पाच महिन्यांपासून माजलगांवातील ऊस उत्पादकांसमोर आर्थिक संकट, सोळंके कारखान्याने थकवले १५५ कोटी; शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

0 102

माजलगांव,प्रतिनिधी: –कोरोना , दुबार पेरणी अशा संकटांचा सामना करणाऱ्या माजलगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्यानेही वेठीस धरले आहे . गेल्या पाच महिन्यांपासून ऊस उत्पादकांचे ५५ कोटी रुपयांपर्यंतचे बिल प्रलंबित असून कारखान्याकडून कारणे सांगून वेळ मारून नेली जात आहे . विद्यमान आमदारांनीही याबाबत मौन बाळगल्याचे चित्र आहे .

माजलगांव तालुक्यातील लोकनेते सुंदरराव सोळंके कारखाना २८ वर्षांपासून दरवर्षी गाळप करणारा कारखाना अशी ख्याती बाळगून आहे . या कारखान्यात साखरे व्यतिरिक्त इथेनॉल , वीजनिर्मिती , सॅनिटायझर निर्मिती असे विविध प्रकारची सहउत्पादनेही घेण्यात येतात . दरम्यान , यंदाच्या गाळप हंगामात कारखान्याने चार लाख २८ हजार ७६० मेट्रिक टन उसाचे गाळप केले . यापैकी डिसेंबरअखेरपर्यंत १ लाख २७ हजार ५०० मे . टन उसाचे पैसे दोन हजार ५०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना दिले . त्यानंतर कारखान्याने ३ लाख १ हजार २६० मेट्रिक टन उसाचे गाळप केलेले आहे .

त्यातील जानेवारी महिन्यातील १ लाख ४१ हजार ४०० टन उसाचे दीड हजार रुपयांप्रमाणे बिले दिले . तेव्हापासून ते जूनपर्यंतचे बिल प्रलंबित आहे . ५ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे ५० ते ५५ कोटी रुपये कारखान्याकडे अडकून पडले आहेत . त्यामुळे ऐन पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांना कारखान्याला खेटे घालण्याची वेळ आली आहे . दरम्यान , एरवी मतदारसंघात आंदोलन , उपोषण करणारे शेतकरी नेतेही या प्रकरणी मूग गिळून गप्प असल्याने शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का नाही असा सवाल निर्माण होत आहे .

शासनाच्या नियमानुसार ऊस गाळपास गेल्यापासून १५ दिवसांच्या आत संबंधित शेतकऱ्यास बिल अदा करणे बंधनकारक आहे . मात्र , या कायद्यालाही माजलगांव येथील सोळंके कारखान्याच्या व्यवस्थापनाने हरताळ फासल्याचे चित्र आहे . त्यामुळे शेतकऱ्यांतून रोष व्यक्त करण्यात येत आहे .

बिलासाठी शिखर बँकेच्या बैठकीचे कारण
लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक घोरपडे यांना शेतकऱ्यांच्या थकीत बिलाबाबत संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही . यासह कारखान्याचे चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी शिखर बँकेची दोन महिन्यांपासून बैठक झाली नाही . त्यामुळे शेतकऱ्यांचे बिल देण्यास अडचणी येत आहे , असे उत्तर दिले .

नेत्यांनी ठेवले अशा पद्धतीने कानावर हात
भाजप नेते रमेश आडसकर यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला . गंगाभीषण थावरे यांनी मी शेतकऱ्यांसाठी ३५ वर्षे झटलो आता मला काही करायचे नाही , अशी प्रतिक्रिया दिली . शिवसेना तालुकाप्रमुख जाधव यांनी याविषयी अभ्यास करून प्रतिक्रिया देईल असे म्हणून कानावर हात ठेवले . त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न कोण मांडणार हा प्रश्नच आहे .

अतितात्काळ काम असेल तरच पक्षकारांना न्यायालयात प्रवेश

प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?

‘टिकटॉक’ला दिली ‘या’ भारतीय अ‍ॅपने टक्कर; प्ले स्टोअरवर गाठला 1 कोटींचा टप्पा

 

error: Content is protected !!