संशोधनातून ज्ञान निर्मिती झाली पाहिजे-उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे
पाच दिवसीय उदबोधन शिबिराचे उदघाटन
परभणी / प्रतिनिधी – जगातील अनेक प्रगत राष्ट्रात संशोधानाच्या माध्यमातून नवनवीन शोध लावले जातात. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संशोधनावर भर देण्यात आला आहे. संशोधन फक्त माहितीचे संग्रह न होता त्यातून ज्ञानाची निर्मिती झाली पाहिजे असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे यांनी केले.
शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयातील गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने प्राध्यापकांसाठी आयोजित ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास सामोरे जाताना’ या विषयावर पाच दिवसीय उदबोधन शिबिराचे उदघाटन सोमवार (दि.०९) रोजी करण्यात आले यावेळी ते बोलत होते. उदघाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.एस. एम.लोणकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.उत्कर्ष किट्टेकर यांची उपस्थिती होती.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ.नितोंडे पुढे म्हणाले, देशात अनेक संस्था संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक पाठबळ देत आहेत याचा फायदा संशोधकांनी घेतला पाहिजे. येणाऱ्या काळात बहुविद्याशाखीय संशोधनाचे महत्व लक्षात घेता स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. यातून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती जागृत करण्यासाठी विशेष प्रयत्न होतील. आगामी काळात संशोधनाला गतिमान करण्यासाठी आणि संशोधनाची दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. जगातले सर्वोत्तम ज्ञान भारतात आहे हे सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून संशोधनाला वाव देण्यात आला आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ.एस. एम.लोणकर यांनी केला. या पाच दिवसात गुणवत्ता, स्वायत्तता, नॅक, ई- पाठ्यक्रम, संस्थांचे राष्ट्रीय मूल्यांकन इत्यादी विषयावर तज्ञ मंडळी संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उत्कर्ष किट्टेकर, सूत्रसंचालन डॉ.जयंत बोबडे तर आभार डॉ.सचिन येवले यांने केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.रामदास टेकाळे, डॉ.गणेश चलींदरवार,डॉ.विजय कळमसे, डॉ.प्रवीण जगताप, प्रा.शरद कदम, प्रा.माधव जाधव, सुरेश पेदापल्ली, सय्यद सादिक, साहेबराव येलेवाड आदींनी पुढाकार घेतला.