मराठी भाषा गौरव दिन

0 54

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.
शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांनी २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे य़ोजले व दर वर्षी तो उत्साहाने साजरा होत आहे. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं.

“इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी”,अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवांनी मराठीचा उल्लेख करत तिस ब्रम्हविद्या म्हंटले आहे, शब्दब्रह्मही म्हंटले आहे. याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते. अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो. मराठी भाषेला जवळजवळ अडीच हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे हे अनेक संशोधकांनी सिद्ध केले आहे. मराठी भाषा एक प्राचीन परंपरा सांगणारी समृद्ध आणि अभिजात भाषा आहे.

कविवर्य कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर हे एक महान कवी होते. महाकवींची प्रतिभा लाभलेले विष्णू वामन शिरवाडकर ज्ञानपीठ पारितोषिक पुरस्कार प्राप्त दुसरे  मराठी भाषिक साहित्यिक ठरले. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे २७ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला होता.

विष्णू वामन शिरवाडकर यांना तात्यासाहेब शिरवाडकर म्हणूनही ओळखले जाते. तात्यासाहेब शिरवाडकरांच्या मोठ्या बहिणीचे नाव कुसुम होते त्या नावावरूनच त्यांनी आपले कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरले. अर्थातच वि. वा. शिरवाडकर यांची संपूर्ण कविता कुसुमाग्रज या टोपणनावाने प्रसिद्ध झाली आहे.
तात्यासाहेब शिरवाडकर हे कवी, लेखक, समीक्षक, नाटककार,कथाकार अशा विविध रूपांनी मराठी भाषेला परिचित आहेत. कुसुमाग्रजांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेने आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीने जागतिक दर्जाचे लेखन केले.

मराठी भाषेचा हा गौरव दिन शासकीय पातळीवर आणि विविध संस्थांमध्ये त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालय इत्यादी ठिकाणी अतिशय गौरवपूर्ण रीतीने साजरा केला जातो. विविध प्रकारचे उपक्रम याप्रसंगी आयोजित केले जातात. विविध प्रकारच्या साहित्यप्रकारांच्या स्पर्धासुद्धा यानिमित्ताने होतात. याशिवाय साहित्यकार पुरस्कार सुद्धा दिले जातात.

मराठी भाषा जपली पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणजे नक्की काय ? फक्त मराठी बोलणे किंवा पोशाख घालणे म्हणजेच मराठी जपणे नाही. तर महाराष्ट्राला लाभलेला इतिहास, संत- साहित्य परंपरा, मराठी संस्कृती या गोष्टी जपल्या पाहिजेत आणि हाच वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला पाहिजे. नुसता मराठीचा आव आणून काही होणार नाही तर भाषेला आत्मसात करणे गरजेचे आहे.

मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना आपल्या भाषेचा गौरव कसा होईल या साठी प्रयत्न केला पाहिजे. या मराठी भाषेतून अनेक लेखक, कवी, संत आपल्या महाराष्ट्रात घडले. ज्यांनी आपल्या वाणीतून मराठीचा महिमा दाही दिशा पसरविला. तोच वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम आपले आहे.

मराठी आमची बोली
अथांग तिची खोली
काय वर्णू तिची गोडी
अमृतासमान…
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्योती कुलकर्णी, मुंबई
लेखिका, स्पेशल एजुकेटर व समाजसेविका

error: Content is protected !!