परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश सुरू-मंत्री हसन मुश्रीफ

0 96

परभणी/प्रतिनिधी
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगांतर्गत मेडीकल असेसमेंट अॅण्ड रेटींग बोर्ड यांच्याकडे झालेल्या द्वितीय अपिलात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी या संस्थेस शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी १०० विद्यार्थी प्रवेशित करण्यास मान्यता देण्यात आल्याचे दिनांक ५ जुलै २०२३ च्या पत्रान्वये कळविले आहे. या मान्यतेच्या अनुषंगाने येथे प्रथम वर्षाकरीता १०० विद्यार्थी प्रवेशास दिनांक ५ जुलै २०२३ च्या शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालय परभणीसाठीचे प्रवेश सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत आमदार बाबाजानी दुर्राणी, आ. विक्रम काळे, आ.शशिकांत शिंदे, आ.सतिश चव्हाण, आ. अमोल मिटकरी यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.
त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी काही गोष्टींचा खुलासा केला. परभणी जिल्ह्यासाठी ४३० खाटांचे तसेच १०० विद्यार्थी क्षमता असणारे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारणीची तत्कालीन मुख्यमंत्री यांनी दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी घोषणा करून त्यासंदर्भात दिनांक २८ मार्च २०२२ रोजी वा त्यासुमारास शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून तपासणी करण्यात येऊन त्यात इमारत, पदे व इतर भौतिक सुविधांबाबतचे कारण दाखवित वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला. शासनाने या वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन घेतली तात्पुरत्या स्वरुपात इमारतीची सोय केली तथापि, प्राध्यापकांच्या जागा न भरता इतर ठिकाणाहून उसनवारीने प्राध्यापकांच्या प्रतिनियुक्ती केल्या आहेत, हेही खरे आहे काय, असल्यास, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून तपासणी करण्यापूर्वी जिल्हा प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अधिष्ठाता व इतर संबंधित जबाबदार यंत्रणांनी पुर्व नियोजन न केल्याने दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी वा त्यासुमारास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून आलेल्या अंतिम तपासणीत इमारत व मनुष्यबळाच्या गंभीर त्रुटी आढळून आल्यामुळे आयोगाने या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अमान्य केला आहे, हे ही खरे आहे काय ? असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, त्यानुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अमान्य होण्यास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली व चालू वर्षात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येते आहे. नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ? असे सवाल करण्यात आले होते.
त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या दिनांक ४ जुलै २०२३ च्या आदेशान्वये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे दिलेल्या प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, शासन निर्णय दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ अन्वये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणीकरीता पदनिर्मितीस मंजूरी देण्यात आली असून पदभरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु आहे.

error: Content is protected !!