वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश

0 25

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. आजच्या बैठकीला मविआ नेत्यांकडून वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवलं होते. आज झालेल्या बैठकीत ‘वंचित’चा महाविकास आघाडीत समावेश करण्यात आलाय. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याविषयी माहिती दिलीय. महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना यासंबंधी पत्र पाठवण्यात आले आहे.

गुरुवारी झालेल्या मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील व्हावं यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत झालं असून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

पत्रात काय म्हटलं आहे?

“देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे”, अशी आमची भूमिका आहे, असं या पत्रात म्हटलं आहे.

“३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे”, असं या पत्राद्वारे जाहीर करण्यात आलं आहे.तसंच, याबाबत संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट करून २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी पक्ष सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं. वंचितमुळे देशातील हुकूमशाहीविरोधातील लढ्याला बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावं लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.

error: Content is protected !!