नवीन कृषी कायद्यांमध्ये काही सुधारणा करून तो अमलात आणावा-डॉ.राकेश पाटील
बा-हे, किरण देशमुख – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथील अर्थशास्त्र विभागातर्फे ‘नवीन कृषी कायदे 2020’ या विषयावर आज दिनांक 18 सप्टेंबर 2021 रोजी एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन बुलढाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नागरे हे होते.
उद्घघाटनपर मनोगत व्यक्त करताना त्यांनी नवीन तीन कृषी कायद्याविषयी माहिती दिली. नवीन कृषी कायद्यामुळे एक देश एक बाजारपेठ तयार होईल आणि त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांमधील अंतर कमी होऊन त्याचा फायदा दोघंही घटकांना होईल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक डॉ. राकेश पाटील , विभागप्रमुख, एमबीए, संदीप फाऊंडेशन म्हणाले की, कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकारने तीन विधेयके संमत केली आहे.पाहिले विधेयक कृषी उत्पादन व्यापार व वाणिज्य विधेयकातील तरतुदीनुसार शेतकरी आपला शेतमाल देशाच्या कोणत्याही भागात नेऊन विक्री करू शकतो. याआधी शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जावे लागत असे आणि आता नव्या विधेयकानुसार व्यापारी हे मार्केट बाहेरूनही शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करू शकतात तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांची एकाधिकारशाही संपेल आणि स्पर्धा वाढेल. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना सेस,आडत, दलाली किंवा इतर अनेक प्रकारचे कर द्यावे लागतात. ते नवीन कायद्यांमुळे बंद होतील .त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होईल .दुसरे विधेयक हे करार शेती विधेयक आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी करार करता येईल. करारशेतीमध्ये कंपन्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतातून खरेदी करतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च वाचेल आणि निर्यातदारांना आवश्यक असणाऱ्या गुणवत्तेचा शेतमाल कंत्राट शेतीतून मिळू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगली किंमत मिळेल आणि देशातील शेतमालाची निर्यात वाढेल. शेतीमध्ये गुंतवणूक वाढल्यास शेतकऱ्यांना निर्यातीसाठी आवश्यक तंत्रज्ञान मिळेल. तिसरे विधेयके हे अत्यावश्यक वस्तू कायदा हे आहे. कडधान्य, डाळी, तेलबिया, खाद्यतेल, कांदे आणि बटाटे यांसारख्या वस्तू अत्यावश्यक वस्तू सेवा कायद्यातून वगळण्यात आल्या तसेच गुंतवणूकदारांना शेतमालाची साठवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल. कारण का बराचसा शेतमाल हा साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे खराब होतो .नवीन कृषी कायद्यामध्ये काही शंका आहेत .त्या शंकांचे निरसन होणे गरजेचे आहे .तसे झाल्यास नवीन कृषी कायद्यांचा निश्चितपणे फायदा देशातील शेतकऱ्यांना होईल असेही ते म्हणाले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.जी. दिघावकर हे होते. सूत्रसंचालन प्रा. कविता भोये यांनी केले सर प्रस्ताविक कार्यक्रमाचे संयोजक डॉ. सुनील घुगे यांनी केले. व्याख्याते यांचा परिचय प्रा. वि. सि. गायकवाड यांनी केले. तर आभार प्रा. एस. एम. भोये यांनी मानले. तांत्रिक सहाय्य ग्रंथपाल एस.डी. महाजन आणि प्रा. एस. आर. पावडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्ही. डी.अहिरे, अनेक विद्यापीठातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.