लस कधी येणार?

2 386

कोरोनाने जगभरातील सर्वच देशांना हैराण करून सोडले आहे. संपूर्ण जग आज एक युध्द लढत आहे. हे युध्द आपसातले नसून एका विषाणूविरूध्दचे आहे. कोरोना या महामारीने जगभरातील लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनावर अद्यापपर्यंत औषध उपलब्ध झालेले नसून जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावरील लस संशोधनासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.अनेक देशांनी कोरोना विषाणू नियंत्रणात ठेवणारी लस निर्माण केल्याचा दावा केला आहे. तर काही ठिकाणी चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. अशा स्थितीत भारतातही लसनिर्मिती झाली अथवा इतर देशांकडून लस मागवली तर देशातील कोरोना विषाणू संसर्ग लगेच संपुष्टात येईल काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महासाथीचा सामना करण्यात संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. या भीषण संकटाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण मानवजातीला मदत करण्यासाठी भारत आपल्या उत्पादन आणि वितरण क्षमतेचा वापर करेल असे आश्‍वासन पंतप्रधान मोदींनी दिले. या महासाथीच्या अत्यंत कठीण काळातही भारताच्या औषध निर्माण उद्योगाने जगातील दीडशेहून अधिक देशांना आवश्यक औषधे पाठवली आहेत. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात कोरोना लस उपलब्ध झाली तर कोरोना विषाणू संसर्ग लगेच नाहीसा होईल काय? या प्रश्‍नाला आशावादी लोक ‘होय’ असे उत्तर देतील तर वास्तववादी लोक ‘नाही’ असे उत्तर देतील. देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पुढील वर्षापर्यंत 80 हजार कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत का? असा सवाल सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी केला आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला लस द्यायची असेल तर त्यासाठी 80 हजार कोटींची गरज आहे. केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची तयारी आहे का ते पाहणे महत्त्वाचे आहे. कारण त्याप्रमाणे देशातील आणि परदेशातील लस उत्पादकांना खरेदी आणि वितरण याबाबतच्या सूचना द्याव्या लागतील. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अ‍ॅस्ट्राझेन्का आणि सीरम इन्स्टिट्यूट यांच्यातील सामंजस्य करारातून कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन सुरू आहे. या लसीची दुस-या टप्प्यातील मानवी चाचणी 26 ऑगस्टपासून पुण्यात सुरू आहे. 21 सप्टेंबरपासून तिस-या टप्प्याची मानवी चाचणी प्रक्रियाही सुरू झाली आहे. तिस-या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष समाधानकारक आल्यास ही लस 2021 च्या पूर्वार्धात बाजारात उपलब्ध होऊ शकेल. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात कोरोना विषाणू संसर्गाची व्याप्ती पाहता ग्रामीण भागापर्यंत लस पोहोचवणे हे मोठे आव्हान आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी एक रोडमॅप तयार करण्यात आला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, सर्वांपर्यंत लस पोहोचविण्यात येईल मात्र त्यासाठी काही टप्पे करण्यात येतील, प्रथम 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना ही लस देण्यात येईल. तज्ज्ञांच्या मते 2020 वर्षअखेर भारत मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यास सक्षम होऊ शकेल. तोपर्यंत उद्योजक, नेत्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोरोना व्हायरस लसीकरणाबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात असले तरी ती एक प्रक्रिया आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा आवाका पाहता हे लसीकरण कमी कालावधीत पार पाडणे अशक्य आहे. कोरोना विषाणूशी संपूर्ण जग लढत आहे. अशा अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरी लाट जर आली तर फार मोठे संकट संपूर्ण जगावर येणार आहे. काही देशांत कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी तर पुन्हा एकदा संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट जर आली तर त्यावर लॉकडाउन हाच उपाय आहे का?असा प्रश्‍न पडतो. आज सर्व काही सुरू केलेले असतानाही सर्व काही सुरळीत झालेले नाही. कारण टाळेबंदीमुळे विस्कटलेली आर्थिक घडी बसण्यास बराच अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच संपूर्ण जगाचे कोरोनावरील लसीच्या संशेाधनाकडे लक्ष लागले आहे. कोरोनावरील लस कधी येईल याबाबत माध्यमांतून दररोज नवनवीन बातम्या मिळतात. परंतु सध्या तिसर्‍या टप्यातील चाचणी सुरू असून ती जर यशस्वी झाली तर लवकरच कोरोनावरील लस उपलब्ध होवू शकते.

error: Content is protected !!