ज्येष्ठा गौरी पूजन; गौराई आली सोन्याच्या पावलांनी….
महाराष्ट्रात गौरी-गणपती हा उत्सव अगदी उत्साहात साजरा होतो. या उत्सवाची लगबग श्रावण महिन्यापासूनच सुरू होते.
सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाल्यावर दुस-या दिवशी ऋषीपंचमी व मग म्हणजे काल गौरींच आगमन झालं. कोकण, खान्देश, मराठवाडा, विदर्भ या भागात उत्सवाची वेगळी पद्धत पहायाला मिळते. पण, महिलांच्या या सणात भक्तीभाव एकच असतो.
भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात. गौरीला महालक्ष्मी म्हणतात व तो सर्वार्थाने रुढ शब्द सबंध महाराष्ट्रात पूर्वापार वापरला जातो. लक्ष्मी ही विष्णूपत्नी तर महालक्ष्मी ही महादेव पत्नी पार्वती होय. जी ज्येष्ठा गौरी म्हणून संबोधली जाते.
महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती-जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो. शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरांतून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात. लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमीच्या सुफलीकरणाचा आहे.
घरोघरी गणपती सोबत ज्येष्ठा गौरीचे पूजन भक्तीभावाने व श्रद्धेने महिला करत आहेत.
गौरीपूजनाच्या दिवशी सासरी गेलेल्या मुलीला माहेरी बोलावून तिला गोड जेवण देऊन ओटी भरतात.
पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.
व्रतविधी-
हे व्रत तीन दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. (महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. – ही एक रूढी आहे.)
गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. थाटामाटात घरात गौरीला आणताय प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.
महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच करंज्या, लाडू, सांजो-या, फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
तिसर्या दिवशी खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्यास नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.
या तिसऱ्या दिवशी महाराष्टातील ग्रामीण बहुजनसमाजात गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात व नवीन पीक येईपर्यंत गळ्यात ठेवतात. आश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दोऱ्यालाच महालक्ष्मी समजतात.
गणेश उत्सवा सोबत ज्येष्ठागौरींचा हा सण महिलांसाठी व सर्व कुटुंबियांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा असतो.
गौरी गणपतीच्या आगमना,
सजली अवघी धरती,
सोनपावलांच्या रुपाने
ती आली आपल्या घरी,
होवो आपली प्रगती,
लाभो आपणास सुख समृद्धी
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!ज्योती कुलकर्णी, मुंबई
लेखिका, स्पेशल एजुकेटर व समाजसेविका