तुला काय सांगू भल्या माणसा…. आयुष्य आहे एकदाच माणसा,गुरू गौरव काव्य मैफिलीने जिंकली मने

0 42

 

 

सेलू ( नारायण पाटील )

शासनाचा यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार प्राप्त येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. के.डी. वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार ( दि.१० ) रोजी शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयात आयोजित गुरु गौरव काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये कवी डॉ. अशोक पाठक यांच्या, ‘ हे तुला काय सांगू भल्या माणसा,
हे आयुष्य आहे एकदाच माणसा, जग दिसले तुला त्या आईमुळे,
ताठ मानेने चाले तू बापामुळे.’ या कवितेने रसिक भारावून गेले.
या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी गौतम सूर्यवंशी होते. तर व्यासपीठावर माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे, संतोष कुलकर्णी, रघुनाथ बागल, कॉ. अशोक उफाडे , शेख महेमुद , चंद्रशेखर मुळावेकर, निर्मिक क्लासेस चे संचालक शुकाचार्य शिंदे सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व कवी नारायण सुर्वे यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.
कवी संमेलनात सुरेश हिवाळे यांच्या ‘माणसांसाठीचा लढा ‘ या कवितेने वास्तवाची जाणीव करून दिली. ते कवितेत म्हणतात, ‘मेंदूच्या नसानसा कुरतडतात, विविध रंगी विचारांचे उंदीर, पाड्यापाड्यावर फडकत आहेत, फक्त धर्म- जातीचेच झेंडे, दिसत नाही कोठेच, माणसांचे मंदिर, चला होऊ पुन्हा लहान मुल, सोडविण्या हा तिढा, आपल्यातील महापुरूष जागा करू,
देण्या माणसांसाठी लढा.’ डॉ. शरद ठाकर यांच्या ‘ ‘काय सांगू बाई तुला, माझ्या माहेरची रित, माय बाप भावाची ती, जगा वेगळी गं प्रित ‘ ‘माहेर’ या कवितेने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. तर संजय विटेकर यांच्या ‘ मी वागणार नाही खोटे इथे कधी, हा जन्म फक्त माझा खोटा ठरु नये’ या गझलेला रसिकांची दाद मिळाली. शुक्राचार्य शिंदे यांच्या, ‘वाटले मला की ही जात विरून गेली,
भलतेच चित्र दिसते,
ही जात भरून आली ‘ या कवितेने रसिकांना अंतर्मुख केले. प्रभू शिंदे यांच्या ‘ मायीला म्हणावं मह्या, यकदा येऊन जाय, लेक कशी हायं ते, डोळ्यानं पाहुन जाय’ या कवितेने रसिक भावनिक झाले. गौतम सूर्यवंशी, पु.ना. बारडकर, अश्विनी घोगरे, करूणा बागले, सुमिता सबनिस, सतीश शिंदे, बळीराम चव्हाण यांनीही आपल्या कविता सादर केल्या. प्रा. के. डी. वाघमारे यांचा परिचय राजेंद्र सोनवणे यांनी करून दिला. प्रास्ताविक संयोजक सुनिल गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन भगवान पल्लेवाड यांनी केले. तर सुत्रसंचलन सुभाष मोहकरे, धनंजय भागवत यांनी केले.
कार्यक्रच्या यशस्वीतेसाठी सतिश जाधव, शामराव मचाले, शंकरराव गात, शशिकांत बिहाडे,रूपेश बहुते, बाबासाहेब थोरे, संजय घोंगडे, पंडित जगाडे अदिनी परिश्रम घेतले

error: Content is protected !!