आगामी शैक्षणिक वर्षात नवीन संकल्पना अंमलात आणणे आवश्यक: राजेशजी टोपे
पुणे,प्रतिनिधी : कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर पारंपारिक शिक्षणाची परिभाषा बदलत असून अनुभवाधिष्ठित शिक्षणा बरोबरच भविष्याचा वेध घेणारे, विद्यार्थी केंद्रित, समयोचित व जागतिक स्पर्धा करणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक असुन कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर आगामी शैक्षणिक वर्षांमध्ये सर्व शाळा व महाविद्यालयांनी नवीन संकल्पना व तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. राजेशजी टोपे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे कोविड – १९ विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनार तसेच २२ ते २७ जुलै या कालावधीमध्ये पार पडणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या एकत्रित उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डाॅ. अनिरुद्ध टोणगावकर, डॉ. प्रविण सोनी, डॉ. सागर पाठक आदी मान्यवर तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव श्री. एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) श्री. ए. एम. जाधव उपस्थित होते.
वेबिनार चे प्रास्ताविक करत असताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम म्हणाले कि, कोविड – १९ विषाणुच्या पार्श्वभूमीवर पारंपारिक शिक्षण पद्धती थांबलेली असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी व राजकीय, सामाजिक, आर्थिक, पर्यावरण, विधी इत्यादी क्षेत्रातील नामांकित मान्यवरांचे विचार विद्यार्थ्यांना ऐकता यावे या उद्देशाने कोरोना विषयीच्या शासन नियमांचे पालन करत व शारिरीक अंतर राखत अनंत व्याख्यानमाला, चित्रकला, प्रश्नमंजुषा, पोस्टर प्रेझेंटेशन, शिक्षकांसाठी इ – कन्टेन्ट व्हिडीओ व पीपीटी तयार करणे, वृक्षारोपण असे विविध उपक्रम आयोजित केल्याचे सांगितले. तसेच दादांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने घेतलेल्या गरुडभरारी बद्दल थोडक्यात माहिती दिली.
आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलेले राज्याचे आरोग्य मंत्री मा. राजेशजी टोपे यांनी दादांच्या मार्गदर्शनामध्ये काम करत असताना त्यांचे नेतृत्वगुण, वेळेचे नियोजन, काम करण्याचा धडाका, व्यावहारिकता, पर्यावरणाविषयीचे प्रेम इत्यादी गुणांचे कौतुक करत दादांसारखे अष्टपैलू व उत्तुंग व्यक्तीमत्वाचे नेतृत्व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला लाभल्याने नव्या महाराष्ट्राची गुणवत्तापुर्ण पिढी घडवण्या मध्ये निश्चितच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा सिंहाचा वाटा असेल असे मत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र मध्ये कोरोना विषाणुमुळे निमार्ण झालेल्या परिस्थितीवर आरोग्य मंत्रालयाद्वारे केल्या जात असलेल्या उपाययोजना व प्रयत्नाबद्दल उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली.
याप्रसंगी कोविड – १९ वर आयोजित राष्ट्रीय वेबिनारच्या पहिल्या सत्रामध्ये ‘कोविड – १९: प्रतिबंध व उपचार’ या विषयावर मार्गदर्शन करताना स्टर्लिंग मल्टी स्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. अनिरुद्ध टोणगावकर यांनी, कोराना विषाणू ची जैविक रचना, विषाणुची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय तर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) मधील डाॅ. प्रविण सोनी यांनी कोरोना काळामध्ये आपले ध्येय काय असावे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे आजच डॉ. सोनी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली असताना देखील कोरोना विषयी लढण्याची जिद्द उपस्थितांसमोर निर्माण करत, खरोखरच डॉक्टर देव असतात याचा प्रत्यय उपस्थितांना दिला.
तर दुसऱ्या सत्रामध्ये प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डाॅ. सागर पाठक यांनी ‘मैत्री कोविड बरोबर – बदलती मानसिकता नात्यांच्या चष्म्यातून’ या विषयावर मार्गदर्शन करताना कोरोना विषाणुशी लढण्यामध्ये मानसिक स्वास्थ्याच्या महत्तवाबद्दल माहिती देत मानसिक आधार असेल तर गंभीर रुग्ण देखील लवकरात लवकर बरा होईल, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माया माईनकर, आभार प्रदर्शन अॅड. मोहनराव देशमुख यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. रागिनी पाटील व डॉ. सुषमा भोसले यांनी करून दिला.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी व यशस्वितेसाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. अशोक भोसले, प्राचार्या डॉ. रागिणी पाटील, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, प्राचार्य डॉ. पंडित शेळके, प्राचार्य डॉ. तानाजी साळवे, प्राचार्या डॉ. सुषमा भोसले, प्राचार्या डाॅ. शर्मीला चौधरी, प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, प्राचार्य डॉ. तुषार शितोळे तसेच सिताराम अभंग, किरण देशपांडे, संतोष पठारे यांनी परिश्रम घेतले.
सदर राष्ट्रीय वेबिनार मध्ये झुम अॅप तसेच फेसबुक व यु – ट्युब लिंक चा वापर करुन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाशी संलग्नित सर्व शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य,उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी अशा एकुण ३००० पेक्षा जास्त जणांनी या राष्ट्रीय वेबिनार मध्ये सहभाग घेतला.