भक्तीतुन मिळे मुक्ती मार्ग – मनाचे श्‍लोक (भाग 38)

1 177

मना प्रार्थना तूजला एक आहे
रघूराज थक्कीत होऊनि पाहे
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥38॥
अर्थ: हे मना, तुला माझे कळकळीचे सांगणे आहे की राघवाचे तुझ्याकडे बारकाईने लक्ष आहे तेव्हा त्याची अवज्ञा होईल अशा प्रकारचं, काहीही वावगं कर्म करू नकोस. त्याच्या आसर्‍याला जा.
रामदासांनी सर्वात जास्त म्हणजे 16 आरत्या त्यांचे आराध्य दैवत श्रीरामावर रचल्या आहेत. रामावर त्यांनी काकड आरती, धुपारती, शेजारती अशा निरनिराळ्या प्रसंगांवरच्या आरत्या केल्या. आरतीतून त्यांनी रामाच्या सगुण रूपाचे वर्णन केले आहे.
कीरीट कुंडले माला विराजे।
झळझळ गंडस्थळ धननिळ तनु साजे।
घंटा किंकणी अंबर अभिनव गती साजे।
अंदवाकी तोडर नूपुर ब्रीद गाजे।
असे सालंकृत रामाचे वर्णन केले आहे. भक्त कैवारी राम म्हणून त्याची स्तुती केली आहे. मंगल धामा रामा सद्गुरु निष्पापा’ म्हणून रामाला सद्गुरु म्हणून गुणगायन केले आहे. रामाच्या गुणांचे, पराक्रमांचे वर्णन केले आहे. राम म्हणजेच परब्रह्म असे म्हणून त्याचे आरतीतून माहात्म्य वर्णिले आहे. विश्‍वकल्याणासाठी रामाजवळ कळवळून कल्याण करण्यास सांगितले आहे.
समर्थांनी या आधीच्या दहा श्‍लोकात श्रीरामाचं भक्ताबद्दल अभिमान बाळगण्याचं आणि भक्ताकडे दुर्लक्ष न करण्याचं आणि ब्रीद आहे ते वारंवार सांगून मनावर ठसवायचा प्रयत्न केला. आता या आणि पुढच्या चार अशा एकूण पाच श्‍लोकात ते रामाच्या आश्रयाला जा आणि तेथे वास्तव्य कर असे पुन्हा पुन्हा सांगताहेत.
ते म्हणतात, हे मना, माझे तुला कळकळीचे सांगणे आहे, रघुराज श्रीराम तुझ्याकडे लक्ष देउन आहे. बारकाईने लक्ष ठेवून आहे. समर्थ बरेचदा नवनवीन शब्दप्रयोग करतात. इथे त्यांनी ‘थक्कीत’ हा शब्द वापरला आहे. पण त्याचा अर्थ ‘थक्क होऊन’ असा घेता येत नाही. कारण देव थक्क कसा काय होईल? त्याला तर सर्व काही माहित असते. माणसाचा स्वभाव, त्याची करणी, त्याचा आगा, पीछा, भविष्य सर्व काही त्यानेच ठरवलेले आहे. मग कशामुळे त्याने थक्क व्हावे? तेव्हा श्रीराम लक्षपूर्वक, बारकाईने तुझ्या करणीकडे पाहतो आहे असा अर्थ इथे अपेक्षित आहे.
भुकेलेल्या माणसाला षड्रसांनी युक्त पदार्थानी भरलेलं ताट वाढलं तर त्याला प्रत्येक घासाबरोबर पुष्टी, तुष्टी आणि क्षुधानाशाचा अनुभव येऊ लागतो. जितका जितका घास घ्यावा तितकी तितकी भूक नष्ट होते आणि तितके तितके पोट भरत जाऊन सुख आणि समाधानही वाढत जाते. जेवणार्‍याला ज्याप्रमाणे पुष्टी, तुष्टी आणि क्षुधानाश या तिन्ही गोष्टी एकदमच प्राप्त होतात त्याप्रमाणे भगवद्भजनामध्ये भक्ती, विरक्ती आणि अनुभवप्राप्ती या तिन्ही गोष्टी एकाच वेळी प्राप्त होतात. भक्ताने हे सेवा व्रत भक्तीभावनेने अखंडीत करत जावे.
‘श्रीहरी’नामाचा महिमा जाणून नामस्मरणी दृढ व्हावे. नामधारकाच्या घरी भगवंत सतत असतो.
तुका म्हणे नामी एकनिष्ठ भाव । तेथे वासुदेव सर्वकाळ ॥
नियमित नामस्मरण करणारा मनुष्य देवाला आवडतो. उगवलेला दिवस क्षणातच नाहीसा होतो. याचा विचार करून मनुष्याने आपले हित त्वरित साधावे. वेळ न दवडता भगवंताचे नामस्मरण करावे. प्रत्येक क्षण भगवंताचे भक्तावर लक्ष असते.
त्यामुळे समर्थ म्हणतात…
असे बारकाईने पहाणार्‍या रघुराजाला अयोग्य वाटेल, त्याची अवज्ञा झाल्यासारखे वाटेल असे काहीही आणि कधीही तू करू नकोस. निव्वळ भक्तीने तू त्याला प्रिय हो, त्याच्या मनात आपल्यासाठी स्थान निर्माण कर आणि नेहमीसाठी तेथे रहा.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
ज्योती कुलकर्णी, मुंबई

error: Content is protected !!