पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत-आ.डॉ.राहुल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
परभणीच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
परभणी, प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जवळपास सर्वच शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतात पाणी साचले असून पीक जागेवर सडले आहे. त्यामुळे केवळ अतिवृष्टीग्रस्त गावांचे पिक पंचनामे न करता सरसगट सर्व गावातील पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी काल गुरुवारी आ.डॉ.राहुल पाटील यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तसेच इतर विकास कामांसाठी निधी देण्यात यावा अशी विनंतीही यावेळी आ.डॉ. राहुल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी परभणीच्या विकासासाठी भरीव निधी देणार असल्याची ग्वाही दिली असल्याची माहिती आ.डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
आ.डॉ. राहुल पाटील यांनी काल गुरुवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची भेट घेवून त्यांच्यासोबत 45 मिनीटे परभणीच्या विविध विकास कामांसंदर्भात चर्चा केली. यावेळी आ.डॉ. पाटील यांनी नगर विकास विभागांतर्गत परभणी येथे नविन अभ्यासिका केंद्र उभारणे – रु. 7.50 कोटी, परभणी येथे नविन तारांगण व विज्ञान केंद्र उभारणे – रु. 18.75 कोटी निधीची गरज असल्याचे सांगितले. तसेच परभणी येथे नविन नाटयगृहाचे काम सुरु झाले असून ते काम पुर्ण करण्यासाठी -रु 21 कोटी निधी लागत आहे. त्यासाठी आतापर्यंत रु 10 कोटी निधी मिळालेला आहे. उर्वरीत रु 11 कोटी निधी लवकर मंजूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी केली.
पर्यटन विभागांतर्गत परभणी येथे नविन मत्स्यालय (Aquarium) रु. 19.50 कोटी निधी देण्यात यावा. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे परभणी येथे उप परिसर (सब कॅम्पस) स्थापन करण्याचा प्रस्ताव सचिवाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. या प्रस्तावास मान्यता द्यावी व उप परिसर इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी विनंती केली. तसेच परभणी येथे मंजुर असलेल्या अल्पसंख्याक शासकिय तंत्रनिकेतनच्या बांधकामासाठी रु. 50 कोटी निधी उपल्बध करुन द्यावा. वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत परभणी येथे प्रस्तावीत शासकिय मेडीकल कॉलेजसाठी समन्वयक अधिकारी (Nodal Officers) नियुक्त करण्यात यावा अशीही मागणी यावेळी केली.
ऊर्जा विभागांतर्गत अतिरिक्त भार व लघुदाब क्षमतेने वीज पुरवठा करण्यास होत असलेल्या अडचणीचे निवारण करण्यासाठी बोरी येथे नविन 132 केव्ही उपकेंद्र प्रस्तावीत करण्या संबंधीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केलेला आहे. तसेच परभणी जिल्हा अंतर्गत कृषि हंगामात बीज रोहीत्रावर पडणार्या अतिरीक्त भारामुळे वीज रोहीत्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत असून त्या संबंधाने तात्काळ वीज रोहित्र दुरुस्त करुन वीज पुरवठा पुर्ववत व सुरळीत करण्यासाठी आवश्यक 45.75 KL (दि. 29.09.2020 रोजीची मागणी) एवढे तेल उपलब्ध होण्याचे गरजेचे आहे. याशिवाय परभणी जिल्हा अंतर्गत सद्यस्थितीत 250 नादुरुस्त वीज वितरण रोहीत्र हे गाळणी शाखा येथे दुरुस्तीसाठी जमा करण्यात आलेले आहेत. सदरील रोहीत्र हे दुरुस्ती करण्या योग्य नाहीत. त्यामुळे होणार्या वीज पुरवठया समस्या टाळण्यासाठी अतिरीक्त नविन 250 वीज वितरण रोहीत्रांची आवश्यकत आहे. परभणी जिल्ह्यांतर्गत ग्रामीण व शहरी भागांमध्ये नविन वसाहतीमध्ये वीज वितरण वाहिन्या उभारणी करीता रु 15 कोटी निधीची आवश्यकता आहे. समसापुर ता. परभणी येथे 33 केव्ही उपकेंद्राकरिता शासकिय गायरान जमीन उपलब्ध आहे. सदरील ठिकाणी 33 के. व्ही मंजूर झाल्यास ग्रामीण भागातील वीजेच्या समस्या कमी करण्यास मदत होईल असे आ.डॉ.पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना सांगितले.
या सर्व मुद्यांची माहिती ऐकल्यानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी परभणीच्या विकासासाठी भरीव निधी देवू असे आश्वासन दिले असल्याची माहिती आ.डॉ. राहुल पाटील यांनी दिली आहे. या सर्व कामांना लवकरच निधी मंजूर होईल अशी अपेक्षा आ.डॉ.पाटील यांनी व्यक्त केली असून या कामामुळे परभणीच्या विकासात भर पडणार आहे.