एक हजार रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया
परभणी : सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार व आ.डॉ.राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने वाटप करण्यासाठी नूतन महाविद्यालय जिंतूर रोड येथे गुरुवारी (दि.8) घेतलेल्या तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला.पहिल्याच दिवशी हजारो जेष्ठांची तपासणी करण्यात आली.मोतीबिंदू मुक्त परभणी विधानसभा या धोरणानुसार आज झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणी अंती एक हजार जेष्ठांची मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर आर पी मेडीकल महाविद्यालयात लवकरच मोफत शस्त्रक्रिया होणार आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र जोडण्यासाठी व त्यांच्या आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी आ. डॉ.पाटील यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंचची स्थापना करण्यात आली आहे. या जेष्ठ नागरीक मंचच्या माध्यमातून वेळोवेळी जेष्ठांसाठी शहरातील प्रभाग निहाय आरोग्य शिबिरे आयोजित करून त्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून मोफत औषधी देण्यात येत आहेत. तसेच अनेक जेष्ठ नागरीकांच्या आर.पी. हॉस्पीटल पाथरी रोड परभणी येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया करण्यात येत आहे.
या अनुषंगाने मतदार संघातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तसेच आवश्यक मोफत सहाय्यक साधने देण्यात येणार आहेत. त्यासाठी नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर ८ व ९ फेब्रुवारी रोजी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचे उदघाटन आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भेट दिली.दिवसभरात हजारो नागरीकांची तपासणी करण्यात आली.यामध्ये 2 हजार जेष्ठ नागरीकांची नेत्र तपासणी करण्यात येऊन त्यातील एक हजार रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.तर शिबिरात तपासणी केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार चालण्याची काठी, कोपर काठी, अल्युमिनीयम कुबड्या, तीन पायाची काठी, चार पायाची काठी, श्रवणयंत्र, घडीचे वॉकर, नंबरचा चष्मा, चाकांची खुर्ची, कमोड व्हीलचेअर, कमोड खुर्ची, कृत्रीम दात, संपूर्ण पाठीचा पट्टा, मानेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा, वॉकर, सिलीकॉन कुशन इत्यादी साहीत्य जेष्ठ नागरीकांची तपासणी करून पात्रतेनुसार मोफत वाटप करण्यात येणार आहे.अशी माहीती आमदार डॉ.पाटील यांनी यावेळी दिली.