तुका म्हणे : भाग ३४ : भेदाभेदभ्रम अमंगळ
शाळेमध्ये शिक्षक दुसरे महायुद्ध हा धडा शिकवत होते. ते विद्यार्थ्यांना शिकवू लागले हिटलरने दुसऱ्या महायुद्धापूर्वी ज्यू लोकांचे हत्याकांड केले. त्यांना निर्घुणपणे गॅस चेंबरमध्ये मारण्यात आले. शिक्षक थोडावेळ थांबले व गंभीरपणे म्हणाले, या हत्याकांडामागील कारणीमिमांसा काय असेल बरे ? काही विद्यार्थी म्हणाले हिटलरचा ज्यू लोकांबद्दलचा राग, द्वेष… मुलांची उत्तरे झाल्यानंतर शिक्षक म्हणाले या हत्याकांडामागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे हिटलरचे वैचारिक फॅसिझमचे धोरण. ते पुढे म्हणाले , याबद्दल तुकाराम महाराजांनी खूप अगोदर प्रखर वक्तव्य केले आहे. ते असे,
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥
तुकाराम महाराज म्हणतात, हे जग विष्णुमय आहे वैष्णव (मानव) हा एकच धर्म आहे. माणसामाणसांमध्ये भेद करणे ही अमंगल बाब आहे. हे जनहो , तुम्ही ईश्वराचे श्रवण , चिंतन करून आपले हित साधून घ्या. आपल्या हातून कोणत्याही जीवांचा मत्सर करू नये हीच खरी ईश्वरभक्ती आहे. तुकोबाराय म्हणतात, शरीराच्या कुठल्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपूर्ण शरीराला, तसेच शरीरातील जीवाला जाणवते त्याचप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जिवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो ईश्वराचा मत्सर केल्यासारखे आहे.
वैचारिक फॅसिझम :
फॅसिस्टवादी हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर येतात ते हिटलर व मुसोलिनी. या दोघांच्या नाझीवादी , फॅसिस्टवादी वैचारिक भूमिकेमुळेच दुसऱ्या महायुद्धाचा आगडोंब उसळला व त्यात जवळपास दहा कोटी लोकांना जीव गमवावा लागला. हिटलर व मुसोलिनी संपले परंतु फॅसीझमचा निखारा आजही जागोजागी आग पसरविताना आपण पाहतो.
फॅसिझम म्हणजे अशी एक विचारधारा ज्यामध्ये आपणच जन्मतः सर्वश्रेष्ठ (कुळाने / गुणांनी / रंगाने ई ) आहोत अशी भावना ज्यामुळे आपणच या जगावर सर्व बाबीत आधिपत्य करू असे वाटणे. अशा विचारधारेमुळेच इतरांना कमी लेखणे, त्यांचा द्वेष, मत्सर करणे, त्यांबद्दल हीन भावना ठेवणे असे वर्तन होत असते जे हिटलरने ज्यू लोकांबाबत केले.
वैचारिक फॅसिझमची कारणे :
१) रूढी परंपरेचा पगडा : मनुष्य आदिमानवापासून जसा जसा प्रगत होत गेला तसा तसा त्यामध्ये जातीभेद, वर्णभेद , श्रीमंत-गरीब असे प्रवर्ग पडायला लागले. समाजातील मोठ्या माणसांनी आपल्या लहानग्यांना आपण उच्चजातीय, उच्चभ्रू, उच्चकुलीन अशा भावनांचे बीजारोपण केल्यामुळेच पुढे उच्च-नीच, गोरे-काळे, श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ ईश्वरवाद अशा संकल्पना तयार झाल्या असाव्या व त्याचेच रूपांतर अनिष्ट रूढीपरंपरामध्ये अनेक वर्षांमध्ये झाले. फॅसीझम हा शब्द फक्त जातीयवादापुरता मर्यादित न राहता तो आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बाळगतो, जसे मी श्रीमंत, मी बॉस , मी गोरा , मी सर्वगुणसंपन्न अशा भावना इतरांना हीन लेखन्यास प्रवृत्त करतात.
२) वैचारिक विटाळ : एखाद्या वाईट गोष्टीचा स्पर्श झाल्यास आपले सोवळे तुटते व विटाळ होतो असा एक जुना समज आहे. परंतु मुळात त्या वस्तूमुळे किंवा कोण्या व्यक्तीमुळे हा विटाळ होत नसून आपल्या वैचारिक दृष्टिकोनामुळे हा ओवळेपणा येतो. कोरोना कालखंडामध्ये आपण अनेक ठिकाणी पाहिले कोरोना बाधित व्यक्तीस, कोरोणा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना, नर्सेसला अगदी वाळीत टाकल्यासारखे वागवले जात होते . असे वागण्याचे एकमेव कारण म्हणजे आपला ओवळेपणाचा दृष्टिकोन..
३) राजकीय स्वार्थ : इतिहासामध्ये आपणास शिकवल्या जाते इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबले होते. आजही जगामध्ये बऱ्याच वेळा राजकीय स्वार्थासाठी सामान्य जनतेमध्ये वैचारिक फॅसिझमचे बीज रोवले जाते. त्यातूनच अनेक ठिकाणी धर्मा-धर्मांमध्ये, जाती-जातीमध्ये, श्रीमंत-गरीबांमध्ये वाद तयार होतात व त्याचा राजकीय फायदा राज्यकर्ते घेत असतात.
वैचारीक फॅसिझमबद्दलची उपाय योजना :
१) तरुण वर्गातील जागरुकता : लहान मुलांना आपली जात, धर्म, श्रीमंती, गरिबी याची फारशी जाण नसते. परंतु याची जाणीव त्यांना करून देणारे आपणच.. भेदाभेदभ्रम अमंगळ या तुकोबारायांच्या तत्त्वाचे जाणीव करून देण्याचे वय म्हणजे तरुणाई. कोणत्याही बाबीबद्दलचा भेदाभेद हा वाईटच ही भावना तरुणाईच्या उंबरठ्यावरील मुलांमध्ये रुजवणे आवश्यक.
२) परस्परावलंबन भावनेचे महत्व : कोरोना कालखंड सुरू झाला आणि सर्व जगासमोर एकच संकट उभे राहिले. या काळात आपण जात , धर्म , गरिबी-श्रीमंती , वर्णभेद या भावना दूर ठेवून परस्परांची मदत करण्यासाठी सामोरे आलो त्यातूनच भारतासारख्या मोठ्या, विकसनशील देशांनी या संकटावर सहज मात केली. त्यामुळेच परस्परावलंबनाचा मूळ पाया बांधणे अत्यावश्यक असते.
३) ‘ मी ‘ पासून ते ‘ आम्ही ‘ ही भावना : मी अमुक जातीचा, मी अमुक धर्माचा, अमुक कुळातील अशा मी पणाच्या संकुचित भावना आपणास वैचारिक फॅसिझमकडे घेऊन जातात. या ‘ मी ‘ चा परीघ अधिक विस्तारित गेल्यास तयार होतो ‘ आम्ही ‘.. ह्या भावनेमुळेच स्वामी विवेकानंदांना सर्वजण my brothers and sisters जाणवले, ज्ञानेश्वर माऊलींना हे विश्वची माझे घर वाटले.वैचारिक मतभेदामुळेच आपल्या मनात इतरांबद्दल द्वेष, मत्सर या भावना उत्पन्न होतात. त्यांनाच दूर ठेवण्यासाठी तुकोबाराय म्हणतात,
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥
डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक
मनोविकारतज्ज्ञ, मन हॉस्पिटल परभणी ९४२२१०९२००