मोदी आवास घरकुल योजनेत आता विमुक्त जाती व भटक्या जमातींचा समावेश

0 28

परभणी – सर्वांसाठी घरे 2024 या राज्य शासनाच्या धोरणानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन 2024 पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत मोदी आवास घरकुल योजनेमध्ये आता विमुक्त जाती व भटक्या जमातींचा समावेश करण्यात आला आहे.

 

 

राज्यात इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली होती याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम देखील देण्यात आला होता. याच कार्यक्रमात दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या शासन निर्णयात विमुक्त जाती व भटक्या जमातींचा समावेश करण्यात आला आहे. सदर प्रवर्गास दिनांक २८जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती लागू असतील.

 

 

सदर योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

मोदी आवास घरकुल योजनेत परभणी जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी
मोदी आवास घरकुल योजनेत परभणी जिल्ह्याला एकूण १३५९६ एवढे घरकुल मंजुरीसाठी उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये मानवत – ६२४, पालम – १३१०, सोनपेठ – ८६१, पूर्णा – १०९५, परभणी – २३५७, पाथरी – ९४५, गंगाखेड – १३४३, जिंतूर – ३५९९, सेलू – १४६२ असे तालुका निहाय उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते.

त्यापैकी जिल्ह्यात एकूण १३४६२ एवढ्या घरकुलांचे मंजुरी देण्यात आली असून एकूण ९९.०१ टक्के उद्दिष्ट परभणी जिल्ह्याने पूर्ण केले आहे. तसेच ७१९१ एवढे खाते क्रमांक व्हेरिफाय करण्यात आले आहेत. त्याच बरोबर ५९०१ पैकी ५७९३ एवढ्या लाभार्थ्यांचे एफ टी ओ जनरेट करण्यात आले आहेत. शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी दिली आहे.

 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्या मार्गदर्शनात ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ गरजेचा होता अशा लाभार्थ्यांच्या नावांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेत केला असून परभणी जिल्ह्यात घरकुल मंजुरीचे ९९.०१ टक्के काम पूर्ण केले आहे. लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलाचे बांधकाम लवकर व उत्तम दर्जाचे करावे.
रश्मी खांडेकर, प्रकल्प संचालक
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
जिल्हा परिषद, परभणी

error: Content is protected !!