शरद पवारांच्या इमेजला धक्का? तुतारी अवघ्या 15 जागांवर……….

0 46

आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचे एक अढळ स्थान होते. शरद पवार  कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकतात किंवा ते राजकीय वाऱ्याची दिशा बदलू शकतात, अशाप्रकारची सामर्थ्यशाली प्रतिमा जनमानसात होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली होती. हा देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाला मोठा शह ठरला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी भाजप आणि महायुतीचे मनसुबे उधळून लावतील, असे दावे केले जात होते. मात्र, या निवडणुकीत शरद पवार गटाला अवघ्या 15 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का ठरला. त्यामुळे शरद पवार यांना राज्यातील वातावरण ओळखण्यात अपयश आल्याची चर्चा सुरु झाली आहे. याउलट भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ग्राऊंड लेव्हलला अचूक व्यवस्थापन करुन हारलेली लढाई पुन्हा खेचून आणली, असे बोलले जात आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये शरद पवार हे महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या करिष्म्यामुळे मविआला विजय मिळेल, असे अंदाज वर्तविण्यात आले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी राज्यभरात सभा घेतल्या होत्या. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे अनेक बडे नेते गळाला लावले होते. त्यांनी जातीय आणि राजकीय समीकरणांचा विचार करुन अनेक ठिकाणी उमेदवार हेरले होते. विधानसभेच्या प्रचारात शरद पवार यांनी भाजपचा ‘बटेंगे तो कटेंगे’ हा अजेंडा खोडून काढला होता. याशिवाय, लाडक्या बहीणमुळे महायुतीला मिळणारी सहानुभूतीही शरद पवार यांनी महिला अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करत कमी करण्याचा प्रयत्न करत होता. शरद पवार यांच्या सभांमधील सोयबीन आणि कपाशीला मिळणारा कमी भावाचा मुद्दाही प्रभावी ठरेल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल पाहता शरद पवार यांची रणनीती आणि करिष्मा पूर्णपणे फेल गेल्याचे दिसत आहे

error: Content is protected !!