लाडक्या बहिणींची महायुतीला साथ..देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदासाठी…….

0 236

महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळाली. या टफ फाईटमध्ये राज्यात कोणाची सत्ता येणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीला मिळणारं यश आणि समोर येणाऱ्या महायुतीच्या आकड्यांवरून लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या 4 महिन्यांपूर्वीच सरकारने लाडकी बहीण योजना आणली. चार महिन्यांचे साडे सात हजार रूपये अडीच कोटी महिलांच्या खात्यात टाकले. सरकारचा प्रचार लाडक्या बहिणीवरूनच केंद्रीत झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. संपूर्ण राज्यात साधारण दोन कोटी महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या. विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील लाभार्थी महिलांना साडे सात हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. त्यामुळे महिला मतदारांनी महायुतीला आपला कौल दिल्याचे दिसतेय.

लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या तीन तासांमध्ये महायुतीला (Mahayuti) प्रचंड मोठे यश मिळताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने राबवलेली लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) गेमचेंजर ठरल्याचे निकालांवरुन दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) प्रचंड मोठा फटका बसला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपने योग्य उमेदवारांची निवड, ग्राऊंड लेव्हलला केलेले काम, स्थानिक पातळीवर साधलेली जातीय समीकरणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मिळालेली साथ या जोरावर प्रचंड मोठे यश मिळवले आहे.

एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन राज्यात महायुतीची सत्ता स्थापन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुख्यमंत्री म्हणून जम बसवला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने एकट्याच्या बळावर 100 जागांचा आकडा पार केल्याने आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा आणखी भक्कम झाला आहे. भाजप नेतृत्त्वाने विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लढवत असल्याचे सांगितले होते. मात्र, आता निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्रीपदी भाजपचाच नेता बसेल, याबद्दलची शक्यता वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आता दिल्लीत जाणार, अशी चर्चा सुरु होती. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भाजपला अपयश मिळाले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला मोठा फटका बसला असता. मात्र, या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्त्व आणखी झळाळून निघाले आहे.

error: Content is protected !!