आत्मचरित्र म्हणजे  स्त्री जन्माचा एक महत्वाचा दस्तऐवज आहे-सौ संध्या फुलपगार

0 50

सेलू / नारायण पाटील –   माधुरी साकुळकर लिखित “तिची कथा” हे पुस्तक म्हणजे स्त्रीच्या  आत्मचरित्राचे  ट्रेलर आहे . एका पुस्तकात १०० स्त्रियांचे आत्मचरित्र  लिहिण्याचे अत्यंत अवघड काम माधुरी साकुळकर यांनी केले .हे निश्चितच अभिनंदनीय असेच आहे .ज्या बायका वाचत असतात त्या कधीच रडत नाहीत व ज्या बायका लिहीत असतात त्या कधीच मरत नाहीत . आत्मचरित्र म्हणजे स्त्री जन्माचा एक दस्तऐवज आहे . पूर्वी संस्कार व संसार याच्या जोखडात सतत स्त्रीला जोखडले जात होते .परंतु आता स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले आहे .असे विचार सौ संध्या फुलपगार यांनी ” एक दिवस एक पुस्तक ” या उपक्रमात  “तिची कथा ” या पुस्तकाचे अंतरंग उलगडताना व्यक्त केले .

 

 

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा ,पुणे संचलित येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून” एक दिवस एक पुस्तक ” या  उपक्रमांर्गत  आयोजन करण्यात आले होते . यावेळी नूतन विद्यालयातील शिक्षिका  सौ संध्या फुलपगार यांनी माधुरी साकुळकर लिखित १०० स्त्री आत्मचरित्राचा मागोवा असलेल्या  “तिची कथा ” या पुस्तकाचे अंतरंग   उलगडले  .

११ मार्च-सोमवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हिंदी मराठी ग्रंथालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या सहसचिव सौ वसुधा महेश खारकर या होत्या . तर प्रमुख अतिथी म्हणून  येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ स्मिता संजय देऊळगावकर यांची  उपस्थिती होती .

 

 

मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी प्रास्ताविकात  डॉ शरद कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की ,वाचकाला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी गेल्या १५ महिन्यापासून ” एक दिवस एक पुस्तक ” हा उपक्रम सातत्याने चालू आहे .वाचन संस्कृतीची चळवळ चालू राहावी व वाचक घडावेत हा या ग्रंथालयाचा मुख्य उद्देश आहे .जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे व्यासपीठावर सर्व महिलांना स्थान देण्यात आले आहे .

 

नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत सेलू शहराच्या नावलौकिकात आपलं वेगळेपण जपणाऱ्या या हिंदी मराठी ग्रंथालयाच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास शहरातील सर्व सहृदयी पुरुष व महिला,मुली यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

error: Content is protected !!