नारायण राणेंच्या अटकेची इनसाईड स्टोरी, अनिल परब सतत पोलिसांच्या संपर्कात, अटकेसाठी दबाव?
रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. रत्नागिरी पोलिसांनी राणेंना जन आशिर्वाद यात्रेदरम्यान अटकेची कारवाई केली. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. अखेर पोलिसांनी रत्नागिरीत नारायण राणे यांना अटक केली. त्याआधी नारायण राणे यांनी कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्याने नारायण राणे यांना अटक करण्यात आली.
नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी भाजप नेते ठिय्या मारुन बसले होते. अटक वॉरंट दाखवा, तरच कारवाई करा, अटक वॉरंट असेल तर आम्ही स्वत: गाडीत येऊन बसतो असं भाजप नेते सांगत होते. तसंच पोलिसांवर राजकीय दबाव आहे, कारवाई करण्याचे आदेश येत आहेत, असंही भाजप नेते म्हणत होते.
भाजपच्या या दाव्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ समोर आला आहे. अनिल परब यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पोलिसांचे फोन येत होते.
अनिल परब नेमकं काय म्हणाले?
अनिल परब यांना पोलिसांचा फोन होता. त्यांचं बोलणं पत्रकार परिषदेतील माईकमध्ये रेकॉर्ड होत होतं. मी सध्या रत्नागिरीत आहे. मी आता विचारुन घेतो सीएम साहेबांना. हो… फक्त मी ठरवतो, मग तसं आपल्याला ताबडतोब ब्रीफ करावं लागेल ना? हो हो हो… मग कोणाला सांगू ब्रीफ करायला? डीजींना सांगतो. मी डीजींना सांगतो. हो… ठिक आहे, मी आता डीजींना सांगतो ताबडतोब… ठिकाय मी आता ताबडतोब बोलतो.
त्या दरम्यान आमदार भास्कर जाधव हे मोबाईलमधील काहीतरी मेसेज अनिल परब यांना दाखवतात. भास्कर जाधव म्हणतात, कोर्टाने पण नकार दिलाय..
त्यानंतर काही वेळाने अनिल परब फोन लावतात.
हॅलो, काय करताय तुम्ही लोकं??
नाय पण ते करावं लागेल तुम्हाला.. तुम्ही.. घेताय की नाही ताब्यामध्ये?
हं
ऑर्डर कसली मागतायेत ते? ऑर्डर कसली मागतायेत ते?
अहो कोर्टाने जे काय आहे ते हायकोर्ट ते येणार नाही कॉन्फिडन्समध्ये
हायकोर्ट आणि सेशन कोर्ट दोघांनीही त्यांचा जामीन नाकारला आहे.
पण मग घ्या ना,,, पोलीस फोर्स वापरुन करा… अहो वेळ लागणार मग कोर्टबाजी चालूच आहे ना त्याची
ठिकाय.. ओके
फोन बंद झाल्यानंतर भास्कर जाधव अनिल परबांना म्हणतात, नारायण राणेला ताब्यात घेतलाय वाटतं..
मग अनिल परब भास्कर जाधवांना म्हणतात, घरात बसलाय, पोलिसांनी वेढा घातलाय, पोलीस आतमध्ये गेले तेव्हा धक्काबुक्की झाली
आता पोलीस ओढून बाहेर काढतायेत..
भास्कर जाधव म्हणतात.. चला आता (पत्रकार परिषद) संपवायला हवं.
त्यादरम्यान पत्रकार अनिल परब यांना विचारतात, नारायण राणे यांना अटक झाली आहे का?
त्यावर अनिल परब म्हणतात.. मला अजून त्याबाबतची माहिती मिळालेली नाही, त्यामुळे मी आता सांगू शकत नाही अटक झाली की नाही.
मी इथे तुमच्यासमोर बसून आहे. मी तुम्हाला त्याबाबत काय सांगू.