पुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील रुग्‍णांसाठी समर्पित कोविड आरोग्य केंद्र

0 427

पुणे शहरात ‘कोरोना’चा पहिला रुग्‍ण सापडल्‍यानंतर सर्व शासकीय यंत्रणा सतर्क झाल्‍या होत्‍या. पुणे शहरानंतर मुंबई, पिंपरी-चिंचवड, मालेगाव या शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढायला लागला. टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) संक्रमण रोखण्‍यास मदत झाली. मात्र, पुण्‍या-मुंबईतील कामगार आपापल्‍या ग्रामीण भागात तसेच इतर राज्‍यातील कामगार आपल्‍या गावी परत येऊ लागल्‍यामुळे तेथे ‘कोरोना’ची काही प्रमाणात लागण झाली.

पुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती होती. तथापि, राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालक मंत्री अजित पवार, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्‍या उत्‍कृष्‍ट समन्‍वय आणि नियोजनामुळे ग्रामीण भागातील ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्‍यात यश मिळाले आहे.

सध्‍या पुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागात ‘कोरोना’चा फैलाव कमी असला तरी भविष्‍यातील शक्‍यता गृहित धरुन ग्रामीण भागातील रुग्णांना ग्रामीण भागातच उपचार मिळावेत, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्‍न करण्‍यात येत आहेत. याचाच एक भाग म्‍हणून विप्रो कंपनीने कोविड सारखी परिस्थिती हाताळण्यासाठी नेमकी गरज ओळखून समर्पित कोविड आरोग्य केंद्र तयार करण्याची संकल्पना मांडली.

पुणे जिल्हा परिषदेने त्याला सकारात्मक प्रतिसाद देवून जिल्हा परिषदेमार्फत अशा प्रकारचे पीपीपी मॉडेल (पब्लिक प्रायव्‍हेट पार्टनरशिप) मधून समर्पित कोविड आरोग्य केंद्र सुरु करण्याचे काम हाती घेतले. संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचे सुसज्ज ५०४ खाटांचे समर्पित कोविड आरोग्य केंद्र पीपीपी मॉडेल मधून सुरु करण्याचा देशात पहिला मान पुणे जिल्हा परिषदेने मिळवला आहे.

या समर्पित कोविड आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेणाऱ्या सर्व कोविड रुग्णांना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना व पुणे जिल्हा परिषदेने सुरु केलेल्‍या डॉ. रखमाबाई राऊत कोविड अर्थसहाय्य योजना यामधून मोफत उपचार करण्यात येणार आहे.

विप्रो ही एक आयटी कंपनी असून या कंपनीने विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर त्याचप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त विक्रम कुमार यांचे मार्गदर्शन घेवून ३० दिवसांमध्ये कोविड हॉस्पिटलची उभारणी केली.

पुणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या हॉस्पिटलच्या उभारणी करीता आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्यांची पूर्तता केली. या समर्पित कोविड केअर हॉस्पिटलमध्ये १८ व्हेंटीलेटर त्याचप्रमाणे आयसीयु सुविधा आणि ५०४ खाटांची उपलब्धता ही विप्रो कंपनीकडून करुन देण्यात आलेली आहे.

पुण्याजवळील हिंजवडी येथे विप्रो कंपनी लिमिटेड येथे हे हॉस्‍पीटल उभारण्‍यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराबाबत विप्रो कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन यांचा सामंजस्य करार एक वर्षाकरिता केलेला आहे. या हॉस्पिटलमध्ये सौम्य व मध्यम स्वरूपाचे पेशंटवर उपचार केले जातील.

करारानंतर हे हॉस्पिटल जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत चालवण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्ये लागणारे मनुष्यबळ व साधन सामुग्रीची तरतूद राष्‍ट्रीय आरोग्‍य मिशनमार्फत (एनएचएम) करण्यात येणार आहे.

विप्रो कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत पुढीलप्रमाणे सुविधा देण्‍यात येणार आहेत. हॉस्पिटलसाठी लागणारी इमारत, एकूण खाटांची क्षमता – ५०४, अतिदक्षता विभागामध्ये १० बेड आणि ५ व्हेन्टीलेटरची सोय, डीफेलटर मशीन – ५, ई.सी.जी. मशीन – १, ए.बी.जी. मशीन – १, रुग्णवाहिका-२ याशिवाय विप्रो कंपनी लिमिटेड मार्फत रुग्णाच्या मनोरंजनासाठी प्रत्येक वार्डमध्ये एक टीव्ही, कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, मासिके व वर्तमान पत्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आहार सेवा – विप्रो कंपनी लिमिटेड मार्फत सर्व रुग्णांना आहार सेवा पुरवण्यात येणार आहे. हॉस्पिटलला लागणारे बेड शिट्स ब्‍लँकेट्स, गाद्या व पेशंटचे कपडे कंपनीकडून पुरविले जातील.

जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत पुढीलप्रमाणे सेवा देण्‍यात येणार आहेत. या रुग्णालयाचे व्यवस्थापन वैद्यकीय अधीक्षक हे पाहतील. या हॉस्पिटलमध्ये लागणारे मनुष्यबळ व साधनसामग्रीची तरतूद राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानामार्फत करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलला लागणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, सर्व प्रकारचे टेक्नीशियन हे मनुष्यवळ जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत पुरविले जातील.

प्रयोगशाळा – रुग्णांच्या आवश्यक रक्ताच्या चाचण्या केल्या जातील. कोरोना तपासणीसाठी थुंकी नमुने घेण्याची सुविधा उपलब्ध आहे व ते तपासणीसाठी पुण्‍याच्‍या एनआयव्‍हीकडे पाठवले जातील.

जंतू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी लागणारी साधन सामग्री जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत देण्यात येणार आहे. बायोमेडीकल वेस्ट व्यवस्थापन लाईफ सीक्यूअर या संस्थेच्या मार्फत करण्यात येणार आहे. अवैद्यकीय सेवा – वस्त्र धुलाई, स्वच्छता सेवा या कंत्राटी स्वरुपात असलेल्या सेवा बाह्य स्रोतांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्‍यात आलेल्‍या या ‘समर्पित कोविड आरोग्य केंद्राचे’ मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरण झाले. उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील लोकार्पण सोहळ्यास शुभेच्‍छा दिल्‍या.

यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी हे ऑनलाइन तर पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथील आरोग्य केंद्रातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, विप्रोचे उपाध्यक्ष हरिप्रसाद हेगडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, जिल्हा परिषदेचे सभापती प्रमोद काकडे आदी उपस्थित होते.

या समर्पित कोविड आरोग्य केंद्रामध्‍ये कोविड रुग्णांकरीता आवश्यक त्या उपचार सुविधा देण्यात येणार आहे. सर्व कोविड रुग्णांना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना व पुणे जिल्हा परिषदेने सुरु केलेल्‍या डॉ. रखमाबाई राऊत कोविड अर्थसहाय्य योजना यामधून मोफत उपचार करण्यात येणार आहे. हे आरोग्य केंद्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमध्ये एक वेगळा नावलौकिक मिळवेल, अशी खात्री आहे.

जळगाव वृद्ध महिला मृत्यूप्रकरण : अधिष्ठातांसह अन्य कर्मचाऱ्यांना केले निलंबित

रेल्वेतर्फे विशेष पार्सल गाड्यांमध्ये वाढ

माजलगाव शहरात खळबळ :“त्या” कोरोना अहवाल निगेटीव्ह आलेल्यांचे काही वेळातच उडाले होश…

 

error: Content is protected !!