परभणीत शिवजयंती निमित्त शोभायात्रेचे आयोजन : आ.डॉ. राहूल पाटील
परभणी : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे दि.१९ फेब्रुवारी रोजी परभणी विधानसभा मतदार संघाच्या वतीने छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभा यात्रेमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील ढोल- झांज पथकासह लेझीम, वारकरी, सजीव देखावे व चित्तथरारक कवायती करण्यात येणार असल्याची माहिती आ.डॉ.राहूल पाटील यांनी दिली आहे.
शहरात शिव जयंती निमित्त शनिवार बाजार येथून सायंकाळी ५ वाजता शोभायात्रेस सुरूवात करण्यात येणार आहे. ही शोभायात्रा नानलपेठ कॉर्नर, शिवाजी चौक, गांधी पार्क, अष्टभुजा देवी मंदिर, नारायणचाळ कॉर्नर मार्गे छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळा परीसरात शोभायात्रेचा समारोप होणार आहे. या शोभायात्रेत देशभरातील नामांकीत ढोल व झांज पथक सहभागी होणार आहेत. याशिवाय गोंधळ पथक, लेझीम पथक व वारकरी मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे चित्त थरारक कवायती सादर करणारे विविध पथक सहभागी होणार आहेत. तसेच या शोभायात्रेत सजीव देखावे साकारण्यात येणार आहेत. याशिवाय भगवे झेंडे घेवून शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. या शोभायात्रेत शिवभक्त नागरीकांसह, युवक, महिला व युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.
या शोभायात्रेच्या यशस्वितेसाठी परभणी विधानसभा मतदार संघातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक,महिला आघाडी, दलित आघाडी आदी परीश्रम घेत आहेत. या भव्य शोभायात्रेत शिवप्रेमी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आ. डॉ.पाटील यांनी केले आहे.