मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला (Parbhani Loksabha Seat to Rashtriy Samaj Party) (रासप) देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय समाज पक्षाला जागा देताना महायुतीचे उमेदवार म्हणून महादेव जानकर (Mahadev Jankar) हे निवडणूक लढवणार असून त्यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाची एक चळवळ, आरक्षणाचा लढा उभा केला आहे. त्यांचे योगदान समाजासाठी मोठया प्रमाणात असल्यानेच परभणीची उमेदवारी घोषित करत असून अतिशय चांगल्या फरकाने ते विजयी होतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
हा निर्णय घेताना परभणी जिल्हयातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. राजेश विटेकर, बाबाजानी दुर्रानी, प्रतापराव देशमुख यांच्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची प्रदीर्घ चर्चा केली आहे. त्या चर्चेनंतर आज महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणाही सुनिल तटकरे यांनी केली.
राजेश विटेकर हे अतिशय चांगले पदाधिकारी आहेत. मागील निवडणुकीत त्यांचा थोडाशा फरकाने पराभव झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यामार्फत एका तरुण कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक योग्य ती संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्लमेंटरी बोर्ड नक्की घेणार आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.