समाजभान असलेले कर्मयोगी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव

1 280

‘प्राचार्य’ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि प्राचार्य रां.र. बोराडे यांच्या प्रतिमा उभ्या राहतात. साधारणपणे समाजात प्राचार्य शब्दाची विद्यार्थी-प्राध्यापक-कर्मचारी मंडळींना फार भीती व आदर असतो. प्राचार्यपद प्रतिष्ठेसह अत्यंत जबाबदारीचे आणि जोखमीचे ही तेवढेच. विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, संस्थेचे अध्यक्ष-सदस्य आणि विद्यापीठ प्रशासन या सर्वांशी ताळमेळ घालणारा व्यक्ती म्हणजे प्राचार्य असतो. अशा पदावर विराजमान व्यक्ती सर्वगुणसंपन्न असली तरच त्या पदाला न्याय आणि प्रतिष्ठा मिळवून देते आणि आपलेआणि महाविद्यालयाचे नावलौकिक करते. महाराष्ट्रात आजवर अनेक प्राचार्य होऊन गेले ज्यांनी प्राचार्यपदाला नवी ओळख निर्माण करून दिली त्यापैकीच एक परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव आहेत. संतांची भूमी आणि संपन्न कृषी परंपरा असलेला परभणी जिल्हा मात्र शैक्षणिक बाबतीत मागासलेलाच म्हणावा लागेल. काही वर्षापासून जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण संपन्न आणि पोषक असे दिसून येत आहे.

 

जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळ अग्रेसर करण्यात श्री शिवाजी महाविद्यालयाचे महत्त्वाचे योगदान आहे. याचे कारण संस्थाचालक, प्राचार्य व कर्मचारी यांनी घेतलेले अथक परिश्रम होय. सन 2010 साली महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. बाळासाहेब जाधव यांची नियुक्ती झाली आणि तेथून सुरु झाला शैक्षणिक विकासाचा झंझावात. प्राचार्य डॉ.जाधव सर प्राचार्य पदावर रुजू झाल्याने महाविद्यालय आणि परभणी जिल्ह्यातील मरगळ आलेली शैक्षणिक चळवळ गतिमान झाली असच म्हणता येईल. सरांनी सर्वप्रथम महाविद्यालयातील शैक्षणिक आणि भौतिक सुविधा परीपूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले ज्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील महत्वाचा दुवा असतात. ह्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून अल्पावधीतच ते पूर्णत्वाकडे नेले. यासाठी त्यांना संस्थेचे अध्यक्ष मा.आ. प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस मा. आमदार सतीशभाऊ चव्हाण आणि महाविद्यालयाचे स्थानिक नियामक मंडळाचे प्रमुख मा. हेमंतराव जामकर यांचे खंबीर पाठबळ मिळाले. सरांच्या नेतृत्वाखाली सन 2011 वर्षी महाविद्यालयाला नँक समितीने ‘अ’ दर्जा दिला. पुढे अ+ दर्जा कसा मिळेल या दिशेने महाविद्यालयाची वाटचाल सुरू केली. आदरणीय प्राचार्य डॉ. जाधव सर यांनी प्राचार्य पदावर येण्यापूर्वी ‘राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत महत्त्वपूर्ण कार्य केले. या कार्याची दखल म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’ म्हणून पुरस्काराने सन्मानित केले. खर्‍या अर्थाने त्यांच्या कार्याला इथूनच सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. सरांच्या प्रयत्नाने आणि दुरदृष्टीमुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा ’जागर जाणिवांचा’ हा विशेष पुरस्कार महाविद्यालयाला प्राप्त झाला. हा पुरस्कार म्हणजे परभणीचा सन्मानच होय. एवढेच नाही तर त्यांच्या कार्याची धडाडी आणि कार्यकुशलता पाहून नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना ’उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. हा त्यांच्या प्राचार्य पदाच्या प्रारंभीचा प्रेरणादायी पुरस्कार होय. मागच्या दोन वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या प्राचार्य महासंघाच्या उपाध्यक्षपदी सरांची निवड म्हणजे महाविद्यालयाचा बहुमानच झाला. सन 2016 साली महाविद्यालयाचे तिसरे नँक मूल्यांकन झाले. या मूल्यांकनात समितीने 3.52 इतके गुण देत महाविद्यालयाला अ+ हा दर्जा दिला. जो तत्सम काळात महाराष्ट्रातील इतर महाविद्यालयाच्या तुलनेत सर्वोच्च असा होता. या देदीप्यमान यशाचे शिलेदार म्हणून माननीय प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांचा नामोल्लेख करणे गरजेचे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मा.हेमंतराव जामकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय शैक्षणिक गुणवत्तेच्या नवीन सीमा पार करत आहे. महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता वाढवत असतानाच विद्यापीठीय व्यवस्थापनाच्या विविध पदावर काम करताना विद्यार्थीभिमुख निर्णय घेण्यास ते महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत हे उल्लेखनीय. महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या वंचित आणि गरीब विद्यार्थ्याला विशिष्ट मार्गदर्शन करून त्यांना तन-मन-धनाने मदत करत भविष्याची वाट शोधण्यासाठी मदतही करतात हा त्यांच्यातला सामाजिक संवेदनशिलतेचा स्थायीभाव आम्हाला नेहमीच प्रेरणा देणारा आहे. ‘माझा विद्यार्थी महाविद्यालयाचा लौकिक वाढवणारा असला पाहिजे’ असा त्यांचा आग्रह नेहमीच असतो. विद्यार्थी मोठे झाले तरच प्राध्यापक आणि महाविद्यालयही मोठे होते असा सर्वव्यापी विचार ते नेहमीच मांडतात. ग्रामीण विधार्थ्यांशी असलेली त्यांची नाळ गुरु-शिष्य नात्याला वृन्धिंगत करणारी आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू माणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना ज्ञानसंपन्न कसं करता येईल हा कयास सरांचा असतो. मागच्या अनेक वर्षांपासून ते देशभरातील महाविद्यालयांचे मूल्यांकन करणार्या नॅक सारख्या राष्ट्रीय परिषदेमध्ये सदस्य म्हणून मूल्यांकन करण्यासाठी जातात ही बाब परभणीकरांसाठी भूषणावह आहे. सरांच्या प्रगाढ इच्छाशक्तीने आणि प्रचंड कार्यवृतीने महाविद्यालयाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. दोन वर्षापूर्वी दिल्ली स्थित विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयास ‘उत्तुंग भरारीक्षम महाविद्यालय’ (उझए) म्हणून मानांकन दिले आहे. हे महाविद्यालयाच्या इतिहासातील विशेष नोंद घेण्यासारखी कामगिरी होय. केंद्र शासनाच्या वतीने मागील वर्षी भारतातील मोजक्याच महाविद्यालयांना ‘भारताच्या विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी मुलभूत आंतरविद्याशाखीय प्रकल्प’ हे प्रकल्प मंजूर केले त्यात श्री शिवाजी महाविद्यालयाचा समावेश म्हणजे परभणीच नव्हे तर मराठवाड्यासाठी भूषणावह आहे. त्याचबरोबर मागील वर्षी राष्ट्रीय मुल्यांकन व प्रत्ययान परिषदेने (नॅक) महाविद्यालास अशा 7 महाविद्यालाचे पालकत्व दिले ज्यांचे अद्यापर्यंत एकदाही नॅक मुल्यांकन झाले नाही. या महाविद्यालयांना श्री शिवाजी महाविद्यालयाची टीम प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली नॅक मूल्यांकनाच्या दृष्टीने गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन करणार आहे. हे सर्व यश उत्कृष्ट प्रशासक म्हणून प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्यामुळे प्राप्त झाले आहे. परंतु हे यश फक्त माझे नसून संस्थेचे सर्व विश्‍वस्त, प्राध्यापक, प्रशासकिय कर्मचारी व विद्यार्थी यांचे आहे असे म्हणत ते वैश्‍विक दृष्टीकोन सर्वांसमोर ठेवतात. प्रशासक या नात्याने प्राचार्य डॉ. जाधव सर अनेकदा माझ्यासारख्या कर्मचार्‍याला चुकल्यास बोलतात पण यश मिळवल्यास शाबासकीची थाप पण देतात हे आपलं मोठेपण आम्हाला प्रेरणा देणार आहे. महाविद्यालयात शैक्षणिक कामकाज करत असताना प्रत्येक कर्मचारी सरांनी ठेवलेल्या विश्‍वासाच्या आधारावरच कार्य करत असतो. प्रत्येक कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक आणि कार्यालयीन समस्या सोडवण्यासाठी ते सतत तत्पर असतात हा त्यांचा स्थायीभाव सर्वाना सुखावून जातो. आतापर्यंतच्या महाविद्यालयाच्या इतिहासात सर्वात यशस्वी प्राचार्य म्हणून सरांची ओळख निर्माण झाली आहे. महाविद्यालयीन कार्यासोबतच सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ते सामाजिक कार्याची जबाबदारी जोपासत सामाजिक कार्य करत आहेत हे विशेष. माजी विद्यार्थी संघटनेला तन-मन-धनाने पाठबळ देत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे प्राचार्य म्हणून त्याचा नावलौकिक वाढला आहे. प्राचार्य म्हणून कार्य करताना केवळ महाविद्यालय आणि प्रशासनापुरतेच मर्यादित न राहता लायन्स क्लब, शांतीदूत संघटना, संकल्प स्वराज्य राष्ट्रउभारणीचा आणि शेक हँड इत्यादी समाजिक संघटनाच्या माध्यमातून अनेक वंचित घटकांना सामाजिक प्रवाहात आणण्याचे महत कार्य ते करत आहेत. शैक्षणिक- सामाजिक अशा महत्वपूर्ण क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे प्राचार्य म्हणून सरांचा नावलौकिक झाला आहे. सरांची शैक्षणिक कामगिरी अशीच उत्तोरोत्तर वाढत जावो व परभणी सारख्या शैक्षणिक मागासलेल्या भागास त्याचा फायदा होवो हीच सदिच्छा…….एक चिरंतन शैक्षणिक विकासाचा दृष्टिकोन ठेऊन आपण आपलं शैक्षणिक आणि सामाजिक योगदान देत आहात हे येणार्‍या काळात परभणीच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी महत्वाचं आहे असच म्हणावं लागेल…….नक्कीच सर आपण परभणीचे समाजभान असलेले कर्मयोगी प्राचार्य आहात यात काही शंका नाही….आज आपला 55 वा वाढदिवस आहे आपल्याला अभिष्टचिंतन व खूप खूप शुभेच्छा………….

jayant bobade

आपला
प्रा.डॉ.जयंत बोबडे,
सहयोगी प्राध्यापक
श्री शिवाजी महाविद्यालय,परभणी.

error: Content is protected !!