म्हणून…विक्रम काळेंना नाईलाजाने उमेदवारी-प्रदिप सोळुंके यांच्या दाव्याने खळबळ
परभणी,दि 23 ःऔरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विक्रम काळे हे भाजपात जातील अशी भिती वाटल्याने पक्षाने नाईलाजाने त्यांना ऐनवेळी उमेदवारी दिल्याचा दावा अपक्ष उमेदवार प्रदिपदादा सोळुंके यांनी येथे केला आहे.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या निमीत्ताने श्री.सोळुंके हे सोमवारी दि.23) परभणीत आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी सामाजिक कार्यकर्त्ये रणजित कारेगावकर,पवन पारवे उपस्थित होते.सोळुंके म्हणाले,विद्यमान आमदारांवर पक्षात नाराजी आहे,शिक्षकात देखी असंतोष आहे.असे असतानाही पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यानंतर सर्वांना धक्का बसला,परंतु ते भाजपात जातील अशी शक्यता पक्षश्रेष्ठींना शंका आल्याने नाईलाजान त्यांना ऐन वेळी उमेदवारी देण्यात आल्याचा दावा सोळुंके यांनी केला.
यावेळी ते म्हणाले, वास्तविक पाहता या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने उमेदवारी मिळावी, असा मी रीतसर अर्ज केला होता. मी पक्षाकडे उमेदवारी मागितली, इ.स.२००० साली माझ्याकडे राष्ट्रवादी शिक्षक संघटनेच्या मराठवाडा प्रमुख पदाची जबाबदारी होती. हा मतदार संघ पक्षाकडे येऊ शकतो. याकडे मीच पक्षाचे लक्ष केंद्रीत केले.
त्यावेळी निवडणुकीपूर्वी स्मृतीशेष मा.आ. वसंतराव काळे, गेवराईच्या माझ्या निवासस्थानी येऊन ‘तू नवखा आहेस, तरुण आहेस, तुझा अजून संपर्क कमी आहे, मतदारसंघ मोठा आहे. मी अनुभवी आहे. त्यामुळे तू सध्या पक्षाकडे उमेदवारी मागू नकोस. मला पाठिंबा दे. नंतर तुला संधी देऊ’ असे आश्वासन दिले. मी पाठिंबा दिला. काळे साहेब विजयी झाले, त्यांच्या आकस्मित निधनाने सहानुभूती म्हणून त्यांचे पुत्र आ. विक्रम काळे यांना नंतर उमेदवारी दिली.
त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा मला संधी मिळाली नाही.असे सोळुंके म्हणाले,
आ. विक्रम काळे गेली तीन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत; परंतु सध्या त्यांच्याविरुद्ध शिक्षकांत असंतोष आहे. त्यामुळे मला उमेदवारी देऊन पक्षाने ‘भाकरी फिरवावी’ अशी विनंती मी पक्षाकडे केली होती.
पक्षासाठी मी मुख्याध्यापक पदाच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे, मोदी लाटेत पक्षबांधणी केली, पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात प्रत्यक्ष सक्रीय सहभाग घेतला..
मी स्वतः ३३ वर्षे शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे. त्यामुळे उमेदवारी मला जाहीर होईल, अशी अपेक्षा होती; परंतु असे घडले नाही.असे सोळुंके म्हणाले.
उमेदवारी अर्ज दाखल का केला?
पक्ष प्रदेशाध्यक्षांकडे या मतदारसंघाची उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केला होता; परंतु पक्षाने या अर्जाची कसलीही दखल घेतली नाही. पक्षनेत्यांच्या विनंतीला मान देऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला असता तर माझ्यावर ‘तोडापानी’ केल्याचा, ‘खोके घेतल्याचा’ आरोप झाला असता म्हणून मी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, अशा नेत्यांना धडा शिकविण्यासाठी मी उमेदवारी घोषित केली आहे असे देखील सांगत त्यांनी प्रदेशाध्यक्षावर देखील आरोप केले आहेत.