ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

0 24

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील योगदानासाठी २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशोक सराफ यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

‘मला कल्पना नव्हती मला हा पुरस्कार मिळेल. मी कुठेतरी चांगलं काम करतोय आणि तुम्हाला सर्वांना ते आवडतं आहे, ही माझ्यादृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हा पुरस्कार मला मिळाला, माझी आतापर्यंतची माझी धडपड सार्थकी लागल्याचं वाटतंय’, अशी पहिली प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दिली आहे.’मी काय करतोय हे मला आवडण्यापेक्षा, प्रेक्षकांना कसं आवडेल याचा मी कायम विचार केला. प्रेक्षक आहेत, तरच मी आहे. त्यामुळे मी केलेलं काम कसं लोकांना आवडेल याचा विचार केला आणि त्याप्रमाणे मी काम करत आलो.”माझ्या या करिअरमधील संपूर्ण प्रवासात ज्या-ज्या व्यक्तीने माझ्यासोबत काम केलं, त्या प्रत्येकाचा सहभाग यात आहे. अभिनय एका माणसाकडून होत नसतो, त्यासोबत सहकारदेखील तितकेच महत्त्वाचे असतात. त्यांनीही चांगलं केलं, तर संपूर्ण काम चांगलं होत असतं. माझ्या सहकलाकारांनी मला चांगली साथ दिली, त्यामुळेच हे शक्य झालं. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. सर्वांचं श्रेय माझ्या या पुरस्कारासाठी आहे. निवेदिता माझ्यामागे कायम खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे घर बाजूला ठेवून मी माझ्या कामाकडे लक्ष देऊ शकलो.’, असं म्हणत अशोक मामांनी अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासह प्रेक्षक, तसंच सहकलाकारांचेही आभार मानले आहेत.

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर ते खलनायकापर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं, असं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करताना म्हटलं आहे.

मराठमोळे अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिका तसंच नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. विनोदी भूमिका साकारणं हा त्यांच्या हातखंडाच. त्यामुळेच ते बहुतांश मालिका, चित्रपट आणि नाटकात विनोदी पात्र साकारताना दिसले.
चित्रपटसृष्टीचा अशोक सम्राट’

अशोक सराफ यांना खरी ओळख मराठी चित्रपटातून मिळाली. त्यांचं काम पाहून त्यांना सिनेविश्वातील लोक ‘अशोक सम्राट’ म्हणू लागले.

अभिनय करण्यापूर्वी करायचे बँकेची नोकरी

इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अशोक सराफ बँकेत काम करत होते. त्यांना आधीपासूनच अभिनेता व्हायचं होतं, पण त्यांनी वडिलांचा शब्द पाळत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी सुरू केली. त्यासोबतच आपला अभिनयाचा छंद जोपासत ते नाटकांत काम करू लागले. पुढे त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांना अक्षरश: वेड लावलं. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या कलाकाराने मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोलाचं योगदान दिलं.
२५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये केलंय काम

अशोक सराफ यांनी १९६९ पासून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी २५० हून अधिक मराठी चित्रपट केले, त्यापैकी १०० व्यावसायिक हिट ठरले. त्याने कॉमेडी सिनेमांमधून तुफान लोकप्रियता मिळवली.

error: Content is protected !!