राजेशदादांच्या निष्ठा व प्रामाणिकपणाची पक्षश्रेष्ठींनी घेतली दखल,भरसभेत कौतुकाची थाप
कैलास चव्हाण
परभणी,दि 11 ः
लोकसभा निवडणुकीत परभणीची राज्यभर चर्चा झाली.परंतु यात सर्वाधीक चर्चा झाली ती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेशदादा विटेकर यांनी प्रामाणिकपणाने केलेल्या कामाची.अखेरच्या क्षणाला उमेदवारी नाकारल्यानंतरही महायुतीच्या उमेदवारासाठी मतमोजणीच्या अखेरच्या फेरीपर्यंत दिलेली खंबिर साथ ही प्रामाणिकपणाची साक्ष ठरली आहे.विटेकरांनी पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणाने पार पाडली.या कामाची पावती म्हणून पक्षश्रेष्ठींनी देखील दखल घेतली आहे.प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात विटेकरांवर कौतुकाची थाप देत त्यांच्या पुढील वाटचालीला बळ दिले आहे.
2019 मध्ये अवघ्या काही मतांनी राजेशदादा विटेकर पराभूत झाले, तेव्हापासून त्यांनी पुन्हा नव्या जोमाने तयारी केली. यंदा अगदी तिकीट वाटपाला काही दिवस शिल्लक असताना राजेश विटेकर यांच्या ऐवजी महादेव जानकर यांना परभणीत उभे करण्यात आले. त्यावेळेस साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस आणि विटेकर समर्थकांचा हिरमोड झाला, परंतु पक्ष आदेश शिरसावंद्य मानत विटेकर यांनी जानकरांना खंबीर साथ दिली. संपूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे आणि विटेकर हे दोघेच प्रचाराचे केंद्रबिंदू होते. घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट यासह अन्य पक्ष अंग राखून भूमिका घेत होते. प्रचाराचे नियोजन असो की इतर शासकीय कामे यामध्ये संपूर्ण नियोजन हे विटेकर यांच्याकडेच होते. एवढेच नाही तर स्वतःचे परभणीतील कार्यालय देखील त्यांनी महायुतीला दिले.आपली स्वतःची यंत्रणा जानकरांच्या मदतीसाठी लावली, रात्री बारा वाजेपर्यंत परभणीतील कार्यालयात राहून काम करताना विटेकर दिसून आले.बारानंतर सोनपेठला जायचे,पुन्हा भल्या पहाटे उठून दिवसभर प्रचार यंत्रणा राबवायची, पुन्हा सायंकाळी परभणीत कार्यालयात येऊन दुसऱ्या दिवशीचे नियोजन करायचे असा त्यांचा दिनक्रम होता. उमेदवारी मिळाली नाही म्हणून याबद्दल कुठलीही नाराजी न दाखवता स्वतः उमेदवार समजून त्यांनी अहोरात्र काम केले. एवढेच नाही तर मतमोजणीच्या दिवशी महायुतीतील एकही नेता, पदाधिकारी मतमोजणी केंद्राकडे फिरकला नाही, परंतु विटेकर हे अखेरच्या फेरीपर्यंत मतमोजणी केंद्रात ठाण मांडून होते. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी केवळ विटेकर यांच्यावरच होती का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.आता निवडणूक झाली, मतमोजणी झाली, महायुतीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला, परंतु खऱ्या अर्थाने चर्चा झाली ती विटेकरांच्या कामाची, आता याची दखल पक्षश्रेष्ठीने देखील घेतली आहे. नुकताच 12 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यामध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाषणात राजेश विटेकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ही बाब विटेकरांसाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी निश्चित बळ देणारी आहे.