तुका म्हणे : भाग ३० : अहंकार
एक तरुण व्यापारी व त्याचे मित्रमंडळी गप्पा मारत बसलेले असताना काही गोष्टींवरून त्याचा आपल्या मित्रांशी वादविवाद झाला. तो माझेच खरे असे म्हणत तेथून निघून गेला व बरेच दिवस मित्रांशी बोलणे चालणे बंद केले. मित्रांनी बरेच समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही मानेना. त्याच्या स्वभावातील बदल राग येणे, इतरांना कमी समजने, मत्सर बाळगणे या बाबी त्याच्या आईस जाणवू लागल्या. एके दिवशी त्याची आई त्यास सांगू लागली, स्वयंकेंद्रितता व त्यातून तयार होणारा अंहकार यामुळे आपले बरेच नुकसान होते. हे तुकाराम महाराजांनी खूप छान सांगितले आहे. ते असे,
तुका म्हणे,
त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ॥१॥
मग जैसा तैसा राहे । कव्य पाहें उरले तें ॥ध्रु.॥
अंतरींचे विषम जाड । येऊं पुढें न दयावें ॥२॥
तुका म्हणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ॥३॥
तुकाराम महाराज म्हणतात , तुम्हाला त्याग करायचा असेल तर असा करा की जेणेकरून अहंकार नाहीसा होईल. मग तुम्ही ज्या स्थितीत आहात त्याच स्थितीत राहा. अहंकार एकदा नाहीसा झाला की खाली काय उरले ते साक्षीरुपाने पहा. अंतःकरणातील विषय जसे अहंकार, क्रोध, मत्सर हे पुढे येऊ देऊ नयेत. तुकोबाराय म्हणतात, तुमचे मन शुद्ध व समाधानी पाहिजे.
अहंकार ही मनुष्याच्या भावनेपैकीच एक भावना. स्वतःवर प्रेम (self love) करणे हा माणसाचा स्वभाव गुणधर्म व काही प्रमाणात तो योग्यही. परंतु स्वतःवर प्रेम करत असताना अमर्याद प्रेम यातून आपण बऱ्याच वेळा स्वयंकेंद्रित (self centrered) होऊन जातो. स्वयंकेन्द्रिततेतून मीच सर्वोत्तम इतर कसपटासमान अशी भावना तयार होते ज्यास सुपेरिओरीटी कॉम्प्लेक्स असे म्हणू. अशा व्यक्ती इतरांचे म्हणणे अमान्य करणे, त्यांचा मत्सर, निंदा करणे असे वागू लागते.
अहंकार ::
१) नारसिसिझम (Narcissism) : ग्रीक दंतकथेनुसार एक नारसिस नावाचा सुंदर राजा होऊन गेला. तो स्वतःच्या सुंदरतेवर इतका प्रेम करत असे की तो एके दिवशी तलावाशेजारी बसलेला असताना त्यास स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात दिसले. सुंदर प्रतिबिंब पाहून तो प्रतीबिंबास आलिंगन देण्यास गेला व पाण्यात पडून मृत्युमुखी पडला. त्यावरूनच narcissist personality हा व्यक्तीमत्वाचा प्रकार मानला जातो. या उदाहरणांमध्ये राजाची आत्मकेंद्रीतता दिसते यातूनच अहंकारास वाव मिळतो. म्हणूनच एका ओवीमध्ये तुकोबाराय म्हणतात, देहबुद्धी वसे जयाचियें अंगीं । पूज्यता त्या जगीं सुख मानी ॥१॥ म्हणजेच ज्याच्या अंगामध्ये देहबुद्धी आहे म्हणजे देहा विषयी आसक्ती आहे त्याला आपल्याला सर्वांनी पूज्य मानावे मग तेच खरे सुख आहे असे वाटायला लागते. परंतु हेच अहंकाराचे व दुःखाचे कारण ठरते असे तुकाराम महाराज म्हणतात.
२) भौतिक बाबींचा (संपत्तीचा) अहंकार : काही वेळा एखादा व्यक्ती मोठ्या पदावर गेला किंवा आर्थिकतेने संपन्न झाला की तो इतरांना हीन भावनेने पाहू लागतो तो अहंकारामुळेच..अशावेळी आपण इतरांची निंदा, मत्सर करायला लागतो. अशा वर्तनामुळे आपण आपल्या मित्रांपासून, नातेवाईकांपासून दूर जायला लागतो. भौतिक सुख प्राप्त करणे वाईट नाही परंतु त्याबद्दल अहंकार बाळगणे वाईटच. भौतिक सुखाचा व भावनिक सुखाचा योग्य समतोल राखणे आवश्यक असते. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार समूळ आशा ॥* निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥ म्हणजेच त्याचे शरीर चिंतामणी आहे ज्याच्या शरीरातून अहंकार , आशा समूळ नाहीसे झाले आहे. ज्याच्या शरीरातून निंदा, हिंसा, कपट, देहबुद्धी नाहीशी झाली तो अगदीच स्पटिकाप्रमाणे निर्मळ आहे.
३) वैचारिक फॅसिझम : फॅसिझम हा शब्द दुसऱ्या महायुद्धात इटली व जर्मनी या देशांच्या विचारप्रणालीसाठी वापरला जातो, ज्यानुसार फॅसिस्ट लोक हे जन्मतः इतरांपेक्षा सर्व बाबीत सर्वश्रेष्ठ आहेत असे मानत. परंतु आजही आपण अनेक ठिकाणी वैचारिक फॅसिझम बाळगून आहोत जसे अनेक लोक स्वतः अमुक अमुक धर्मानुसार- जातीनुसार, रंगानुसार, ज्ञानानुसार ई.. सर्वश्रेष्ठ आहोत असे मानतो. वैचारिक फॅसिझमचे मूळ कारण म्हणजे आपला अहंभाव.
४) मी म्हणतो तेच खरं असा हट्टवाद : आपण बऱ्याच वेळा मी म्हणतो तेच खरं असं मानतो, अश्या विचारधारेमागील एक प्रमुख कारण म्हणजे अहंकार. आपल्या अहंकारापोटी आपण मी म्हणतो तेच खरं अशी हटवादी भूमिका घेतो. त्यामुळे इतरांनीही माझ्या मनानुसारच वर्तन करावे असे मानून बसतो. तसे न झाल्यास स्वतःची अस्वस्थता व पर्यायाने इतरांच्या मनाची अस्वस्थता वाढवतो. विवेकीने विचार केल्यास आपणास असे कळते की प्रत्येक माणूस हा वेगळा आहे व प्रत्येकाची विचारसरणी व वर्तणूक वेगळी असू शकते. त्यामुळे आपण कोणावर आपली विचारसरणी बळजबरीने लादू शकत नाही. आपले नातेसंबंध, हितसंबंध प्रबळ करण्यासाठी आपणास अहंकारास बाजूला सारून विवेकाने विचार करणे अत्यावश्यक असते. त्यामुळेच एकनाथ महाराज म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा.
अहंकारा पासून समूळ दूर राहणे कठीणच. परंतु विवेकी दृष्टिकोनातून पाहिल्यास मनात तयार होणारे अहंकाराचे वादळ योग्यवेळी क्षमवता येते. त्यामुळे आपले नातेसंबंध, हितसंबंध जपण्यास मदत होते. स्वहित जपणे योग्य परंतु स्वयंकेंद्रित होउन अहंकार बाळगणे हानिकारक. म्हणूनच वेळोवेळी तुकोबाराय अहंकाराचा त्याग करण्याची सांगतात, ते असे,
त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ॥
डॉ. जगदिश नाईक
मानसोपारतज्ज्ञ, मन हॉस्पिटल, परभणी