परभणीत आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘शिवगर्जना’चे आयोजन

0 561

परभणी, दि.19 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्य शासनाकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जात आहे. परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुल, येथे दि. 21,22 आणि 23 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता आशिया खंडातील सर्वात मोठे ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे महानाट्य सर्व नागरिकांना विनामुल्य पाहता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी 3 प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस करण्यात आले आहेत. हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे. सुमारे दहा हजार शिवप्रेमींसाठी या महानाट्याचे 3 दिवस सलग आयोजन केले जाणार आहे. यासाठी वाहनतळ, रस्ते मार्ग, आपत्ती व्यवस्थापन, बैठक व्यवस्था, जनजागृती आदी विषयांवर चर्चा व नियोजन करण्यात आले आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठे असलेल्या ‘शिवगर्जना’ महानाट्यचे आजवर संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत 106 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीतही हे महानाट्य सादर झाले आहे. या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदिपक आतिषबाजीही असणार आहे. तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड असणार आहे. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून, दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे. 12 व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंत पूर्ण इतिहास या महानाट्याद्वारे सादर करण्यात येणार आहे.या महानाट्याला परभणी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आवाहन केले आहे,

error: Content is protected !!