गंगाखेड शहर विकासाचा धडाका सुरूच, आ.डाॅ.गुट्टे यांनी पुन्हा आणले २५ कोटी ५८ लाख
परभणी,दि 31 (प्रतिनिधी) :-
शहरात पायाभुत सुविधा आणि नागरी प्रश्नांची समस्या भविष्यात उभी राहू नये, तसेच चौफेर विकास व्हावा, यासाठी गंगाखेड विधानसभेचे आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे जीवाचे रान करीत आहेत. त्यासाठी कोट्यावधींचा निधी खेचून आणीत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. शहराच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करून त्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी ते सातत्याने आग्रही आहेत.
त्यामुळे अनेक नाविन्यपूर्ण विकासकामे होत आहेत. आ.डाॅ.गुट्टे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे त्यात आता गंगाखेड पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत आणि कर्मचाऱ्यांसाठी २६ नवीन शासकीय निवासस्थाने बांधकामाची भर पडली आहे. त्यासाठी शासनाने तब्बल २५ कोटी ५८ लाख २२ हजार रूपये मंजुर केले आहेत. परिणामी, गंगाखेड शहर विकासाचा धडाका सुरूच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
सध्या असलेली पंचायत समितीची इमारत सन १९६२ मध्ये तर शासकीय कर्मचारी निवासस्थाने सन १९६७ मध्ये बांधलेली आहेत. ते आता जीर्ण व धोकादायक झाले असून त्याचे नुतनीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून आ.डाॅ.गुट्टे यांनी ग्रामविकास विभाग व संबंधित मंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून शासनाने दोन्ही विकास कामांना अंतिम मंजुरी दिली आहे. तसे ग्रामविकास विभागाने पत्राद्वारे कळविले आहे.
त्यानुसार बांधकाम भूमापन व उपविभाग क्रमांक २१७ ख व ४४० मधील जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या १०३३.२८ चौ.मी. क्षेत्रफळात पंचायत समितीची नवीन इमारत तर जुनी निवासस्थाने पाडून त्या जागेवर सुमारे १४९२ चौ.मी क्षेत्रफळात अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विविध प्रकारची नवीन २६ शासकीय निवासस्थाने बांधण्यास येणार आहेत. त्यासाठी शासनाने प्रशासकीय नवीन इमारतीसाठी ११ कोटी ३७ लाख रूपये तर शासकीय निवासस्थाने करीता १४ कोटी २१ लाख २२ हजार रूपये असे एकूण तब्बल २५ कोटी ५८ लाख २२ हजार रूपये निधी मंजुर केला आहे.
दरम्यान, गंगाखेड विधानसभेचा सर्वांगिण विकास, हाच माझा संकल्प आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत असतो. गेल्या वर्षभरात शिंदे-फडणवीस सरकारने कोट्यावधींचा निधी दिला आहे. त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित असणारी कामे मार्गी लागत आहेत. याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया आ.डाॅ.गुट्टे यांनी दिली आहे.