तेव्हा मंत्रिपदासाठी पैसे.., दीपक केसरकरांचा मोठा दावा

0 117

राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेत (एकत्रित) असताना मंत्रिपदासाठी पैसे द्यावे लागत होते. माझ्याकडे तेवढे पैसे नसल्यामुळे मला मंत्रिपद मिळाले नाही, असा गौप्यस्फोट केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टिका केली होती. त्या टिकेला मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीत येऊन प्रत्युत्तर दिले. माझ्या श्रध्देवर संशय घेणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी मी शिर्डीहून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली आहे. मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचे? असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला आहे. मला गद्दार म्हणण्याचा अधिकार ठाकरे यांना नाही. त्याचे कर्तृत्व काय? मुख्यमंत्री असताना लोकांना सोडा आमदारांनाही भेटत नव्हते. मी तब्बल दोन महिने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर वाट बघत होतो. पण मला कधी भेट मिळत नव्हती. मग यांच्याकडे लोक थांबणार कसे? असा सवाल करत मी स्वतःहून शिवसेनेत गेलो नव्हतो. मला भाजपकडून निमंत्रण असताना उध्दव ठाकरे यांनी सतत निमंत्रण दिले म्हणून शिवसेनेत गेलो, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

दीपक केसरकर यांनी एकत्रित शिवसेनेत असताना पक्षाला एक कोटींचा धनादेश दिला असल्याचे जाहीर केले. कोट्यवधीचा निधी देऊनही मंत्रिपदासाठी आवश्यक असलेला निधी देऊ शकलो नाही, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले होते.आज मुंबईत माध्यमांशी बोलत असताना दीपक केसरकर यांनी या विषयावर अधिक भाष्य केलं. ते म्हणाले, “राजकारणात पक्ष चालविण्यासाठी पैसे लागतात. त्यासाठी देणगी द्यावी लागते. पण मंत्रिपदासाठी आम्ही पैसे कुठून देणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्ही आमच्या जागा विकून पक्षाला निधी देत होतो. पण मंत्रिपदासाठी मला पैसे देता आले नाहीत. त्याचे कधीही वाईट वाटले नाही.”दीपक केसरकर पुढे म्हणाले, “पैसे देऊन मंत्रिपद घेणं, हा काही उद्देश असू शकत नाही. मंत्रिपद हे सामान्यांच्या सेवेसाठी असतं. जे लोक खोके, खोके ओरडत आहेत, त्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की, आमच्यापैकी कुणीही पैसे घेतले नाहीत. आम्हाला मंत्रीपद देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडून एक रुपयाही घेतला नाही. पण आमचे आधीचे नेते मंत्रिपदासाठी पैसे मागत होते, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे खोके कोण गोळा करत होतं? हे लोकांनी समजून घ्यावं”, असा खळबळजनक आरोप राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. यावेळी केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीकास्र सोडले.

“आम्ही आमची श्रीमंती सोडून राजकारणात आलो, ते गरिबांची सेवा करण्यासाठी. उद्धव ठाकरे सावंतवाडीमध्ये येऊन माझ्याबद्दल काही बोलले, ते आमच्या जनतेला पटलेलं नाही. आमचं आयुष्य इथल्या जनतेसाठी गेलं आहे. मी पूर्वीपासून याठिकाणी आमदार होतो, उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलेलं नाही. उलट माझ्या लढाईमुळे शिवसेनेचा एक खासदार आणि एक आमदार निवडून आला. एकाएकी शिवसेनेची एक लाख मतं वाढली. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी शिवसेनेत आलो होतो. पण ते सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले. मग तुम्ही मराठी माणसाचे हित कसे साधणार? हिंदुत्वाचा सन्मान कसा राखणार? काँग्रेसचे नेते राहुल गांधी पदोपदी स्वा. सावरकारांचा अवमान करतात. त्यांना तुम्ही मिठी मारणार असाल तर आम्हाला हे मान्य नाही. सत्तेपोटी तुम्ही तत्त्व सोडत आहात”, अशी टीका केसरकर यांनी केली.

 

error: Content is protected !!