जनता कर्फ्यू…

1 182

भारतात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतातील काही राज्यांत तर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे उध्वस्त झालेली अर्थव्यवस्था अजूनही रूळावर आलेली नाही. त्यातच परत लॉकडाऊनच्या चर्चा सर्वत्र होवू लागल्या आहेत. भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 50 लाखांचा आकडा पार केला आहे. काही दिवसांपूर्वी सर्वच राज्यांत रुग्णवाढीचा दर साधारण होता परंतु या महिन्यात त्याने उचल खाल्ली आहे. मागील काही दिवसांत देशात जवळपास 90 हजारांच्या वर दररोज रूग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्रातही रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी कोरोनामुक्त होणार्‍यांचीही संख्याही लक्षणीय आहे. परंतु अनलॉक सुरू झाले तेव्हापासून ग्रामीण भागातील संसर्गही अधिकच वाढत आहे. जगभरासह भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सध्या राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 77.77 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना विषाणूवरची लस किंवा औषधीसंबंधीच्या बातम्यांमुळे लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदींनी ‘जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही’ असे सांगत कोरोनाबाबत निष्काळजी करू नका असे आवाहन केले आहे. कोरोनाविरोधात दो गज की दूरी आणि मास्क अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशाचे अर्थकारण पूर्णत: बिघडल्याची कबुलीही त्यांनी दिली. कोरोना प्रकोप अजूनही थांबलेला नाही तेव्हा आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे हा एकमेव उत्तम पर्याय जनतेपुढे आहे. कोरोनावर लस अथवा औषध येईल तेव्हा येईल पण लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला शिकले पाहिजे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी भितीचे वातावरण आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचेही अतोनात नुकसान होत आहे. रूग्णसंख्या वाढत असल्याने शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतील हे सांगणे कठीण आहे. आता अनेक ठिकाणी परत लॉक डाउनची मागणी केली जात आहे तर काही ठिकाणी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लावला जात आहे. परंतु असा मर्यादित ठिकाणी जनता कर्फ्यू लावून खरेच कोरोना थांबणार आहे का? अनेक जिल्ह्यांमध्ये परत टाळेबंदी लावण्याबाबत विचार सुरू आहे. परंतु अशाने छोट्या व्यावसायिकांचे, मोल मजुरी करणार्‍या, हातावर पोट असणार्‍यांचे हाल होत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे मोठ्या व्यावसायिकांना जनता कर्फ्यूने नुकसान झाले तरी विशेष फरक पडत नाही. कारण त्यांच्याजवळ भांडवल आहे. परंतु छोट्या व्यावसायिकांचे हाल होतात. अनेक ठिकाणी लावण्यात येणार्‍या या जनता कर्फ्यूला त्यामुळे विरोधही होत आहे. जनता कर्फ्यूची मागणी करण्यापेक्षा व्यापार्‍यांनी स्वतः आधी कोरोनाचे नियम पाळायला सुरूवात केली पाहिजे. रूग्ण का वाढत आहेत याचा थोडा विचार करायला हवा. आज अनेक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींग आदी नियमांचे काहीच पालन होत नाही. एकेका दुकानात 10-20 माणसे कामाला असतात. ते मास्क वापरत नाही, दुकानात सॅनिटायझरही नसते व ग्राहकांची तर तोबा गर्दी होते. ग्राहकांच्या गर्दीला नियंत्रणात ठेवणे किंवा सोशल डिस्टन्सींग कसे राहील याचा विचार करणे गरजेचे आहे. केवळ जनता कर्फ्यूने हा प्रश्‍न सुटणारा नाही. आपल्या परिसरात कोरोनाबाधित असो वा नसो, आपल्याला कोरोनाची लक्षणे असतील वा नसतील तरीही प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्क वापरायलाच हवा. आज अनेक लोक मास्क न लावता फिरताना दिसतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा सामना करण्यासाठी काय करावे- काय करू नये यासंबंधीची सविस्तर माहिती पुन्हा एकदा दिली आहे. रोज सकाळ, संध्याकाळ अर्धा तास घरच्या घरी का होईना वॉक करा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका, आयुर्वेदिक गोष्टींचे नियमित सेवन, सकाळ-संध्याकाळ हळद घातलेले दूध, हळद आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा, 1 चमचा च्यवनप्राश नियमित घ्या असे या माहितीत म्हटले आहे. कोरोना काळात बदनाम झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा (डब्ल्यूएचओ) आहारावर नियंत्रण ठेवा असे म्हटले आहे. पॅकेटबंद, डबाबंद पदार्थ, मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करा. घरात तयार केलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करा, तेलकट, तुपकट पदार्थ कमी खा., आहारात फळे, भाज्यांचा समावेश करा, चहा-कॉफीचे प्रमाण कमी करा असे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व ते प्रयत्न करीत आहे. मात्र अजूनही या विषाणूवर लस सापडली नसल्याने लोकांनी आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!