पक्षांतर…

3 447

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर खडसे हेच मुख्यमंत्री होतील, अशी एक ठळक अटकळ होती. परंतु, भाजपने बहुजन नेत्याला डावलून ब्राम्हण समाजाचे असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अगदी अचानकपणे मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. त्यामुळे खडसे हे तेव्हाच नाराज झाले होते व ते मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीलाही येण्यास तयार नव्हते. त्या काळात त्यांनी भाजप नेतृत्व व रा. स्व. संघावरही चांगलेच तोंडसुख घेतले होते. परंतु, तेव्हा तात्पुरती समजूत काढून त्यांची महसूल, कृषीसारख्या महत्वाच्या मंत्रिपदांवर बोळवण करण्यात आली होती. आपण मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आहोत आणि आपण कसे बहुजन समाजाचे नेते आहोत, असे सतत सांगणार्या खडसेंना त्यांचे भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरण काढण्यात येऊन दणका देण्यात आला. त्यानंतर त्यांचे मंत्रिपद काढून घेऊन फडणवीस यांनी दुसरा दणका दिला. नंतर तर त्यांची विधानसभेसाठी अगदी शेवटच्याक्षणी उमेदवारीही कापण्यात आली. खडसेंचे महाराष्ट्र व दिल्लीतील राजकीय वजन कमी करण्यात फडणवीस व त्यांचा कंपू कमालीचा यशस्वी झाला. खरे तर त्यावेळेसही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना पक्षात येण्याचे आवाहन केले होते. परंतु, खडसे हे अपमानाचा कडू घोट गिळून पक्षनिष्ठेचे तुणतुणे वाजवत बसले. ते त्यानंतर पक्ष सोडणार अशा अधुन मधून वावटळ्या उठत होत्या. परंतु एकनाथ खडसे यांनी खूप संयम दाखवला व शेवटी भाजपला रामराम ठोकला. बुधवारी एकनाथ खडसेंनी भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर करीत असतानाच येत्या शुक्रवारी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले. अर्थात हे काही अचानक वगैरे झालेले नसले. तरी शेवटी एखाद्या पक्षात 40 वर्षे एकनिष्ठ राहून कार्य करणारा नेता वयाच्या आणि कारकिर्दीच्या या टप्यावर पक्षत्याग करीत असेल तर त्यावेळी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनाला चुटपूट लागतेच. नाथाभाऊ भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल होणार, हे गेल्या काही महिन्यांपासून अगदी स्पष्ट दिसत होते. खरे सांगायचे तर मागच्या सरकारचे नेतृत्व करण्यासाठी पक्षाने नाथाभाऊंना डावलून देवेंद्र फडणवीसांना संधी दिली तेव्हापासुनच खडसे अस्वस्थ होते. आता जो काही अंतिम परिणाम दिसत आहे त्याची पायाभरणी त्याचवेळी झाली होती. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ खडसेंनी कधीही स्वीकारले नव्हते,त्यातूनच त्या दोघांमध्ये खटके उड़ू लागले. लेकीच्या पराभवाचा धक्का खडसेंसाठी अगदी निर्णायक होता. आता आपल्याला भाजपमध्ये भवितव्य नाही. हे त्यांच्या लक्षात आले. पुढे विधान परिषदेवर त्यांना संधी नाकारली गेली, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही त्यांना स्थान मिळाले नाही. राज्यसभेत पाठविणार, राज्यपाल करणार ही सगळी आश्‍वासने पोकळ निघाली, शेवटी भाजपात एका कोपर्‍यात पडून राहायचे की, नव्या वाटा शोधायच्या यावर निर्णय घेणेभाग होते. कधी तरी हा निर्णय घ्यावा लागणार होताच, त्या मानाने खडसे बराच काळ रेंगाळले असे म्हणता येईल. अर्थात हे रेंगाळणे तसे स्वाभाविकच होते. खडसे मुरलेले राजकारणी आहेत,राजकीय निर्णय भावनेच्या भरात घेऊन चालत नाही, हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. त्यामुळेच भाजप सोडायचा ठरल्यावर आपले योग्य पुनर्वसन नेमके कोणत्या पक्षात होऊ शकते, याची त्यांनी सखोल चाचपणी केली असावी. भाजपश्रेष्ठींनी फडणवीस यांना पाच वर्षांपूर्वी दिलेली मुख्यमंत्रिपदाची संधी, दुसर्‍यांदा सत्तास्थापनेत अपयश येऊनही दिलेली विरोधी पक्षनेतेपदाची संधी आणि आता बिहार निवडणुकीची दिलेली जबाबदारी याचा अर्थ श्रेष्ठी फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे आहेत. खडसे यांचे खरे दुखणे येथे आहे आणि त्यातून ते पक्षापासून दुरावले गेले. खडसेंनी या नाराजीतून पक्षांतराचा निर्णय घेतला.

error: Content is protected !!