गुणरत्न सदावर्ते यांच्यासंबंधित मोठी बातमी…सहकार खात्याकडून मोठा दणका
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासंबंधित मोठी बातमी समोर येत आहे. सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याकडून मोठा दणका देण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचे संचालक पद रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे तज्ञ संचालक म्हणून गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे दोघेही एसटी बँकेवर राहू शकणार नाही. तर सर्वसाधरण सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.
एसटी कामगार संघटनेच्या संदीप शिंदेंनी तक्रार केली होती. ‘जेव्हापासून सदावर्ते यांची सत्ता एसटी कॉपरेटिव्ह बँकेवर आली तेव्हापासून ही बँक खड्ड्यात घालण्याचा जणू त्यांनी निर्णय घेतला होता आणि अशी शंकाच आता लोकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. खरंतरं एसटी कर्मचारी हवालदिल झालाय. गेल्या ८ महिन्यांपासून आम्हाला कर्ज मिळत नाही. अशातच सर्वसाधरण सभेत जे पोटनियम बदलायचे होते त्यांची माहिती सभासदांना दिली नाही. यासंदर्भातील तक्रार मी सहकार आयुक्तांकडे केली होती’, असं संदीप शिंदेंनी सांगितले.
‘तब्बल चार हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात एसटी बँकेतून ४७९ कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढल्या आहेत. कर्ज आणि ठेवी यांचा ताळमेळ बसत नसल्याने कर्जवाटपावर मर्यादा आल्या आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे खाते असलेली बँक वाचवण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करावी’, अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली होती.
राज्यातील ५० हून अधिक शाखांमध्ये ६२ हजार एसटी कर्मचारी बँकेचे खातेदार आहेत. बँकेत नवे संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर व्यवस्थापनात हुकूमशाही सुरू आहे. नियम डावलून बँकेत ३७ जणांची भर्ती करण्यात आली. ठेवी काढल्याने सीडी रेशो ९५.३५ टक्क्यांवर गेला आहे. राज्य सरकारच्या सहकार खात्याचे बँकेकडील दुर्लक्ष याला जबाबदार आहे. सभासदांनी मागणी केल्यानंतर बैठक ही लावण्यात येत नाही. संचालकांच्या मताशिवाय कर्जवाटप होत असल्याने भ्रष्टाचाराचे आरोप बरगे यांनी केले होते.