जसे कुणी आल्यानंतर तू कधी आला? सांगितल्या नंतर देखील थोड्या वेळाने पुन्हा तू कधी आला असं विचारत असत.

 

 

काही दिवसांनी घरातील लोकांना ओळखत नसत. मी कोण आहे म्हटल्यानंतर कधी दुसर्‍याच कुणाचे नाव घेत असत तर कधी चूप बसून रहात. नंतर ते घरातील लोकांवर संशय घेत व तुम्ही माझ्या वस्तू चोरत असता असे म्हणत. तुम्ही मला एकटे सोडून निघून जाल म्हणून रडत असत. काही महिन्यांनी त्यांना कपड्यात लघवी संडास झाल्याचे कळत नसे.

 

 

पुढे त्यांना दात कसे घासावेत किंवा केस कसे विंचरावेत व शर्ट कसा घालावा हे सुद्धा जमत नसे. संडास, लघवी कपड्यात होत असल्यामुळे त्यांना डायपर लावत असत. त्यांना घरातील लोक स्नान घालून कपडे घालून देत असत. त्यांचे दात घासत असत. एका महत्त्वाच्या कागद पत्रावर त्यांची सही लागत होती पण ती करताना ते विसरून गेले होते. नंतर त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हते. रात्री झोपत नसत. सारखा घरातील लोकांना आवाज देत असत व जवळ आल्यानंतर काहीच बोलत नसत. त्यांचे वजन कमी झाले होते. अन्न-पाणी दुसर्‍यांच्या हातानेच द्यावे लागे.

 

 

घरातील एक व्यक्ती चोवीस तास त्यांच्या सोबत रूम मध्ये बसून त्यांची सेवा करत असे. एके दिवसी त्यांना ताप आला तेव्हा खूप गोंधळून गेले होते व जेवण पाणी सुद्धा पिण्याचे कळत नव्हते. मग नातेवाईक डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी औषधोपचारास सुरूवात केली व डॉक्टरांनी विचारले ह्यांना स्मृतीभ्रंस म्हणजे विसरणे कधी पासून सुरू झालेले आहे काही टेस्ट केल्या आहेत का? तेव्हा नातेवाईकांनी सर्व हिस्ट्री सांगितली व वयाप्रमाणे होत आहे म्हणून आम्ही कुठे दाखवले नाही.

 

 

मग डॉक्टरांनी एका मनोविकारतज्ञास आपल्या हॉस्पीटल मध्ये बोलवून रुग्ण दाखवला. मनोविकारतज्ञ डॉक्टरांना यांना स्मृतिभ्रंश म्हणजे डिमोन्शिया हा आजार झालेला आहे व या आजारात वयानुसार काही व्यक्तींच्या मेंदुमध्ये बदल होऊन ही लक्षणे निर्माण होतात. मग त्यांच्या मेंदुचा एम.आर.आय. करण्यास सांगितला.

 

 

एम.आर.आय. च्या रिपोर्ट मध्ये कॉर्टीकल अ‍ॅट्रोपी व इश्‍चीमीक चेंजेस झालेले आढळून आले. काही दिवस फिजिशियन व सायकॅट्रीस्ट यांच्या उपचारांनी रुग्णाची गोंधळलेली अवस्था कमी झाली. रोज रात्री शांत झोपत असत पण स्मृतीभ्रंश मध्ये काही फरक पडला नव्हता. स्मृतीभ्रंशाबद्दल मनोविकारतज्ञ म्हणाले की, ह्यांचे हे लक्षण आता असेच राहील. फारसा फरक पडणार नाही. तेव्हा त्यांची काळजी घ्या. त्यांना लागणार्‍या दैनंदिन गरजेच्या गोष्टी रूमच्या मध्ये त्यांना दिसतील अशा ठेवा. रूममध्ये प्रकाश व्यवस्थित असू द्या. त्यांचे तोंड धुणे; स्नान करणे हे तुम्ही स्वतः करून घ्या. त्यांना वेळेवर जेऊ घाला. अशा प्रकारे त्यांची काळजी घ्या.

 

डॉ. सुभाष काळे, मानसोपचार तज्ञ
मन शांती हॉस्पिटल, पाथरी रोड परभणी

error: Content is protected !!