येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक गावातून उमेदवार उभे राहणार..पूर्णेत मराठा समाजाचा ठराव
पूर्णा, दि.२
येणाऱ्या काळातील निवडणुकीत सत्ताधाऱ्यासह विरोधकांना धडा शिकवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून पक्षविरहित एक ते दोन उमेदवारी अर्ज दाखल करुन गनिमी काव्याने आंदोलन करण्याचाठराव पूर्णा येथे पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
पूर्णा येथील नवा मोंढा परिसरातील शेतकरी भवनात तालुक्यातील, सकल मराठा समाजाच्या वतीने दि.२ शनिवार रोजी बैठक पार पडली.
राज्यात आजपर्यंत आलेल्या सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे,त्यामुळे येणाऱ्या काळातील निवडणुकीत सत्ताधाऱ्यासह विरोधकांना धडा शिकवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून पक्षविरहित एक ते दोन उमेदवारी अर्ज दाखल करणे, कोणत्याही शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे, सगे सोयरे यांचा अध्यादेश लागू केल्याशिवाय कोणत्याही नेत्यांनी गावात येऊ नये, आगामी काळातील सर्व आंदोलने जरांगे पाटलांच्या आदेशाप्रमाणे शांततेच्या मार्गाने पार पाडली जातील असे ठराव या बैठकीत संमत करण्यात आले. यावेळी तालुक्यातील समाज बांधवांनी, मराठा आरक्षण समन्वय समितीची स्थापना केली. लिमला (ता.पूर्णा) या गावातील गावकऱ्यांनी आगामी काळातील सर्वसामान्य उमेदवाराला उभे करण्यासाठी,१७ हजार रुपये निधी लोकवर्गणीतून जमा केल्याची सांगितले. या बैठकीस पूर्णा तालुक्यातील असंख्य मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती.