अनुभवांचा सांगाती-केशव.बा.वसेकर:वाचा अरुण चव्हाळ यांनी घेतलेली मुलाखत
साहित्यक्षेत्रात साहित्यिक आणि प्रकाशक म्हणून अखंड कार्यमग्न असणारे केशव बाबनराव वसेकर यांचा सध्या अमृतमहोत्सव सुरु आहे. येत्या २१ जुलैला त्यांच्या वयाची ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. ग्रंथपाल , प्राध्यापक, मार्गदर्शक म्हणून कार्यरत असणारे केशव बा. वसेकर प्रकाशक, नातवांचे शिक्षण सहजतेने पार पाडणारे काळाचे शिलेदार आणि साक्षीदार आहेत. परभणी जिल्ह्यातील खानापूर या खेडेगावात आजही स्वतः शेती-मातीत रमणारे ते हाडाचे शेतकरी आहेत. कविता-ललित गद्य-वैचारिक, बालसाहित्य, संपादन आणि आत्मचरित्र असे अनेक प्रकारच्या लेखनाचे धनी असलेले केशव वसेकर सुरुवातीपासूनच आजपर्यंत आणि उद्याचे मराठीतील महत्त्वाचे कवी आहेत. या साधक साहित्यिकाने लेखकांना नैतिक अभिरुची जपण्याविषयी सातत्याने कडक सुनावणी केलेली आहे. जुन्या आणि नव्या लिहित्या हातांना बळ देणारा हा माणूस अनुभवांचा सांगाती आहे. विशेषतः गावाकडच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारे आणि अभिव्यक्तीच्या पातळीवर अव्वल करणारे, मातीसारखी साहित्यिकांची सृजनात्मक मांदियाळी जपणारे हे थोर माणूस आहेत. सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांना महाविद्यालयीन जीवनात पारखून त्यांनी त्यांचा ग्रंथ वाचनाचा नाद पूर्ण करून घेतला. आज इंद्रजित भालेराव महत्त्वाचे कवी म्हणून सर्वांना ज्ञात आहेत. इंद्रजित यांच्यासारखेच अनेक विद्यार्थी चांगले साहित्यिक आहेत. या अनुषंगाने या जुन्याजाणत्या महत्त्वाच्या साहित्यिकांचे मौलिक विचारधन खास वाचकांसाठी… साहित्यमूल्य… साहित्यगर्भ असलेली त्यांची मते चिरंतन आहेत.अमृतमहोत्सव निमीत्त परभणीतील साहित्य चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्ये श्री.अरुण चव्हाळ यांनी घेतलेली मुलाखत वाचकांसाठी खास देत आहोत….
प्रश्न १ :-आयुष्याची जडणघडण पुस्तकांनी कशी केली?
उत्तर:- मी वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी बाराखडी आणि पुस्तक वाचायला घावटी(गावठी) शाळेत शिकलो. वसा येथे प्राथमिक व जिंतूर येथे माध्यमिक शिक्षण घेताना पुस्तके वाचनाचा छंद लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र चौदाव्या वर्षी वाचले आणि त्यातून प्रेरणा घेतली. या वाचनातून आपोआपच मार्गदर्शन मिळत गेले. त्याप्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच मी घडत गेलो. पोथी सारखे पुस्तकांचे पारायण करायचे नसते; तर संवेदनशील मनाने आणि भावनेने पुस्तकातील रसायन प्राशन करायचे असते. पुस्तकांतील लेखकांच्या अनुभवांचे जीवनात उपयोजन केल्यामुळे माझी जडणघडण झाली. आई-वडील-शिक्षक असे कोणीही मला मार्गदर्शन केले नाही. मीच माझा रस्ता शोधत राहिलो.
प्रश्न २ :- शिकताना-शिकवताना वाचनाचा नाद कसा पुरविला?
उत्तर : -आमच्या गावी १९५२ च्या पहिल्या निवडणुकीनंतर शासनाकडून ग्रामपंचायतला भरपूर पुस्तके मिळाली होती. ही पुस्तके सहावी ते दहावीपर्यंत वाचून घेतली. जिंतूरला शिकताना रात्रीचे ग्रंथालय चालवण्यास मला दिले होते. या काळात मी वर्तमानपत्रे व मासिके वाचली. त्या काळात गावात वाचलेल्या अनेक पुस्तकांची नोंद माझ्याकडे आजही आहे.
प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकवताना विषयाच्या खोलात जाण्यासाठी त्या विषयाचे त्याविषयीचे संदर्भ असलेले वाचन मी करत होतो. उदाहरणार्थ-बालकवी शिकवताना सर्व बालकवी वाचणे; त्यांचे चरित्र वाचणे; त्यांच्या कवितेची समीक्षा वाचणे; अशा प्रकारे वाचनाचा विस्तार होत गेला. असे करताना शक्यतो ग्रंथालयावर अवलंबून न राहता, स्वतःचा ग्रंथ संग्रह वाढवणे यावर मी भर देत होतो. स्व नियोजन , नियमित आणि नियंत्रित वाचन या वाचन संस्कारांच्या सरावाने शिकताना-शिकवताना मी वाचनाचा नाद पुरविला.
प्रश्न ३ :- ग्रंथपाल, प्राध्यापक आणि मार्गदर्शक या भूमिकांमध्ये जीव ओतून झोकून दिले; काय-काय घडलं आणि घडविलं?
उत्तर –कोणतेही काम मन लावून किंवा जीव ओतून केल्याशिवाय आनंद मिळत नाही व यशही प्राप्त होत नाही. वाचनाचे महत्त्व मला समजले होते. आपल्या प्रमाणेच इतरांना वाचते करावे; त्यांना ‘वाचवावे’ म्हणजे वाचनातून लोकांना संस्कारित व सुसंस्कृत करावे.”शहाणे करून सोडावे सकळजन”, अशी माझी यामागे सामाजिक भूमिका होती. इतरांची उंची वाढली की, खुजी माणसे त्यांचे डूख धरतात. इंद्रजित भालेरावला ग्रंथालय मुक्त द्वार केले , लोकांनी तक्रारी केल्या. हे तक्रारी करणारे चांगले वाचन न करणारे होते. वाचकांना दिलेल्या पुस्तकांचे मला पैसे भरावे लागले. पण विद्यार्थ्यांच्या पदरी चांगले विचार देऊ शकलो. हीच माझी मोठी ठेव आहे. मी स्वतः घडलो आणि अनेक विद्यार्थी घडविले. माझे ऐकणारे, माझ्या संपर्कात येणारे अनेक विद्यार्थी नोकरीस लागलेले आहेत. माझेही सर्व कुटुंब सुसंस्कृत व समृद्ध झालेले आहे.
प्रश्न ४ :- अस्मितादर्श चळवळीतून उदयाला आलेले तत्कालीन एक महत्त्वाचे कवी आपण आहात; विद्रोही कवी म्हणून आपण अभिव्यक्ती कशी केली?
उत्तर : –‘अस्मितादर्श’ त्रैमासिकाने प्रथम मला प्रसिद्धी दिली. प्रा. गंगाधर पानतावणे यांनी फार चांगले मार्गदर्शन केले. अस्मितादर्श लेखक मेळाव्यास बोलावीत राहिले. औरंगाबादला गेल्यानंतर घरच्यासारखी वागणूक दिली. तेव्हा अस्मितादर्शच्या प्रत्येक अंकात माझी कविता प्रसिद्ध होत असे, सामाजिक जाणिवा व्यक्त करणारे साहित्य प्रसिद्ध करणे, ही अस्मितादर्शची भूमिका होती. गरिबीने माझी कोंडी केली होती. भवतालच्या परिस्थितीविषयी मनात विद्रोह निर्माण होत होता. वाचनातून कमवलेल्या शब्दांचा शस्त्रासारखा उपयोग करून भावनांची अभिव्यक्ती कवितेच्या माध्यमातून होऊ लागली. अस्मितादर्शची विचारसरणी आणि माझे जगणे समान पातळीवरचे असल्यामुळे माझ्या अभिव्यक्तीला विचारपीठ मिळाले.
प्रश्न ५ :–कविता, ललित गद्य, वैचारिक, संपादन, बालसाहित्य आणि आता आत्मचरित्र असे अनेक प्रकारचे लेखन आणि यातील वैविध्ये कसे साकारले?
उत्तर:-कवितेत कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त अर्थ सामावलेला असतो. कवितेतील सौंदर्यही सूक्ष्म आणि तरल असते. ललितगद्य कवितेचेच विस्तारित रूप असते. साहित्यप्रकार हाताळण्यात ज्याची त्याची प्रकृती असते. प्रत्येक प्रकारांची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. कविता आणि ललितगद्य हे माझ्या आवडीचे प्रकार आहेत. इतर वाड्.मय प्रकारांपेक्षा माझे कवितेचे वाचन अधिक होते. कोणत्याही विषयाचा सूक्ष्म अभ्यास केला की, तो सोपा वाटतो.
माझे वैचारिक वाचन खूप आहे. वैचारिक वाचनात पुरोगामित्त्व, विज्ञाननिष्ठा, वास्तवता यांना महत्त्व असते. वैचारिक वाचनामुळे सामाजिक भूमिका तयार होते. भेसळीसारखे समाजाचे शत्रू कोण आहेत? हे कळते. त्यांच्या विरोधात आपल्या साहित्यातून भूमिका घेता येते. त्यांचे मुखवटे काढता येतात. त्यामुळे लेखकास वैचारिक पिंड असणे गरजेचे असते. या सगळ्या भट्टीतूनच मी कवितेचा टोकदारपणा काढू शकलो आणि जपूही शकलो.
बालकांविषयीची आपुलकी आणि प्रेम माझ्या ठिकाणी अतिरिक्त प्रमाणात आहे. आई फार लहानपणी वारल्यामुळे माझे बालपण हरवले.”आईविना बालपण म्हणजे, कोरड्या खडकावरचे रोप” असते. माझ्या वाट्याला आलेल्या बालपणात माझ्या बालसाहित्याचे बीज सापडते. प्रथम मुलांना सांभाळले; नंतर नातवांचा गोतावळा यातून माझे बालसाहित्य लिहिलेलं आहे. प्रतिभास प्रकाशनामुळे मी अनेक चांगले ग्रंथ संपादित केले. येणारे आत्मचरित्र जुन्या-नव्याचा सांधा जोडणारे असेल. मी वसा या गावचा आणि साहित्याचा वसा घेतलेला म्हणून इंद्रजित भालेराव यांच्याशी चर्चा करून त्याचे शीर्षकही ‘वसा केशवाचा’ असे केलेले आहे. आता वाचकांचा अनुभव मला घ्यायचा आहे.
प्रश्न ६ : साहित्याच्या क्षेत्रातील गोंडर बाजूला करून विचारांचं खळं कसे आबादी ठेवावे? अनुभवांचे गोंदण सांगा ना?
उत्तर:-गोंडर म्हणजे सत्त्वहीन धान्य, ज्यात कस नसतो, पोषक तत्त्वे नसतात. जीवनाच्या सर्व क्षेत्रात असे हलके, भारी असते. प्रखर अनुभव, संघर्ष, अव्वल दर्जाची प्रतिभा ज्या लेखकाजवळ असते, तो दर्जेदार साहित्य निर्माण करू शकतो. ज्वारी आपण पाखडून घेतो. नेमके असेच साहित्य निर्मिती बाबतीतही म्हणता येईल. जीवनात आलेले अस्सल अनुभव कसदार साहित्य निर्मितीचे बीज असते. संघर्षातून, विरोधातून जेव्हा लेखक मार्ग काढतो त्याच्या या अनुभवांनी घेतलेले शब्द रूप कसदार असते. असेच काहीसे माझ्या जीवनात घडले. पोरकेपण, गरिबी, ढोरं वळणे, केळं विकणे, मकत्त्याचे शेण काढणे अशा अनुभवांचे पीक माझ्यात आले. यामुळेच कदाचित माझ्या साहित्याचे-विचारांचे खळं आबादी राहिले. आबादानी माझ्या वाट्याला आली. मी समाधानी आहे.
प्रश्न ७ :- वाचकांची अभिरुची वाचनाने समृद्ध होते; पण लेखकांची नैतिक अभिरुची जपण्याविषयी आपण सातत्याने कडक सुनावणी करता; लेखकांनी काय जपले पाहिजे?
उत्तर:- नैतिकता सर्वांनीच जपली पाहिजे. त्यामुळे स्वतः माणूस सुखी होतो. एखाद्या माणसाची नैतिकता किंवा अनैतिकता त्याच्यापुरती मर्यादित राहते. लेखकाची नैतिकता समाजाला व्यापून असते. समाज मुका असतो. लेखक बोलका असतो. लेखक स्वतःच अनैतिक असेल; तर तो सत्याचा आविष्कार करू शकणार नाही. ज्याने चारित्र्य गमावले त्याने सर्वकाही गमावले. असे सर्वस्व हरवून बसलेला लेखक अस्सल साहित्य निर्मिती करू शकत नाही. चारित्र्यहीन लेखकाने कितीही बुरखा घेतला तरी त्याचे नागवेपण उघडे पडत असते. काळाच्या कसोटीवर त्याचे साहित्य टिकत नाही. लेखकाने अंतरबाह्य निर्मळ असले पाहिजे, अशी माझी लेखक असण्याची अट आहे. लेखकाने आपले चारित्र्य जपावे, असे मला वाटते.
प्रश्न ८:-अमृत महोत्सव पूर्ण करताना प्रकाशक, शेतकरी आणि आजही ग्रंथालय चळवळ व नातवांचे शिक्षण सहजतेने पार पाडणारे आपण काळाचे शिलेदार आणि साक्षीदार म्हणून काय भाष्य कराल?
उत्तर:- आईच्या मांडीवर खेळायला मिळाले नाही. शेतीच्या मांडीवर मात्र बालपणापासून खेळलो. मामाचे शेत घराला लागून असल्यामुळे नकळत्या वयापासून शेतीशी माझा संबंध आला. आतापर्यंत मी शेतीशी जोडून आहे. ग्रंथांचे वाचन, ग्रंथपालाची नोकरी आणि नंतर या क्षेत्राशी संबंधित पुस्तक प्रकाशन, असे मी करत राहिलो.
वाचनाने आपल्या जीवनात क्रांतिकारक बदल होतो. याचे छोटेसे उदाहरण मी स्वतः आहे. यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न करीत राहिलो. आपली प्रगती आपणास करावी लागते. दुसरा कोणी फार तर मदत करू शकतो. सकारात्मक दृष्टी ठेवली की, जीवनात आनंद निर्माण होतो. काळाच्या पटावर आपली नाममुद्रा उमटवली पाहिजे. हे काम निश्चित सोपे नाही. त्यासाठी अथक प्रयत्नांची आणि दृष्टीची गरज असते. आजची पिढी गतिमान आहे; काही गोष्टींची तिने दखल घेऊन पुढे जावे; पुढे येणा-याचे आणि पुढे जाणाऱ्याचे मनस्वी स्वागत!
मुलाखत घेणारे : अरुण चव्हाळ, परभणी.
७७७५८४१४२४