संस्कृती जतन करणे मराठी भाषिकांची जबाबदारी-डॉ. सचिन खडके
श्री शिवाजी महाविद्यालयात मराठी भाषिक पंधरवाडा
परभणी – मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी सण, उत्सव, लोकसाहित्य, परंपरा, म्हणी, वाक्प्रचार, वेशभूषा, खानपान, भाषिक सौंदर्य हे जगामध्ये लोकप्रिय आणि श्रेष्ठ समजल्या जाते. आपली संस्कृती आणि परंपरा आपण जतन करणे हे प्रत्येक मराठी भाषकांची जबाबदारी असल्याचे मत साहित्यकार प्रा.डॉ.सचिन खडके यांनी प्रतिपादन केले.
शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषिक पंधरवाडा संवर्धन व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ. प्रल्हाद भोपे होते. पुढे बोलताना डॉ.खडके म्हणाले, आपल्या भाषा व साहित्यातील संचित जतन करून ठेवणे आणि ते पुढील पिढीकडे संक्रमित करणे हे प्रत्येक मराठी बोलणाऱ्या भाषकांची जबाबदारी आहे त्यामुळे काळाच्या ओघात बदलत जाणारे प्रघात लक्षात घेऊन मराठी संस्कृती जतन करण्यासाठी प्रयत्न करावीत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.प्रल्हाद भोपे म्हणाले, जगात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मराठी माणूस हा प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहे.मोठा वारसा लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचाही दर्जा मिळणे अत्यंत गरजेचे आहे असे त्यांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजू बडूरे यांनी, सूत्रसंचालन स्वराज पवार यांनी तर आभार प्रा.अंकुश खटींग यांनी मानले. यावेळी प्रा. सविता कोकाटे, प्रा. तेजस्विनी कपाटे, प्रा. सारिका पासंगे, प्रा. अतुल समिंद्रे, प्रा. अमोल गवई आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साहेबराव येलेवाड, सानिया काळे, आत्मजा भोगे, पूजा साळवे, गायत्री सांगेकर आदींनी पुढाकार घेतला.