‘अमित शाहंच्या पायगुणाने राज्य सरकार जावं’, नारायण राणेंची इच्छा
सिंधुदुर्ग, 6 फेब्रुवारी : सिंधुदुर्गातल्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार आहेत. त्याआधी भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला. अमित शाह यांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं, अशी इच्छा नारायण राणेंनी बोलून दाखवली. शिवसेनेशी युतीचा प्रश्नच येत नाही, अशी पक्षातली भूमिका आहे. विधानसभा अध्यक्षपदाबाबत भाजपने बाजी मारली पाहिजे, असं मत राणेंनी व्यक्त केलं.
‘पुढच्या निवडणुकीमध्ये मुंबईचा महापौर भाजपचा असेल, गुजराती समाज मोदी आणि शाह यांना सोडून बिनबुडाच्या लोकांकडे जाणार नाही. आम्ही फोडाफोडीत पीएचडी केली आहे. तसंच युतीबाबत मनसेनं ठरवावं, शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजप समर्थ आहे,’ अशी भूमिका नारायण राणेंनी मांडली.
‘पेट्रोल आणि डिझेलचे दर काही अमित शाह, नरेंद्र मोदी ठरवत नाही. शिवसेनेची भूमिका धरसोडीची आहे. इथे केही केलं नाही आणि दिल्लीत गेले. राज्यात भाजपच एक नंबरचा पक्ष आहे. उद्धव ठाकरे सरकार नीट चालवतात का?’ असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
‘ज्या दिवशी ठाकरेंनी आघाडी सरकार स्थापन केलं, त्यादिवशीच त्यांनी हिंदुत्व सोडलं. त्यांनी हिंदुत्वासाठी काहीच काम केलं नाही. शिवसेना धरसोड आहे, एकही विचार नाही. बाळासाहेबांनंतर एकही माणूस नाही, ज्याने बोललेलं पूर्ण केलं. एक ना धड भाराभर चिंद्या अशी अवस्था शिवसेनेची आहे,’ अशी टीका नारायण राणेंनी केली.
शेतकऱ्यांना समोर करून आंदोलन हिंसक केलं जात आहे. अशा आंदोलनातून शेतकऱ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मग आंदोलन का? याच्या मागे काँग्रेस आणि बाहेरचे लोक आहेत. सचिन तेंडुलकरचा फोटो जाळणं हा राष्ट्रद्रोह आहे, असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं.