विद्यार्थी संसदद्वारे लोकशाही मूल्यांची रुजवणूक : माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचे प्रतिपादन

सेलू्तील नूतन विद्यालयात विद्यार्थी संसद सभा उत्साहात

0 44

 

 

सेलू / प्रतिनिधी – शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी संसद प्रतिनिधी सभेद्वारे मतदान जागृती करून लोकशाही मूल्यांची रुजवणूक करण्याचा नूतन विद्यालयाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी केले.

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा पुरस्कार योजनेतील ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत नूतन विद्यालयात शनिवारी, ३ फेब्रुवारी रोजी विद्यार्थी संसद प्रतिनिधी सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार लहाने बोलत होते. या वेळी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद सावंत, माजी नगरसेवक अविनाश शेरे, मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील, पांडुरंग कावळे, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक ठाकर, हिमांशी जैन आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी माजी आमदार लहाने यांनी विधिमंडळातील अनुभव व कामकाजाबाबत माहिती दिली. लहाने म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अधिक चालना मिळाली आहे. नूतन विद्यालयात लोकशाही पद्धतीने विद्यार्थी संसद प्रतिनिधी मंडळ गठीत करण्यात आले.

 

 

याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे.” मिलिंद सावंत म्हणाले, की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला सशक्त लोकशाही व्यवस्था दिली आहे. नूतन शाळेनेही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया आणि प्रतिनिधी मंडळ सभेच्या कामकाजाच्या माध्यमातून‌ लोकशाही पद्धतीने प्रश्न सोडविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरस्वती प्रतिमा आणि संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले. श्रुती कुलकर्णी हीने उद्देशिकेचे वाचन केले.‌ सूत्रसंचालन बाबासाहेब हेलसकर यांनी केले. संभाजी रोडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी एस.एस.पांडे, बी.एस.हेलसकर, आर.डी.कटारे, वर्षा कदम, एस.डी.गांजापूरकर, प्रतिज्ञा चव्हाण, गोपाल आम्ले, गजानन मुळी, एस.जी.रोडगे, केशव डहाळे, रामेश्वर पवार यांनी परिश्रम घेतले.

 

▪️ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नूतन विद्यालयातील विद्यार्थी संसद प्रतिनिधींच्या सभेला शाळेतील ५२ वर्ग प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी लेखी स्वरूपात तसेच सभेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता, अभ्यास, शालेय तासिकाबाबत प्रश्न विचारत कामकाजात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पर्यवेक्षक के.के.देशपांडे यांनी प्रश्न व समस्यांचे निरसन केले, तर वर्ग प्रतिनिधींनी शालेय शिस्त राखून अभ्यासासोबत क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक ठाकर याने नमूद केले.

फोटो ओळी : सेलू येथील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थी संसद प्रतिनिधी सभेचे उद्घाटन माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या हस्ते शनिवारी झाले. या प्रसंगी प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, मिलिंद सावंत, अविनाश शेरे, संतोष पाटील आदींची उपस्थिती होती.

फोटो ओळी : सेलू येथील नूतन विद्यालयात शनिवारी आयोजित विद्यार्थी संसद प्रतिनिधी सभेद्वारे विद्यार्थ्यांनी कामकाजात प्रत्यक्ष सहभाग घेतला.

error: Content is protected !!