अखेर… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला राजीनामा… हालचालींना वेग…

Eknath Shinde Resignation

0 343

 

 

महायुतीच्या गोटात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले. यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे.

 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्रि‍पदाच्या नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने नवीन सरकारचा शपथविधी रखडला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.

 

मुख्यमंत्री पदाबाबत उत्सुकता कायम
मुख्यमंत्रिपदाबाबत विविध तर्क दिले जात आहेत. भाजपला १३२ जागा मिळाल्या, त्यांचे चार सहयोगी पक्षांचे उमेदवारही आमदार झाले. एका अपक्ष आमदाराने आधीच भाजपला पाठिंबा दिला आहे. आमच्याकडे १४० हून अधिक आमदार असल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. भाजपकडे इतके मोठे संख्याबळ असताना मुख्यमंत्रिपद त्यांनाच मिळेल आणि फडणवीस हेच राज्याचे नवे कर्णधार असतील, ही चर्चा सर्वाधिक आहे.

error: Content is protected !!