सदाभाऊ खोत यांचे आंदोलन स्थगित,मुंबईत होणार बैठक,आ. प्रविण दरेकरांची यशस्वी मध्यस्थी

0 34

सातारा- रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कराड ते सातारा काढलेली ‘शेतकरी वारी’ पदयात्रा स्थगित केली आहे. भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दोन दिवसांपूर्वी ‘शेतकरी वारी’ला भेट देत राज्य सरकारचा प्रतिनिधी आणून तुमच्या मागण्या सोडवू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहकार मंत्री अतुल सावे यांनी दरेकर यांच्यासोबत आंदोलनस्थळी भेट दिली व येत्या १५ दिवसांत मागण्यांबाबत मुंबईत बैठक आयोजित करू असे आश्वस्त केले. मंत्री सावे यांच्या आश्वासनानंतर आणि आ. प्रविण दरेकर यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, सदाभाऊ खोत यांचा परिचय महाराष्ट्राला आहे. एक प्रामाणिक नेता म्हणून त्यांच्याकडे शेतकरी चळवळीत पाहिले जाते. सद्यपरिस्थितीत ग्रामीण भागात ज्याप्रमाणे नेतृत्व हवेय ते दिसत नाही. आपल्या राज्याला शेतकरी नेत्यांची एक मोठी वैभवशाली परंपरा आहे. शेतकरी नेते म्हणून शरद जोशी यांचे नाव आहे. शेतकरी नेता म्हणून देशाने त्यांना पाहिले आहे आणि सदाभाऊ त्यांच्याच मुशीत तयार झालेले नेतृत्व आहे. इतर जी लोकं होती त्यांचे राजकारणात आल्यावर लबाड्या सुरु झाल्या. राजकारणात ते बर्बटलेले आहेत. त्यामुळे त्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. सदाभाऊ यांना भविष्यात महाराष्ट्रातील नेतृत्व करायचे आहे कारण एवढा विश्वासू नेता महाराष्ट्रात दुसरा कुणी नाही, हे सांगताना मला अभिमान होत असल्याचे दरेकर म्हणाले.

यावेळी दरेकर यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यातील विरोधी पक्षनेत्यांचे वेगळेच चालले आहे. देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व त्यांना छळतेय. कारण यांनी आतापर्यंत साखर कारखानदार, जिल्हा बँकांचे अध्यक्ष, मोठ्या सूत गिरण्या असणारे, प्रस्थापितांची तळी उचलली. तर उपमुख्यमंत्री फडणवीस कामगार, शेतकरी, ऊस तोडणी कामगार यांची तळी उचलत आहेत. म्हणून बहुजन समाजाचे गोपीचंद पडळकर आमदार होऊ शकले. शेतकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य झिजवणारे सदाभाऊ या राज्याचे कृषिमंत्री झाले. हे सर्व सामान्यांचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस घडवत आहेत. जे स्वतःला जाणते राजे म्हणून बोलतात त्यांचे हेच दुखणे आहे की महाराष्ट्रातील संपूर्ण बहुजन समाज हा फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आहे. एका कारखानदाराला सांभाळले की आमचा तालुका, राजकारण होते. पण यापुढे कारखानदार राजकारण करणार नाहीत तर ऊस बनवणारा शेतकरी, वाहतूक करणारा ठेकेदार राजकारण करेल. कारखानदारी मला माहित आहे. १२ हजार कोटींची माझी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. राज्यातील बऱ्याचशा साखर कारखान्यांना आम्ही कर्ज देतो. त्यामुळे कारखानदार काय करतात याची कल्पना मला आहे. येणाऱ्या काळात सहकार चळवळ ही सर्वसामान्य सभासदांची कशी होईल यासाठी आमच्या सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचे दरेकर म्हणाले.

२५ किमीचे अंतर उठवायला पाहिजे
दरेकर म्हणाले की, २५ किमी अंतर कशाला पाहिजे. एका बाजूला आपण बोलतो खुलं मार्केट, मग त्या ठिकाणी स्पर्धा होऊ द्याना. काही निवडक लोकांनीच कारखानदार व्हायचे का? शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन कारखाना उभा केला तर तीच सहकार चळवळ आहे. तीच कारखानदारी अपेक्षित आहे. त्यामुळे २५ किमीचे अंतर उठवले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून बोलणार आहे.

राष्ट्रवादी व काँग्रेस नेते गब्बर झाले
दरेकरांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत म्हटले की, तुमच्या हातात सत्ता असतात त्या सर्वसामान्यांसाठी वापरायच्या असतात. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांना माझी विचारणा आहे तुम्ही गब्बर झालात मात्र या सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबातील किती माणसं गब्बर, श्रीमंत झाली. याचा लेखाजोखा महाराष्ट्राला देण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही जे काम करतोय ते सर्वसामान्यांसाठी करतोय.

 

मुंबई बँकेच्या माध्यमातून
आठवडी बाजार सुरु करणार

दरेकर म्हणाले की, आठवडी बाजाराची संकल्पना आहे ती मी स्वतः पुढाकार घेऊन करणार आहे. एक चांगली योजना मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून आणतोय. शहरात आठवडी बाजार सुरु करायचा आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल एपीएमसी शिवाय थेट विकला जावा व शेतकऱ्याला थेट पैसे मिळावे, अशा प्रकारची लाभ देणारी योजना आणतोय.

यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, आमदार जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे सागरभाऊ खोत, सरपंच संघटनेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील उपस्थित होते.

error: Content is protected !!