पाळणा लांबवायचा..आता पुरुषांसाठी आले हे इंजेक्शन
आतापर्यंत देशात कुटुंब नियोजनाची जबाबदारी स्त्रीयांवरच टाकून पुरुषांनी अंग चोरले. नसबंदीची झंझट नको म्हणून त्यावर कंडोम कंपन्यांची कोट्यवधींची उलाढाल झाली. नसबंदी, कॉपर टी यांना पर्याय म्हणून बाजारात कंडोम, गोळ्या आल्या. पण आता त्यापेक्षा रामबाण उपाय आला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian Council of Medical Research) गर्भधारणा थोपविण्यासाठी खास इंजेक्शनचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भविष्यात पुरुषांनी हे इंजेक्शन टोचून घेतले तर त्याला घरातील पाळणा लांबविता येईल.
गर्भनिरोधक इंजेक्शन
ICMR ने पुरुषांसाठी हे गर्भनिरोधक इंजेक्शन बाजारात आणले आहे. त्यासाठी संस्थेने 7 वर्षे अथक प्रयत्न केले. 303 पुरुषांवर या इंजेक्शनचा प्रयोग करण्यात आला. त्यात हे गैर-हार्मोनल इंजेक्टेबल पुरुष गर्भनिरोधक RISUG (रिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ स्पर्म अंडर गाईडन्स) पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे इंजेक्शन अनेक दिवस प्रभावी ठरते. या प्रयोगात 25-40 वर्ष वयोगटातील पुरुषांना 60 मिलीग्रॅमचे आरआईएसयूजी इंजेक्शन टोचण्यात आले होते. त्यातील निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. त्यानुसार, RISUG मुळे 99 टक्क्यांपर्यंत गर्भधारणा थोपविता येते.
काय आढळले निष्कर्षात
- चाचणीतील पुरुष आणि त्यांच्या पत्नीमध्ये कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही
- RISUG चा स्पर्म डक्ट इंजेक्ट करण्यात येतो
- इंजेक्शन देणाऱ्यापूर्वी एनेस्थिसिया देण्यात येतो, त्याठिकाणी RISUG चा स्पर्म डक्ट इंजेक्ट होईल.
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शरीरात स्पर्म डक्ट निगेटिव्ह चार्ज्ड स्पर्मच्या संपर्कात येतो, त्यांना नष्ट करतो
13 वर्षांपर्यंत प्रभाव
या प्रयोगातील दाव्यानुसार, हे गर्भनिरोधक इंजेक्शन एकदा दिल्यावर, त्याचा प्रभाव 13 वर्षांपर्यंत असतो. कोणतीची फार्मा कंपनी अशा प्रकारचे उत्पादन तयार करणार नाही अथवा त्याची विक्री करणार नाही. त्यामुळे हे औषध बाजारात उतरविण्यापूर्वी सर्व आव्हाने आयसीएमआर लक्षात घेणार आहे. हे इंजेक्शन घेतल्यावर ताप, युरिन इन्फेक्शन एखाद्या प्रकरणात झाले तरी, त्यावर औषधांद्वारे उपचार करता येतो.
RISUG ला आयआयटी खरगपूरचे डॉ. सुजॉय कुमार गुहा यांनी विकसीत केले आहे. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी त्यावर एक रिसर्च पेपर तयार केला होता. तिसऱ्या टप्प्यासाठी चार दशकांहून अधिकचा काळ लागला. त्यासाठी पाच केंद्रांवर प्रयोग करण्यात आले. यामध्ये जयपूर, नवी दिल्ली, उधमपूर, खरगपूर आणि लुधियाना येथील केंद्रांचा समावेश होता. इंजेक्शन घेतल्यावर काही वर्षांनी बाळ हवे असल्यास काय करावे लागणार याची माहिती पण लवकरच समोर येणार आहे.